

पुणे: ‘फळांचा राजा’ असलेल्या कोकणातील हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, राज्यासह परराज्यांतून आंब्याची आवक वाढली आहे. परिणामी, त्याचे दरही सर्वसामान्यांच्या आवाक्यात आल्याने बाजारात आंब्याला मोठी मागणी आहे. नागरिकांनी आंब्याच्या खरेदीकडे आपला मोर्चा वळविल्याने बाजारात अन्य फळांच्या मागणीत घट झाली आहे.
बाजारात उन्हाळी बहरातील डाळिंब बाजारात दाखल होत आहे. यामध्ये पांढरे तसेच गुलाबी दाण्यांच्या डाळिंबाची आवक जास्त आहे. जवळपास हे प्रमाण ऐंशी टक्क्यांवर पोहचले आहे. त्या तुलनेत दर्जेदार डाळिंबाचे प्रमाण कमी असल्याने त्याच्या भावात दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. आवक कमी पडल्याने खरबूजही किलोमागे दोन रुपयांनी वाढले आहे.
तर, मागणीअभावी कलिंगडाच्या भावात घसरण झाली आहे. मॉन्सूनची वर्दी मिळाल्याने शेतकऱ्यांकडून लहान व कच्च्या लिंबाची तोड करून बाजारात विक्रीस पाठविण्यात येत आहे. या लिंबांमध्ये अपेक्षित रस नसल्याने मागणीअभावी त्याचे घटलेले दर टिकून आहेत.
गुलटेकडी मार्केटयाडातील फळबाजारात रविवारी (दि. 17) लिंबाची 1000 ते 1500 गोणी, मोसंबी 15 ते 20 टन, संत्रा 1 टन, डाळिंब 25 ते 30 टन, पपई 10 ते 12 टेम्पो, कलिंगड 50 ते 60 टेम्पो, खरबूज 2 ते 3 टेम्पो, चिकू 1 हजार गोणी, पेरू 200 ते 300 क्रेट, अननस 5 ट्रक आणि हापूस आंब्याची दीड ते दोन हजार पेटी आवक झाली होती.
फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रतिगोणी) : 300 ते 1200, मोसंबी : (3 डझन) : 180-450, (4 डझन) : 100-280, संत्रा : (10 किलो) : 300-1000, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : 50-200, आरक्ता : 10-50, गणेश : 5-30, कलिंगड : 7- 12, खरबूज : 20-35, पपई : 5-20, चिकू (दहा किलो) : 100-600, पेरु (20 किलो) : 300-700, अननस (1 डझन): 100-600.