Pune Cycle Tracks: पुण्यात ७५ किमीचे सायकल ट्रॅक उभारणार; जुन्या ट्रॅकच्या अपयशातून महापालिका घेणार धडा?

पहिल्या टप्प्यात ७५ किमीचे सुरक्षित मार्ग; पुढील टप्प्यात १३६ किमीपर्यंत विस्ताराचे नियोजन
Cycle Tracks
Cycle TracksPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: पुण्याची एकेकाळची 'सायकलींचे शहर' ही ओळख पुन्हा निर्माण करण्यासाठी महापालिकेने सायकल ट्रॅकचे जाळे विकसित करण्याची तयारी सुरू केली आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी मोठ्या अपेक्षेने उभारलेले सायकल ट्रॅक अतिक्रमणे, देखभालीचा अभाव आणि रस्ते व पदपथांच्या कामांमुळे वापरातून बाद झाले. काही ठिकाणी रस्तेरुंदीकरणात ट्रॅक तोडले गेले, तर काही ठिकाणी पदपथांच्या रुंदीकरणात त्यांचे अस्तित्वच नष्ट झाले. आता हेच सायकल ट्रॅक पुन्हा विकसित करण्याची वेळ महापालिकेवर आली आहे. सुरुवातीला ७५ किलोमीटरचे सलग, सुरक्षित आणि वापरण्यायोग्य सायकल मार्ग विकसित करून पुढील टप्प्यात हे जाळे १३६ कि.मी.पर्यंत नेण्याचे नियोजन आहे. त्यामुळे आधी उभारलेले ट्रॅक का टिकले नाहीत आणि नव्याने तयार होणारे ट्रॅक प्रत्यक्षात किती उपयोगी ठरणार, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

Cycle Tracks
Pune Swargate Extortion Case: पुण्यात अपघाताच्या भरपाईच्या नावाखाली तरुणीकडून ५० हजार उकळल्याचा आरोप; करिअर उद्ध्वस्त करण्याची धमकी

शहरात ७५ कि.मी. लांबीचे सलग, सुरक्षित सायकल मार्गांचे जाळे विकसित करण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांनी पथ विभागाला दिले आहेत. शहरातील सध्याच्या सायकल मार्गांमधील तुटक जोडणी, अपूर्ण मार्ग आणि आवश्यक सुधारणा यांचा आढावा घेऊन ही कामे पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासंदर्भात सोमवारी (दि. १९) झालेल्या बैठकीत इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्स्पोर्टेशन अँड डेव्हलपमेंट पॉलिसी संस्थेच्या वतीने शहरातील प्रस्तावित ७५ कि.मी.च्या सायकलमार्गांबाबत सादरीकरण करण्यात आले. या वेळी सध्याच्या सायकलमार्गांमधील त्रुटी, मार्गांची अपूर्ण जोडणी आणि आवश्यक पायाभूत सुविधांबाबत चर्चा झाली. शहरातील सायकलमार्गांची सद्य:स्थिती तपासून त्यातील त्रुटी दूर कराव्यात, विविध मार्गांवरील अपूर्ण जोडणी पूर्ण करावी आणि सायकलस्वारांना सुरक्षितपणे प्रवास करता येईल, असे सलग सायकलमार्ग विकसित करावेत, असे निर्देश आयुक्तांनी दिले. ही कामे पुणे ग्रँड टूर २०२७ च्या अनुषंगाने सुरू असलेल्या विकासकामांशी समन्वय साधून करण्यात येणार आहेत.

Cycle Tracks
Pune Yerawada Drainage Accident: पुण्यात ड्रेनेजच्या १५ फूट खोल खड्ड्यात पडून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

शहरातील वाहतूक कोंडी कमी करणे, खासगी वाहनांवरील अवलंबित्व घटवणे आणि पर्यावरणपूरक वाहतुकीला प्रोत्साहन देणे, या उद्देशाने सायकल ट्रॅक उभारण्यावर भर देण्यात आला होता. २०१६-१७ च्या सुमारास शहरात सायकलमार्गांच्या विकासाचे नियोजन करण्यात आले होते. यासाठी 'पुणे सायकल प्लॅन' आणि 'सर्वसमावेशक सायकल मास्टर प्लॅन'ला देखील मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर पुण्यात विविध मार्गांवर कोट्यवधी रुपये खर्चून हे ट्रॅक तयार करण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात तयार झालेल्या मार्गांचे जाळे सलग राहिले नाही. अनेक ठिकाणी ट्रॅकवर वाहनांचे पार्किंग, फेरीवाल्यांचे अतिक्रमण आणि इतर अडथळे निर्माण झाले. परिणामी, सायकलस्वारांसाठी स्वतंत्र मार्ग उपलब्ध असूनही त्यांचा प्रभावी वापर होऊ शकला नाही.

Cycle Tracks
Baramati Shakambhari Devi Temple: बारामतीतील शाकंभरीदेवी मंदिरात नवरात्रोत्सवाची भक्तिमय धूम; जीर्णोद्धारासाठी भाविकांना मदतीचे आवाहन

ट्रॅक उभारले; पण देखभाल आणि संरक्षणाचा अभाव

रस्ते व पदपथ रुंदीकरणात शहरातील अनेक मार्गावरील सायकल ट्रॅक नामशेष झाले आहे, तर पुण्यातील बेशिस्त वाहतुकीमुळे हे सायकल ट्रॅक वापरणे अशक्य झाले. काही मार्गांवरील ट्रॅक तुटक आहेत, तर काही ठिकाणी त्यांची स्पष्ट ओळखच राहिलेली नाही. त्यात अतिक्रमणांमुळे सायकलस्वारांना प्रत्यक्ष रस्त्यावरून जावे लागते. परिणामी सायकल ट्रॅक उभारण्यावर झालेला खर्च आणि त्यातून अपेक्षित असलेला सार्वजनिक वाहतुकीला पूरक पर्यायाचा हेतू साध्य झाला का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

आंतरराष्ट्रीय स्पर्धा; पण शहरात सायकलस्वारांची गैरसोय

पुण्यात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सायकल स्पर्धांचे आयोजन केले जात असताना शहरातील नागरिकांना मात्र नियमित सायकल प्रवासासाठी सुरक्षित आणि सलग मार्गांची कमतरता जाणवते. पुणे ग्रँड टूर-२०२७ च्या पार्श्वभूमीवर रस्ते आणि सायकलमार्गांच्या विकासाला गती देण्याचे नियोजन आहे. परंतु, स्पर्धेसाठी मार्ग विकसित करण्यापुरते प्रयत्न मर्यादित न राहता ते शहरातील नागरिकांच्या दैनंदिन वापरासाठीही उपयुक्त ठरणे आवश्यक आहे.

Cycle Tracks
Pune Graduate Teacher Constituency Election: पुणे पदवीधर, शिक्षक मतदारसंघात महायुतीच्या विजयासाठी मोर्चेबांधणी; मुळशीतून विक्रमी मताधिक्याचा निर्धार

गणेशखिंड रस्त्यावर दोन्ही बाजूंना ट्रॅकचा विचार

गणेशखिंड रस्त्यावर दोन्ही बाजूंना सायकल ट्रॅक विकसित करण्याचाही विचार सुरू आहे. या रस्त्यावर यापूर्वी एका बाजूला सायकल ट्रॅक तयार केला होता. आता दोन्ही बाजूंना मार्ग उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावावर चर्चा होत आहे. या रस्त्यावरील सायकलमार्ग आणि इतर विकासकामे पीएमआरडीए तसेच टाटा यांच्या प्रकल्पांशी समन्वय साधून करण्याची गरजही व्यक्त करण्यात आली. मात्र, दोन्ही बाजूंना ट्रॅक उभारण्याबाबत अंतिम निर्णय, कामाचा खर्च आणि कालमर्यादा अद्याप निश्चित झालेली नाही.

पुण्यात आंतरराष्ट्रीय दर्जाची ग्रँड टूर ही सायकल स्पर्धा घेलली जाते. सायकल चालवणाऱ्यांसाठी मात्र, चांगले ट्रॅक शहरात नाहीत. त्यामुळे येत्या काळात ७५ कि.मी. लांबीचे सायकल ट्रॅक उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

नवल किशोर राम, आयुक्त, महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news