पुणे: प्रत्येक महिलेत श्री महाकाली, श्री महालक्ष्मी आणि श्री महासरस्वती या आदिशक्तीच्या त्रिदेवी स्वरूपाचा वास असतो. त्यामुळे समाजाच्या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा 'नारी तू नारायणी' सन्मान देऊन गौरव करण्यात आला. आंतरराष्ट्रीय फेरारी महिला रेसर डायना पंडोल, सोल्जर्स इंडिपेंडंट रिहॅबिलिटेशन फाउंडेशनच्या संस्थापक सुमेधा चिथडे, सामाजिक कार्यकर्त्या सत्यभामा देशमाने यांना श्री महालक्ष्मी मंदिरात सन्मानित करण्यात आले.
श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबागच्या वतीने मंदिरात हा कार्यक्रम पार पडला. या वेळी महापौर मंजूषा नागपुरे, ट्रस्टच्या विश्वस्त आणि उत्सवप्रमुख डॉ. तृप्ती अग्रवाल, विश्वस्त भरत अग्रवाल, अॅड. प्रताप परदेशी, प्रवीण चोरबेले आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमानंतर मान्यवरांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली.
नागपुरे म्हणाल्या, अनेक स्त्रिया विविध प्रकारचे समाजोपयोगी कार्य करत असतात. त्यांचे कार्य समाजासमोर आणून त्यांचा सन्मान करणे हा वेगळा उपक्रम आहे. यामुळे बाकीच्यांना यातून प्रेरणा मिळते. संघटन आणि शक्ती यातून राष्ट्रहितासाठी कार्य व्हायला हवे, असेही त्यांनी सांगितले.
पुरस्काराला उत्तर देताना चिथडे म्हणाल्या, राष्ट्रभक्ती, सेवा आणि प्रेम भावनेने देशासाठी कार्य करायला हवे. आपण नेहमी उत्सवांच्या आनंदात असतो. मात्र, त्यावेळी जवानांची आठवण देखील ठेवायला हवी. आपण किती पैसे कमावतो, यापेक्षा जवानांसाठी किती देतो, हे महत्त्वाचे आहे. समाजातील सगळ्या गरजू घटकांसाठी काम होते. मात्र, ज्या जवानांमुळे आपण आहोत, त्यांचा सन्मान ठेवण्याकरिता आपण पुढाकार घ्यायला हवा. आत्मकेंद्रित न होता, राष्ट्र केंद्रित होण्याकडे वाटचाल करायला हवी, असेही त्या म्हणाल्या. सत्यभामा बाबाराव देशमाने यांनी मनोगतातून आपला खडतर प्रवास सांगितला. युवराज लाहोटी यांनी सूत्रसंचालन केले.
श्री महालक्ष्मी देवीला सोन्याची साडी; आज रात्री रावण दहन
दसऱ्याच्या दिवशी मंगळवारी (दि. २०) श्री महालक्ष्मीदेवीला सोन्याची साडी परिधान करण्यात येणार आहे. तर सुमारे २ किलो सोन्यापासून तयार करण्यात आलेला रत्नजडित मुकुट देवीला आधीच परिधान करण्यात आला आहे. संपूर्ण नवरात्रोत्सवात हा मुकुट पाहण्याची संधी देवीभक्तांना मिळाली. ती दसऱ्याच्या दिवशीही मिळणार आहे, तर रात्री ९.३० वाजता भव्य दिव्य रावणदहन कार्यक्रम देखील होणार आहे. विश्वकर्मा विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी भव्य रावणाची प्रतिकृती साकारली आहे.