Drug Pudhari
पुणे

Pune FDA Raid: पुणे–कोल्हापुरात FDA ची धडक कारवाई; 24.81 लाखांचा बेकायदेशीर औषधसाठा जप्त

नियमभंग आणि परवाना नसलेल्या औषधांवर छापे; बेकायदेशीर विक्रेत्यांविरोधात कडक इशारा

पुढारी वृत्तसेवा

पुणे: आरोग्याशी तडजोड करणाऱ्या आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बेकायदेशीर औषध व्यावसायिकांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. एफडीएने पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यांत केलेल्या धडक कारवाईत तब्बल २४ लाख ८१ हजार रुपयांचा औषधसाठा जप्त केला आहे. या कारवाईमुळे औषध विक्रेते आणि कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत.

कोल्हापुरातील ''मे. मेडटॅब्स फार्मा प्रा. लि.'' या कंपनीवर एफडीएच्या पथकाने छापा टाकला. तपासणीदरम्यान, कंपनीकडे औषधांच्या खरेदी-विक्रीसाठी आवश्यक असणारे परवाने आणि वैध कागदपत्रे नसल्याचे समोर आले. तेथे मोठ्या प्रमाणावर अ‍ॅलोपॅथिक औषधे, विशेषतः प्रतिजैविक (Antibiotic) इंजेक्शनचा साठा आढळून आला. औषधे व सौंदर्यप्रसाधने अधिनियम १९४० चे उल्लंघन केल्याप्रकरणी प्रशासनाने १३ लाख ६२ हजार १४७ रुपयांचा २९ प्रकारच्या औषधांचा साठा जप्त केला आहे.

पुण्यात नियमांची पायमल्ली

पुणे जिल्ह्यातील वडकी येथील ‘मे. सिप्ला फार्मा अँड लाइफ सायन्सेस लिमिटेड’च्या गोदामाची तपासणी करण्यात आली. यावेळी ‘रेक्टीन प्लस टॅब्लेट’ या ‘शेड्यूल एच’ वर्गातील औषधाच्या पॅकेजिंगवर जाहिरातबाजी केल्याचे आढळून आले. औषधे व सौंदर्यप्रसाधने नियम १९४५ नुसार, अशा प्रकारची जाहिरात करणे नियमांच्या विसंगत आहे. त्यामुळे प्रशासनाने सुमारे ११ लाख १९ हजार रुपयांचा औषधसाठा जप्त केला.

एफडीएचे नागरिकांना आवाहन

बेकायदेशीर औषधविक्री रोखण्यासाठी नागरिकांनी केवळ अधिकृत आणि परवानाधारक विक्रेत्यांकडूनच औषधे खरेदी करावीत, असे आवाहन एफडीएने केले आहे. तसेच, कोठेही संशयास्पद विक्री किंवा साठा आढळल्यास त्याची तातडीने प्रशासनाला माहिती द्यावी, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

जनतेच्या आरोग्याशी खेळ खपवून घेणार नाही

राज्यात औषध उत्पादन, साठवणूक आणि विक्री क्षेत्रातील कोणतीही बेकायदेशीर बाब खपवून घेतली जाणार नाही. जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांविरुद्ध ही कठोर आणि सातत्यपूर्ण कारवाई अशीच सुरू राहील, असा इशारा अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT