पुणे: कल्याणीनगर ‘पोर्श’ अपघात प्रकरणातील अल्पवयीन चालकाच्या रक्ताचे नमुने बदलून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी आरोपी विशाल अगरवाल याचा जामीन रद्द करण्यात यावा, अशी मागणी विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी मंगळवारी पुण्याच्या विशेष न्यायालयात केली. अगरवाल याची कथित जल्लोष करतानाची चित्रफीत समाजमाध्यमात प्रसारित झाली असून, त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या जामिनाच्या अटींचा भंग झाला असल्याचे नमूद करीत ही मागणी करण्यात आली.
न्यायालयीन कोठडीत असलेल्या विशाल अगरवालला सर्वोच्च न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला. त्यानंतर त्याची कथितरीत्या जल्लोष करतानाची चित्रफीत समाजमाध्यमात व्हायरल झाली आहे. ही चित्रफीत जुनी असल्याचा दावा अगरवालच्या वकिलांकडून केला जात आहे. पुणे पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन जामिनाच्या अटी-शर्तींचे उल्लंघन केल्याप्रकरणी अगरवालचा जामीन रद्द करण्याचा अर्ज न्यायालयात केला आहे. त्यावर अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. पी. क्षीरसागर यांच्यासमोर सरकार आणि बचाव पक्षातर्फे युक्तिवाद करण्यात आला.
युक्तिवादादरम्यान हिरे म्हणाले, की समाजमाध्यमात प्रसारित चित्रफितीमुळे या खटल्यातील प्रत्यक्षदर्शींसह अन्य साक्षीदारांचे मनोबल खच्ची होऊ शकते. सर्वोच्च न्यायालयाने जामीन देताना कठोर अटी घातल्या असतानाही त्याचा आरोपीवर कोणताही परिणाम होत नसल्याची भावना निर्माण होऊ शकते. आरोप निश्चितीची प्रक्रिया सुरू असतानाच सरकार पक्षाच्या पुराव्यांत हस्तक्षेप करण्याचा, साक्षीदारांवर दबाव निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे.
त्याला अगरवालच्या वकिलांनी विरोध केला. अपघातात जीव गमावलेल्या तरुण-तरुणींच्या रक्त तपासणी अहवालांचे न्यायवैद्यकीय विश्लेषण करण्याची आणि व्हिसेरा अहवालाच्या प्रतींची मागणी कारचालकाच्या आईने केली आहे. मात्र, ती अद्याप उपलब्ध झालेली नसल्याचे बचाव पक्षाच्या वकिलांनी सांगितले.
कल्याणीनगर येथे ‘पोर्शे’ कार भरधाव चालवून धडक दिल्याने दुचाकीस्वार तरुण-तरुणीचा मृत्यू झाला होता. अपघातापूर्वी कारचालक व पाठीमागे बसलेल्या दोन मित्रांनी मुंढव्यातील दोन पबमध्ये मद्यपान केले होते. त्यामुळे रक्ताचे नमुने तपासण्यासाठी सर्वांना ससूनमध्ये नेण्यात आले. तेथे त्यांच्या रक्ताचे नमुने बदलून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी मुख्य आरोपी विशाल अगरवाल, त्याची पत्नी शिवानी, ससूनच्या न्यायवैद्यक विभागाचे तत्कालीन प्रमुख डॉ. अजय तावरे अशा एकूण दहा जणांविरोधात गुन्हा दाखल आहे.