पुणे: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे गुरुवारी (दि. 29) शहरासह उपनगरांतील महत्त्वाच्या बाजारपेठा बंद ठेवत व्यापारी वर्गाकडून शोक व्यक्त करण्यात आला.
शहरातील अन्नधान्य आणि भाजीपाल्याची मुख्य बाजारपेठ असलेल्या पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे गुलटेकडी मार्केट यार्डसह लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, टिळक रस्ता तसेच केळकर रस्ता आदी भागातील व्यापारी वर्गाने दुकाने बंद ठेवत पवार यांना आदरांजली वाहिली.
शहरासह उपनगरांत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे, दररोज नागरिकांच्या गर्दीने गजबजणारे रस्ते सुनसान पडले होते. गुलटेकडी मार्केट यार्ड येथील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणेच्या मुख्य बाजार आवारातील फळे-भाजीपाला विभाग, पान बाजार, केळी बाजार, गुरांचा बाजार, फुलांचा बाजार, भुईकाटा केंद्र, पेट्रोल पंप विभाग तसेच मोशी, उत्तमनगर, मांजरी आणि खडकी येथील उपबाजारही बंद होते. बुधवारी बाजार समितीचे मुख्य कार्यालयदेखील बंद ठेवण्यात आले होते.
फेडरेशन ऑफ ट्रेड असोसिएशन ऑफ पुणे (पुणे व्यापारी महासंघ), दि पूना मर्चंटस चेंबर, अखिल फुलबाजार अडते असोसिएशन, पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघ, अडते असोसिएशन, दि पूना प्लायवूड डीलर्स असोसिएशन, दि पूना टिंबर मर्चंटस अँड सॉ मिल ओनर्स असोसिएशन, हमाल पंचायत, श्री छत्रपती शिवाजी महाराज कामगार युनियन आदी संघटनांच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली.
25 फुटी भव्य रांगोळीतून अभिवादन
बुधवार पेठेतील श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे 20 बाय 25 फूट भव्य रांगोळी साकारत अजितदादांना अभिवादन केले आहे. रांगोळी ही जमिनीवर साकारणारी कलाकृती आहे. अजितदादा हे महाराष्ट्राच्या मातीशी नाळ जोडलेले नेते होते. त्यामुळे रांगोळीद्वारे त्यांना आदरांजली अर्पण केल्याचे ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. शिवराज कदम जहागिरदार यांनी सांगितले. या वेळी कार्यकारी विश्वस्त ॲड. रजनी उकरंडे, कोषाध्यक्ष युवराज गाडवे, उत्सव प्रमुख महेंद्र पिसाळ, उप उत्सवप्रमुख अक्षय हलवाई, विश्वस्त ॲड. प्रताप परदेशी यांसह सेवेकरी व भाविक देखील उपस्थित होते. ही रांगोळी 1 फेबुवारीपर्यंत ठेवण्यात येणार असल्याचेही ॲड. कदम यांनी नमूद केले.