Vegetables Pudhari
पुणे

Pune Vegetable Market Rates: पुणे मार्केट यार्डात भाज्यांच्या दरात घसरण

अवकाळी पावसाचा परिणाम; आवक वाढली, मागणी कमी असल्याने दर घसरले

पुढारी वृत्तसेवा

शंकर कवडे

पुणे: कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तरकारी विभागात रविवारी राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून सुमारे 100 ट्रकमधून शेतमालाची आवक झाली. अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्याने मागील आठवड्याच्या तुलनेत आवक दहा ट्रकने कमी राहिली. बाजारात दाखल झालेल्या मालाच्या तुलनेत मागणीही कमी राहिल्याने वांगी, भेंडी व हिरव्या मिरचीच्या दरात पाच ते दहा टक्क्यांनी घसरण झाल्याचे सांगण्यात आले.

अवकाळी पावसामुळे तोडणी रखडल्याने गुलटेकडी मार्केट यार्डातील तरकारी विभागातत फळभाज्यांची आवक मागील दोन दिवसांच्या तुलनेत वाढली. मात्र, सायंकाळच्या सुमारास पाऊस हजेरी लावत असल्याने किरकोळ विक्रेत्यांचा कल कमी प्रमाणात खरेदीकडे राहिला. परिणामी, रविवारी मार्केट यार्डात शेतमालाला अपेक्षित उठाव मिळाला नसल्याची माहिती मार्केट यार्डातील ज्येष्ठ अडतदार विलास भुजबळ यांनी दिली.

परराज्यांतून झालेल्या आवकेमध्ये कर्नाटक, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश येथून हिरवी मिरची सुमारे 15 ते 16 टेम्पो, कर्नाटक येथून कोबी 5 ते 6 टेम्पो, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथून शेवगा 4 ते 5 टेम्पो, राजस्थानातून गाजर सुमारे 1 टेम्पो, इंदूर येथून गजर 5 ते 6 टेम्पो, कर्नाटक येथून घेवडा 2 ते 3 टेम्पो, भुईमूग शेंग कर्नाटक आणि गुजरातमधून प्रत्येकी 4 ते 5 टेम्पो, कर्नाटक येथून पावटा 2 ते 3 टेम्पो, आंध्र, कर्नाटक, तामिळनाडूतून तोतापुरी कैरी 5 ते 6 टेम्पो, मध्य प्रदेश येथून लसणाची सुमारे 10 ते 12 टेम्पो तर इंदूर, आग्रा, गुजरात आणि स्थानिक भागातून बटाटा 40 ते 42 टेम्पो इतकी आवक झाली होती.

स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे 500 ते 600 गोणी, भेंडी 5 ते 6 टेम्पो, गवार 3 ते 4 टेम्पो, टोमॅटो 8 ते 10 हजार क्रेट, हिरवी मिरची 3 ते 4 टेम्पो, काकडी 7 ते 8 टेम्पो, फ्लॉवर 10 ते 12, कोबी 5 ते 6 टेम्पो, ढोबळी मिरची 10 ते 12 टेम्पो, गाजर 5 ते 6 टेम्पो, तांबडा भोपळा 10 ते 12 टेम्पो, घेवडा 4 ते 5 टेम्पो, पावटा 2 टेम्पो, पारनेर मटार 8 ते 10, शेवगा 3 ते 4 टेम्पो, कांदा सुमारे 70 ते 80 टेम्पो इतकी आवक झाली होती.

पालेभाज्यांची आवक स्थिर

मार्केट यार्डात पालेभाज्यांची आवक मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहे. मात्र, गॅस तुटवड्यामुळे हॉटेल, खानावळी बंद असल्याने मालाला उठाव नाही. त्यामुळे शेपू, पुदिन्याच्या भावात घाऊक बाजारात जुडीमागे प्रत्येकी 2 रुपये, तर अंबाडी आणि राजगिराच्या भावात प्रत्येकी 1 रुपयाने घट झाली. तर आवकेच्या तुलनेत मागणी अधिक असल्यामुळे चवळईच्या भावात मात्र जुडीमागे 3 रुपयांनी वाढ झाली आहे. मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे पालेभाज्यांचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. मार्केट यार्डातील घाऊक बाजारात रविवारी (दि. 5) कोथिंबिरीची सव्वा लाख जुडी, तर मेथीची 60 हजार जुडीची आवक झाली. ही आवक मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहे. घाऊक बाजारात कोथिंबिरीच्या जुडीला दर्जानुसार 8 ते 15 रुपये भाव मिळत असल्याचेही या वेळी सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT