

पुणे: गेल्या काही महिन्यांपासून मध्यपूर्वेतील युद्धामुळे होणारी सीएनजीची दरवाढ, वाढती महागाई, सुट्या भागांचे वाढलेले भाव आणि ओला-उबेर-रॅपिडोसारख्या कंपन्यांमुळे रिक्षा व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे रिक्षाचालकांना त्वरित मीटरभाडे दरवाढ मिळावी, अन्यथा पुण्यात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा रिक्षा संघटनांनी दिला आहे.
शहरातील विविध रिक्षाचालकांनी भाडेवाढीच्या मागणीचे निवेदन सोमवारी (दि.08) रोजी पुणे आरटी कार्यालयात उप प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल भोसले यांना दिले. यावर सकारात्मक प्रतिसाद देत, लवकरच बैठक बोलावून भाडेवाढ देण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन भोसले यांनी दिले.
अशी हवी आहे रिक्षाचालकांना भाडेवाढ
रिक्षा संघटनांनी आरटीओ प्रशासनाकडे नवीन दरवाढीचा प्रस्ताव मांडला आहे. यामध्ये पहिल्या दीड किलोमीटरसाठी ३० रुपये आणि त्यापुढील प्रत्येक किलोमीटरला २० रुपये या दराप्रमाणे मीटर भाडेवाढ मिळावी, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली आहे.
शिवसेना पुणे शहर वाहतूक संघटनेचेही आरटीओला पत्र
शिवसेना पुणे शहर कॅन्टोन्मेंट विधानसभाप्रमुख एकनाथ ढोले यांनीही यासंदर्भात सोमवारी पुणे आरटीओत पत्र दिले. या पत्राद्वारे त्यांनी महागाईच्या काळात रिक्षाचालकांच्या भाडेवाढीचे समर्थन केले आहे. मात्र, त्याचसोबत सरकारी कर्मचाऱ्यांकडे असलेले बेकायदेशीर रिक्षा परवाने (परमिट) रद्द करण्याची आणि बेकायदेशीर प्रवासी वाहतूक पूर्णपणे थांबवण्याची मागणी त्यांनी केली आहे. फक्त 2 ते 3 कर्मचाऱ्यांनीच आतापर्यंत परवाने जमा केले असून, नियमबाह्य पद्धतीने परवाने बाळगणाऱ्यांना धर्मवीर आनंद दिघे शासकीय पेन्शन योजना लागू झाल्यास त्यास जबाबदार कोण, असा सवाल त्यांनी केला आहे. हा मुद्दा आगामी अधिवेशनात लावून धरू, असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
रिक्षा भाडेवाढ व मीटर ॲप वापरायला मंजुरी द्या
प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने रिक्षा भाडेवाढ तत्काळ लागू करावी, अशी मागणी रिक्षा पंचायत, पुणे-पिंपरी चिंचवड यांनी केली आहे. त्यासंदर्भात संघटनेच्या वतीने सोमवारी आरटीओला निवेदन देण्यात आले. सीएनजी आणि इंधन दरवाढीमुळे रिक्षाचालक आर्थिक अडचणीत आहेत. पारंपरिक मीटर प्रमाणीकरण प्रक्रिया खर्चिक, वेळखाऊ आणि त्रासदायक असल्याने, त्याऐवजी आधुनिक जीपीएस आणि मीटर ॲप वापरण्यास परवानगी द्यावी, अशी मुख्य मागणी यावेळी करण्यात आली आहे.