पुणे: छत्रपती संभाजीनगर येथील मोसंबी तसेच अहिल्यानगर भागातील संत्रीचा हंगाम बहरल्याने गुलटेकडी मार्केट यार्डातील या फळांची आवक वाढली आहे. गत आठवड्याच्या तुलनेत रविवारी मोसंबीची आवक दहा, तर संत्रीची आवक दोन टनांनी वाढली. बाजारात दाखल झालेल्या मालाला मागणीही चांगली राहिल्याने त्यांचे दर टिकून राहिल्याचे सांगण्यात आले.
लहरी वातावरणामुळे साथींच्या आजारांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यापार्श्वभूमीवर बाजारात ड्रॅगन फ्रूट आणि पपईला मागणी वाढली आहे. बाजारात होत असलेल्या मागणीच्या तुलनेत आवक कमी पडल्याने या ड्रॅगनच्या भावात दहा टक्क्यांनी तर पपईच्या भावात किलोमागे एक ते दोन रुपयांची वाढ झाली आहे.
गुजरातमधील चिक्कूचा हंगाम सुरू झाल्याने मार्केट यार्डातील फळबाजारात चिक्कूची आवक वाढू लागली आहे. याखेरीज, गुजरात, कर्नाटक आणि राज्याच्या विविध भागांतूनही तुरळक आवक होत आहे. श्रावण महिना सुरू असल्याने फळांना मोठी मागणी आहे. बहुतांश फळांची आवक जावक कायम असल्याने त्यांचे गत आठवड्यातील दिर टिकून आहेत, अशी माहिती फळव्यापाऱ्यांनी दिली.
फळबाजारात रविवारी (दि. ६) लिंबू ८०० ते १००० गोणी, मोसंबी ६० ते ७० टन, संत्रा ५ ते ७ टन, डाळींब १३० ते १४० टन, पपई १० ते १५ टेम्पो, कलिंगड ४ ते ५ गाड्या, खरबूज २ ते ३ टेम्पो, चिक्कू ४०० ते ५०० डाग, पेरु ४०० ते ६०० क्रेट, पिअर ५ गाड्या, सिताफळ ८ ते १० टन आणि अननसाची ६ ट्रक इतकी आवक झाली होती.
फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रतिगोणी) : ५०० ते २७००, मोसंबी : (३ डझन) : ११०-२५० (४ डझन) : ४०-१००, संत्रा : (१० किलो) : २००-७००, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : ६०-१४०, आरक्ता : २५-७०, गणेश : २०-४०, कलिंगड : ८-१०, खरबूज : २०-३०, पपई : २०-३५, चिक्कू (दहा किलो) : १००-६००, पेरू (२० किलो) : ४००-६००, अननस (१ डझन) : ३००-९००, सिताफळ (१ किलो) : २०-१४०, पिअर (२४ ते २५ किलो) : ३५००-४०००.