Market Yard Vegetable Pudhari
पुणे

Pune Market Yard Vegetable Arrival: मुसळधार पावसाचा गुलटेकडी मार्केट यार्डला फटका; फळभाज्यांची आवक ४० टक्क्यांनी घटली

शेतकऱ्यांनी शेतमाल पाठविणे टाळले; खरेदीदारांचीही बाजाराकडे पाठ, मात्र भाजीपाल्याच्या दरांवर फारसा परिणाम नाही

पुढारी वृत्तसेवा

पुणे: शहरासह राज्याच्या विविध भागांत मान्सून सक्रिय झाल्याने गेल्या पाच दिवसांपासून सातत्याने पाऊस सुरू आहे. पावसाच्या रिपरिपीमुळे शेतमालाची तोड कमी झाली असून, सोमवारी (दि.६) हवामान विभागाने 'रेड अलर्ट' जारी केल्याने शेतकऱ्यांनीही कमी प्रमाणात शेतमाल विक्रीसाठी पाठविला.

परिणामी, गुलटेकडी मार्केट यार्डात फळभाज्यांची आवक सुमारे ३० ते ४० टक्क्यांनी घटली. पावसामुळे खरेदीदारांनीही शेतमाल खरेदीकडे पाठ फिरवल्याने सोमवारी बाजारात शुकशुकाटाचे वातावरण होते. शेतमालाला उठाव कमी मिळाल्याने भावांवर मात्र फारसा परिणाम झाला नाही. पुणे विभागात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी नद्या दुथडी भरून वाहत असून, काही रस्ते वाहतुकीसाठी बंद केले आहेत.

सततच्या पावसामुळे शेतमालाच्या तोडीवरही मर्यादा आल्या आहेत. तसेच, वाहतुकीदरम्यान गाड्या रस्त्यात अडकून शेतमालाचे नुकसान होण्याची शक्यता लक्षात घेऊन बहुतांश शेतकऱ्यांनी माल विक्रीसाठी पाठविणे टाळले. सोमवारी मार्केट यार्डाच्या मुख्य बाजारात १ हजार ५४ वाहनांमधून शेतमालाची आवक झाली. साधारणपणे इतर दिवशी ही आवक १ हजार ४०० ते १ हजार ६०० वाहनांपर्यंत असते.

दुसरीकडे, पावसामुळे ग्राहक घराबाहेर पडणार नाहीत, या शक्यतेमुळे व्यापारी आणि खरेदीदारांनीही शेतमाल खरेदीत फारसा उत्साह दाखविला नाही. त्यामुळे बाजारात सर्वत्र शुकशुकाट होता. बाजारात दाखल झालेला बहुतांश शेतमाल विक्रीविनाच पडून राहिला. मात्र, शेतमालाच्या दरांवर विशेष परिणाम झालेला नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, गूळ- भुसार बाजारातील व्यवहारांवर पावसाचा विशेष परिणाम झाला नसल्याची माहिती व्यापारी वर्गाने दिली.

१ हजार ५४ वाहनांमधून शेतमालाची आवक

पुणे कृषी उत्पन्‍न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डात सोमवार ते गुरुवार बाजारात शेतमालाची आवक साधारण होत असते. तर, शुक्रवार आणि रविवारी शेतमालाची मोठी आवक होत असते. सोमवारी तरकारी विभागात ४१०, कांदा- बटाटा ४२२, तर फळविभागात २२२ वाहनांतून अशी एकूण १ हजार ५४ वाहनांतून शेतमालाची आवक झाली. ट्रक, टेम्पो आणि पिकअपमधून हा शेतमाल विक्रीसाठी दाखल झाला. नेहमीच्या तुलनेत ही आवक सुमारे ५०० ते ५५० वाहनांनी कमी होती, अशी माहिती तरकारी आणि फळ विभागप्रमुख बाळासाहेब कोंडे यांनी दिली.

मागील दोन दिवस सुरू असलेल्या संततधार पावसामुळे खरेदीदारांची बाजारातील वर्दळ लक्षणीय घटली. त्यामुळे फळभाज्यांच्या विक्रीवर मोठा परिणाम झाला. नेहमीच्या तुलनेत व्यवहार अत्यल्प झाले असून, दिवसभर बाजारपेठेत मंदीचे वातावरण होते.
अमोल घुले, अध्यक्ष, श्री शारदा गजानन अडते असोसिएशन
सततच्या पावसामुळे फुलांची आवक सुमारे पन्नास टक्क्यांनी घटली. बाजारात आलेल्या बहुतांश फुलांमध्ये ओलाव्याचे प्रमाण जास्त होते. मात्र, खरेदीदारच नसल्याने आवक घटूनही फुलांच्या भावातही घट झाली.
सागर भोसले, समन्वयक, फूलबाजार अडते असोसिएशन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT