Vegetable Pudhari
पुणे

Pune Market Yard Vegetable Rates: पुणे मार्केट यार्डात भाजीपाल्याची आवक वाढली; पालेभाज्यांचे भाव स्थिर, पुदिना महागला

गुजरात-कर्नाटकातून भुईमूग शेंगांची आवक; रविवारी १०० ट्रक फळभाज्या दाखल

पुढारी वृत्तसेवा

पुणे: श्रावणातील उपवासामुळे भुईमूग शेंगेला चांगली मागणी असून, स्थानिक भुईमुगाचा हंगाम संपल्याने आता गुजरात आणि कर्नाटकातून मोठ्या प्रमाणावर शेंगांची आवक होत आहे. दुसरीकडे, पावसाने उघडीप दिल्याने रविवारी गुलटेकडी मार्केट यार्डात फळभाज्यांची आवकही वाढली. वाढलेल्या आवकेच्या तुलनेत मागणीही चांगली असल्याने सर्व प्रकारच्या फळभाज्यांचे भाव गत आठवड्याच्या तुलनेत स्थिर राहिले.

गुलटेकडी मार्केट यार्डात रविवारी (दि. १६) राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून सुमारे १०० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. परराज्यांतून झालेल्या आवकमध्ये आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि कर्नाटक येथून हिरवी मिरची १५ ते १६ टेम्पो, कर्नाटक येथून कोबी ४ ते ५ टेम्पो, हिमाचल प्रदेश व कर्नाटकातून घेवडा ३ ते ४ टेम्पो, गुजरात आणि कर्नाटकातून भुईमूग शेंग ३ ते ४ टेम्पो, इंदूर येथून गाजर १० ते १२ टेम्पो, कर्नाटक येथून पावटा ३ टेम्पो, आंध्र प्रदेश व तमिळनाडू येथून शेवगा ३ ते ४ टेम्पो, मध्य प्रदेश येथून लसणाची सुमारे १० ते १२ टेम्पो, इंदूर, आग्रा येथून बटाटा ४० ते ४५ टेम्पो इतकी आवक झाली.

स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे ४०० ते ४५० गोणी, भेंडी ६ ते ७ टेम्पो, गवार ४ ते ५ टेम्पो, टोमॅटो १४ ते १५ हजार क्रेट्स, हिरवी मिरची ५ ते ६ टेम्पो, काकडी ७ ते ८ टेम्पो, फ्लॉवर ८ ते १० टेम्पो, कोबी ५ ते ६ टेम्पो, ढोबळी मिरची १० ते १२ टेम्पो, गाजर ३ ते ४ टेम्पो, तांबडा भोपळा १० ते १२ टेम्पो, मटार ३ ते ४ टेम्पो, घेवडा २ ते ३, पावटा २ टेम्पो, शेवगा २ ते ३ टेम्पो, कांदा सुमारे १०० टेम्पो इतकी आवक झाली, अशी माहिती मार्केट यार्डातील ज्येष्ठ आडते विलास भुजबळ यांनी दिली.

बहुतांश पालेभाज्यांचे भाव स्थिर

पावसाने उघडीप दिल्याने पालेभाज्यांचा दर्जा सुधारला असून, रविवारी गुलटेकडी मार्केट यार्डातील घाऊक बाजारात पालेभाज्यांची आवकही वाढली. बाजारात मागणी चांगली असल्याने पुदिना वगळता अन्य सर्व प्रकारच्या पालेभाज्यांचे भाव गत आठवड्याच्या तुलनेत स्थिर राहिले.

केवळ पुदिन्याच्या भावात शेकडा जुडीमागे ५०० रुपयांची वाढ नोंदविण्यात आली. रविवारी बाजारात कोथिंबिरीची सुमारे २ लाख २५ हजार जुडी, तर मेथीची ७० ते ८० हजार जुडी आवक झाली. गत आठवड्याच्या तुलनेत कोथिंबिरीची आवक २५ हजार जुडींनी वाढली. तर मेथीची आवक वीस ते तीस हजारांनी घटली. घाऊक बाजारात पालेभाज्यांची प्रतिजुडी ४ ते २० रुपये, तर किरकोळ बाजारात प्रतिगड्डी १० ते २५ रुपये दराने विक्री सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT