पुणे

पुण्यात वादग्रस्त होर्डिंगप्रकरणी तीन परवाना निरीक्षकांना दणका

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाचे नियम धाब्यावर बसवून टिळक चौकात उभारण्यात आलेल्या होर्डिंगकडे दुर्लक्ष करणे कसबा विश्रामबाग क्षेत्रीय अधिकारी आणि कर्मचारी यांना चांगलेच भोवले आहे. याप्रकरणी तीन परवाना निरीक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून, त्यांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार यांनी दिले आहेत.

परवाना निरीक्षक राजेंद्र केवटे, सुरेंद्र राऊत, लक्ष्मीकांत शिंदे अशी निलंबित कर्मचार्‍यांची नावे आहेत. टिळक चौकातील संभाजी पोलिस चौकीमागे महापालिकेकडून तीन होर्डिंग उभारण्यास परवानगी देण्यात आली आहे. आकाशचिन्ह नियमानुसार प्रत्येक होर्डिंगमध्ये किमान एक मीटरचे अंतर ठेवणे बंधनकारक असताना ते अंतर न ठेवताच संबंधित व्यावसायिकाने सलग 100 फुटांचे तीन होर्डिंग उभारले होते. येथील निरीक्षकांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते.

याबाबत दै. 'पुढारी'ने लक्ष वेधल्यानंतर अतिरिक्त आयुक्त डॉ. खेमणार यांच्यासह उपायुक्त माधव जगताप, अविनाश सकपाळ या अधिकार्‍यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन या होर्डिंगची पाहणी केली. त्यात हे होर्डिंग उभारताना नियम धाब्यावर बसविण्यात आले होते. प्रामुख्याने होर्डिंगसाठी वृक्षतोड करण्याबरोबरच नदीपात्रात राडारोडा टाकल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे संबंधित होर्डिंगवर जाहिरात लावण्यास मनाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. असे असतानाही त्यावर जाहिरात लावण्यात आल्याचे समोर आले होते. या सर्व अनियमिततेप्रकरणी संबंधित तीन परवाना निरीक्षकांना नोटीस बजावून खुलासा मागविण्यात आला होता. मात्र, त्यांच्याकडून समाधानकारक खुलासा न आल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे डॉ. खेमणार यांनी सांगितले.

होर्डिंग उभारताना अनेक नियमांची पायामल्ली झाली असल्याचे निदर्शनास आले होते. याप्रकरणी परवाना निरीक्षकांनी कामात हलगर्जीपणा केल्याचे स्पष्ट झाल्याने तीन जणांचे निलंबन केले आहे. त्यांची विभागीय चौकशी करून पुढील कारवाई केली जाईल तसेच होर्डिंगवरही कारवाई केली जाणार आहे.

– डॉ. कुणाल खेमणार,
अतिरिक्त आयुक्त, महापालिका

हेही वाचा

SCROLL FOR NEXT