आशिष देशमुख
पुणे : सिंध सोसायटी भागात सर्च ऑपरेशन सुरू असताना सोमवारी बिबट्याचे केस आणि पावलांचे नवे ठसे दिसले. त्यामुळे बिबट्या याच परिसरात असल्याचे पुरावे हाती आलेत. मात्र तो एकाच जागी राहत नसल्याने सिंध, नॅशनल, आरबीआय सोसायटी या भागासह सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठालाही सतर्कतेची सूचना देण्यात आली आहे. वनाधिकाऱ्यांच्या मते, बिबट्या शहरातील कोणत्याही टेकडीच्या परिसरात जाऊ शकतो. दै. ‘पुढारी’ने रात्री त्या ठिकाणी जाऊन केलेला हा ऑन द स्पॉट रिपोर्ट...
औंध-बाणेर भागात पहाटे दिसलेला बिबट्या अजूनही वन विभागाला सापडलेला नाही. दरम्यान हा व्हिडीओ खरा असून, त्या भागात खरोखर बिबट्याचे वास्तव्य आहे. त्यामुळे सिंध, नॅशनल, आरबीआय सोसायटी या भागासह सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात तो लपला असण्याची शक्यता आहे. अशी माहिती पुणे वन विभागाचे वनसंरक्षक आशिष ठाकरे यांनी दिली. तसेच लोहगाव विमानतळावरही बिबट्याचे वास्तव्य असल्याने विमानतळावरही सर्च मोहीम राबवण्यात आली. रविवार, 23 नोव्हेंबरला आरबीआय व सिंध सोसायटी परिसरात पहाटे 3.30 ते 4 च्या सुमारास सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्याचा वावर दिसला. त्यामुळे या भागातील नागरिकांनी पोलिसांसह वन विभागाला खबर दिली. वन विभागाचे सर्वच अधिकारी कर्मचारी आणि रेस्क्यू टीमने हा परिसर सील करून बिबट्याला शोधण्याची मोहीम हाती घेतली. त्या ठिकाणी वन विभागाचे 30 तर रेस्क्यू संस्थेचे 10 असे एकूण 40 कर्मचारी बिबट्याचा शोध घेत आहेत. मात्र रविवारी पहाटे 4 ते रात्री 11 पर्यंत 20 तासांच्या शोधमोहिमेत बिबट्या कुठेही पुन्हा दिसला नाही.
वन विभागाचे अधिकारी सहाय्यक वनरक्षक विशाल चव्हाण यांच्यासह अधिकारी मनोज बारबोले यांनी सोमवारी सायंकाळी 6 पासून बिबट्याची शोधमोहीम सुरू केली. त्यांनी सिंध सोसायटीत रात्री 7 वाजता थर्मल ड्रोन आकाशात सोडला. ते म्हणाले की, रात्री बिबट्या बाहेर पडण्याची शक्यता जास्त असते, त्यामुळे आमची शोधमोहीम सायंकाळी 6 नंतर सुरू होते. यात थर्मल ड्रोनच्या सहाय्याने त्याचा शोध घेतला जातो. रविवारी रात्री 7.30 वाजता थर्मल ड्रोन या भागात सोडला होता. मात्र बिबट्याचे दर्शन झाले नाही. त्यामुळे सोमवारी सायंकाळी पुन्हा शोधमोहीम राबवली असता त्याचे केस आमच्या हाती लागले. तसेच पावलांचे ताजे ठसे दिसून आले. त्यामुळे तो याच भागात आहे. मात्र तो एकाच ठिकाणी थांबत नाही. त्यामुळे आजूबाजूचा सर्व परिसर अन् टेकड्या, सरकारी संस्था, खासगी कार्यालयांसह नागरिकांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.
सोमवारी दिवसभर अफवांचे पेव फुटले होते. आमच्या सोसायटीत दिसला? तुमच्याकडे दिसला का? अशा चर्चा सुरू होत्या. कोथरूड, पाषाण, बाणेर या भागातून नागरिकांचे फोन वनअधिकाऱ्यांना येत होते. मात्र हे सर्व कॉल फेक निघाले आहेत अशी माहिती वनअधिकारी मनोज बारबोले यांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना दिली. रात्री साडेअकरा वाजता सेंड जोसेफ हायस्कूल बाणेर येथे बिबट्या नागरिकांना दिसल्याचे फोन कॉल सुरू झाले मात्र याला वनअधिकाऱ्यांनी दुजोरा दिला नाही.
या भेटीदरम्यान, पथकाने 4 स्थानांची पाहणी केली जिथे बिबट्या पूर्वी दिसला होता. सध्या, त्या ठिकाणी तीन कॅमेरा ट्रॅप बसवले आहेत. तथापि, 19 नोव्हेंबरला सकाळी बिबट्या शेवटचा दिसला असल्याने, तो कोणत्याही कॅमेरा ट्रॅपमध्ये कैद झालेला नाही.या परिसरातील विविध बोगद्यांची सखोल तपासणी केली. भारतीय हवाई दलाने आता हे बोगदे पूर्णपणे सील केले आहेत, जेणेकरून बिबट्या आत लपला नाही याची खात्री करण्यात आली. तरीही, हा प्राणी आजूबाजूच्या झाडीत लपला असण्याची शक्यता जास्त आहे.
बिबट्या पुन्हा दिसला तर पिंजरा बसवण्याबाबत आणि त्याला सुरक्षितपणे पकडण्यासाठी योग्य पद्धती वापरण्याबाबत पुढील निर्णय घेतले जातील.
वनअधिकारी विशाल चव्हाण, मनोज बारबोले यांच्याशी झालेला संवाद
सिंध सोसायटीत नेमके काय सुरू आहे, आजची नेमकी प्रगती काय?
- रविवारी पहाटे 4 पासून सुरू झालेली सर्च मोहीम रात्री उशिराही सुरूच होती. सोमवारी बिबट्याचे केस अन् पावलांचे ताजे ठसे दिसले. त्यामुळे तो या परिसरात आहे. याचे पुरावे मिळाले.
- तो कुठे गेला असेल किंवा लपला असेल?
- याची कल्पना करणे अवघड आहे. कारण बिबट्या हा अत्यंत चपळ प्राणी असून, तो एकाच जागी कधीही थांबत नाही. त्यामुळे आमचे सर्च ऑपरेशन औंध-बाणेर परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी सुरू आहे.
- सिंध सोसायटीत कशी स्थिती आहे?
- आम्ही येथील नागरिकांची बैठक घेतली. त्यांना अंधारात घराबाहेर पडू नका. तसेच बिबट्या दिसला तर काय करावे, कुठे सूचना द्यावी याची माहिती दिली. तसेच थर्मल ड्रोनने सर्व परिसर पिंजून काढला जात आहे. या ड्रोनमुळे तो लवकरच शोधता येतो. मात्र अजून तो ड्रोनमध्ये चित्रित झालेला नाही.
- नागरिकांनी काय काळजी घ्यावी..?
- शक्यतो पहाटे किंवा गरज नसताना रात्रीच्या अंधारात बाहेर पडू नये. अफवांवर विश्वास ठेवू नये. एआयच्या सहाय्याने कुठलेही व्हिडीओ तयार करून दहशत पसरवू नये. कारण आज पसरलेल्या सर्व अफवा खोट्या होत्या. बिबट्या पकडला गेला. तो कोथरूडमध्ये सापडला वगैरे अफवा पसरल्या त्या सर्व खोट्या आहेत.
- बिबट्याचा व्हिडीओ खरा आहे का?
- होय, तो व्हीडीओ खरा आहे.
- मग तो व्हीडीओ मॉर्फ असल्याची चर्चा का आहे?
- काही लोक असे व्हीडीओ करतात त्यांना वचक बसावा म्हणून कडक कारवाईच्या सूचना दिल्याने ही चर्चा असावी. तो व्हीडीओ खरा असून, आरबीआय सोसायटीतील सीसीटीटीव्ही फुटेज खरे आहे.
- आता तुम्ही नेमके काय करणार आहात?
- रविवारपासून आमचे 30 ते 40 कर्मचारी तेथे तैनात आहेत. शिवाय पोलिस बंदोबस्त आहे. त्या सर्व परिसरात दाट झाडी असल्याने बिबट्या तेथेच असण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात देखील तो असू शकतो ही शक्यता गृहित धरून आम्ही कुलगुरूंची भेट घेतली व विद्यापीठातील नागरिकांचा मॉर्निंग वॉक सध्या बंद करावा अशी विनंती केली आहे. आमची शोधमोहीम सुरूच आहे. पण अजून बिबट्या दिसलेला नही.
वनसंरक्षक आशिष ठाकरे यांना लोहगाव विमानतळावरील बिबट्याच्या वास्त्यव्याबाबत विचारले असता, ते म्हणाले की, तेथे बिबट्याचे वास्तव्य आहे ही बातमी खरी आहे. मात्र तो आजवर धावपट्टीपर्यंत आलेला नाही. आसपासच्या परिसरात तो लपून बसला आहे. हे विमानतळ लष्कराच्या अखत्यारीत असल्याने आम्हाला वारंवार थर्मल ड्रोनने पाहणी करता येत नाही. यापूर्वी एकदा परवानगी घेऊन थर्मल ड्रोन वापरला. मात्र त्यात बिबट्या दिसला नाही. परंतु त्या परिसरात आमची शोधमोहीम सुरू आहे. दुपारी त्या ठिकाणी शोधमोहीम राबवली. त्यात विमानतळ अधिकाऱ्यांना बिबट्या कुठे लपू शकतो, अशा जागांची माहिती देण्यात आली.