Cucunber Pudhari
पुणे

Pune Market Yard Vegetable Rates: पुणे मार्केट यार्डात टोमॅटो, आले, काकडीच्या दरात वाढ; पालेभाज्याही महागल्या

पुण्यातील गुलटेकडी मार्केट यार्डात टोमॅटो, आले, काकडी आणि घेवड्याच्या दरात 10 ते 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. उन्हाळ्यामुळे पालेभाज्यांची आवक घटल्याने कोथिंबीर आणि मेथी महागल्या

पुढारी वृत्तसेवा

शंकर कवडे

पुणे: कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डात फळभाज्यांची आवक मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहे. मात्र, उन्हाच्या तडाख्यामुळे भाज्यांच्या दर्जावर परिणाम झाला आहे. आवकेच्या तुलनेत मागणी अधिक असल्याने आले, टोमॅटो, काकडी आणि घेवड्याच्या भावात दहा ते वीस टक्क्यांनी वाढ झाली आहे.

मागणी आणि पुरवठा, यामध्ये समतोल असल्याने इतर बहुतांश फळभाज्यांचे दर मागील आठवड्याप्रमाणे स्थिर आहेत. रविवारी (दि. 17) मार्केट यार्डातील घाऊक बाजारात राज्यातील विविध भागांसह परराज्यांतून सुमारे 100 ट्रक फळभाज्यांची आवक झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

परराज्यांतून झालेल्या आवकमध्ये आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेश येथून 14 ते 15 टेम्पो हिरवी मिरची, कर्नाटक येथून 3 ते 4 टेम्पो घेवडा, कर्नाटक आणि गुजरात प्रत्येकी 1 टेम्पो भुईमुग शेंग, इंदूर येथून गाजर 4 ते 5 टेम्पो, आंध्र प्रदेश, तामिळनाडू येथून तोतापुरी कैरी 5 टेम्पो, कर्नाटक येथून कोबी 3 ते 4 टेम्पो, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथून शेवगा 3 ते 4 टेम्पो, हिमाचल प्रदेश येथून मटार 7 ते 8 टेम्पो, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथून तोतापुरी कैरी 5 ते 6 टेम्पो, मध्य प्रदेश येथून लसणाची सुमारे 10 ते 12 टेम्पो, इंदूर, आग्रा, गुजरात आणि स्थानिक भागातून मिळून बटाटा 40 टेम्पो इतकी आवक झाली.

स्थानिक भागातून झालेल्या आवकमध्ये सातारी आले सुमारे 450 गोणी, भेंडी 6 ते 7 टेम्पो, गवार 3 ते 4 टेम्पो, टोमॅटो 8 हजार क्रेट, हिरवी मिरची 2 ते 3 टेम्पो, काकडी 7 टेम्पो, फ्लॉवर 10 ते 12, कोबी 5 ते 6 टेम्पो, ढोबळी मिरची 8 ते 10 टेम्पो, गाजर 8 ते 10 टेम्पो, तांबडा भोपळा 12 टेम्पो, घेवडा, पावटा प्रत्येकी 2 ते 3 टेम्पो, शेवगा 2 टेम्पो, भुईमूग शेंग 150 गोणी, कांदा सुमारे 80 टेम्पो इतकी आवक झाल्याची माहिती मार्केट यार्डमधील ज्येष्ठ आडते विलास भुजबळ यांनी दिली.

उन्हाळ्यामुळे पालेभाज्यांची आवक घटली

उन्हाळ्यामुळे पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे पालेभाज्यांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. परिणामी, आवक घटली आहे. त्यामुळे पालेभाज्यांचे भाव वाढले आहेत. कोथिंबीर आणि मेथीच्या भावात सर्वाधिक घाऊक बाजारात जुडीमागे 5 रुपयांनी वाढ झाली आहे. चुकाच्या भावात 3 रुपये, करडई, अंबाडी, राजगिरा आणि चवळईच्या भावात प्रत्येकी 2 रुपयांनी वाढ झाली आहे. मागणी आणि पुरवठा, यातील समतोलामुळे उर्वरित पालेभाज्यांचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. येथील घाऊक बाजारात रविवारी (दि.17) कोथिंबिरीची 90 हजार जुडी आवक झाली. ही आवक मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर असली, तरीही नेहमीच्या तुलनेत कमी आहे. मेथीची मागील आठवड्यात 50 हजार जुडी झालेली आवक आज 35 हजार जुडी नोंदविण्यात आली. घाऊक बाजारात कोथिंबिरीच्या जुडीला दर्जानुसार 20 ते 30 रुपये, तर मेथीच्या जुडीला 15 ते 25 रुपये मोजावे लागत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT