पुणे : कोंढवा आणि बाजीराव रस्त्यावर दिवसाढवळ्या घडलेल्या निर्घृण खुनाच्या घटना नक्कीच तुम्हा-आम्हाला विचार करण्यास भाग पाडणाऱ्या आहेत. ओठावर मिसरूड न फुटलेली ही पोरं कोयता, सत्तूर, पिस्तूल आणि दगडाची भाषा बोलून एकमेकांचे रक्तचरित्र रेखाटू लागली आहेत. ग्लॅमरच्या आकर्षणातून अल्पवयीन मुलांच्या डोक्यात भाईगिरीची हवा शिरू पाहते आहे. तर दुसरीकडे कायद्यातील पळवाटांचा आधार घेत सराईत गुन्हेगारांकडून देखील प्रतिस्पर्ध्याच्या गेम सेट करण्यासाठी अल्पवयीन मुलांचा वापर केला जात असल्याचे दिसून येते.
2021 ते ऑक्टोबर 2025 या पाच वर्षाच्या कालावधीत शहरात 2 हजार 244 मुलांवर तब्बल 1 हजार 400 पेक्षा अधिक गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्यामध्ये खून, खुनाचा प्रयत्न, वाहनांची तोडफोड, मारामारी, हत्याराच्या धाकाने दहशत निर्माण करणे अशा गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे. एकीकडे सराईत गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यात बहुतांश प्रमाणात पोलिसांना यश आले असले तरी, दुसरीकडे मात्र वाढती विधीसंघर्षित गुन्हेगारी (अल्पवयीन गुन्हेगारी) रोखण्याचे मात्र पोलिसांसमोर आव्हान कायम आहे. शहरातील गुन्हेगारीच्या घटना पाहिल्या तर खून, खुनाचा प्रयत्न अशा गंभीर गुन्ह्यात अल्पवयीन मुलांचा मोठा सहभाग असल्याचे निदर्शनास आले आहे. अल्पवयीन गुन्हेगार हा कधीच जन्माला येत नाही, तर परिस्थिती, समाज, इतरांचे अनुकरण, ग्लॅमरस जीवन जगण्याचा मोह, डोक्यात भाईगिरीची हवा त्यांना गुन्हेगारी वाटेवर घेऊन येते. लहान मुलांना ते करत असलेल्या गुन्हेगारी कृत्याचे भविष्यात काय परिणाम होतील याची कल्पनादेखील नसते. संतापाच्या, भावनेच्या भरात त्यांच्या हातून अनेक कृत्ये घडत, असल्याचे समोर येत आहे.
सर्वात गंभीर प्रकार म्हणजे आई-वडिलांशी तुटलेला संवाद, किंवा घरातील इतर अनेक गुंतेही त्यासाठी कारणीभूत ठरतात. लहान मुले ही अनुकरणशील असतात, घरात व समाजात घडणाऱ्या घटनांचे अनुकरण करत असतात. मद्यप्राशन करून आल्यानंतर वडिलांकडून आईवर होणारे अत्याचार, होणारी मारहाण, घरातील सासू-सासरे सुनेला मारहाण करताहेत, असली हिंसक दृश्ये रोज पाहत अनेक मुले मोठी होतात. त्यांच्या मनावर या हिसेंचेही विपरित परिणाम होत राहतात. त्यामुळे अनेक जण अनवधानाने गुन्हेगारी मार्गावर जातात.
सराइत गुन्हेगारांकडून लहान मुलांचा गुन्हेगारी कृत्य करण्यासाठी उपयोग केला जातो. घरची आर्थिक परिस्थिती हलाखीच्या असलेल्या मुलांना आर्थिक प्रलोभन दाखवत गुन्हेगारीच्या दलदलीत खेचले जाते. कोयता, सत्तूर, पिस्तुलाची भाषा या अल्पवयीनांकडून होत आहे. यासाठी कायद्यात असलेल्या पळवाटांचा अनेकदा आधार सराइत गुन्हेगारांकडून घेतला जातो. शहरात गेल्या काही दिवसांत टोळीयुद्धातून घडलेल्या खुनाच्या घटना पाहात, अल्पवयीन मुलाचा या गुन्ह्यांमध्ये सहभाग आल्याचे पुढे आले आहे.
गंभीर गुन्हेगारी कृत्यात अल्पवयीन मुलांचा सहभाग ही चिंतनात्मक बाब आहे. या मुलांचा वापर करणारे व स्वतःहून गुन्हेगारी करणाऱ्यांवर कडक कारवाई होणे गरजेचे आहे. यामध्ये पोलिस कमी पडत असल्याचे निदर्शनास येते. कारण एकीकडे लोकांमध्ये कायद्याप्रति जागृती वाढल्याने गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढते आहे. मात्र दुसरीकडे बेसिक पोलिसींगच मागे पडले आहे. आजही सर्व जण पोलिसांच्या खाकीला घाबरतात. सतत पेट्रोलिंग जर प्रत्येक परिसरात राहिले तर अशा विधीसंघर्षित गुन्हेगारीला लगाम बसेल. नुसते कायदे करून, वय कमी करून उपयोग होणार नाही. बेसिक पोलिंगवर अधिक भर दिल्यास ही गुन्हेगारी कमी होण्यास मदत होईल. यामुळे पोलिसांचाही दरारा वाढेल आणि नागरिकांचा त्यांच्यावरील विश्वास अधिक दृढ होईल.ॲड. शाहिद अख्तर, ज्येष्ठ विधीज्ञ (फौजदारी/ दिवाणी)
पाच वर्षांतील पोलिस आकडेवारी विधीसंघर्षित बालकांची संख्या
वर्ष गुन्हे संख्या
2021 336 519
2022 342 544
2023 293 435
2024 303 514
2025 149 232
(ऑक्टोबरपर्यंत)