Flights Pudhari
पुणे

Pune Airport Passenger Decline: मध्य-पूर्व संघर्षाचा फटका; पुणे विमानतळावरील आंतरराष्ट्रीय प्रवासीसंख्या ६४ टक्क्यांनी घटली

आखाती हवाई क्षेत्र बंद, दुबई-अबुधाबी उड्डाणे रद्द; मे महिन्यात प्रवाशांचा मोठा घसरणीचा आलेख

पुढारी वृत्तसेवा

​पुणे: मध्य-पूर्व आशियातील देशांमध्ये पेटलेल्या तीव्र संघर्षामुळे पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानप्रवासाला मोठा फटका बसला आहे. संवेदनशील हवाई क्षेत्र (एअरस्पेस) बंद झाल्यामुळे आखाती देशांमधील प्रमुख उड्डाणे तात्पुरती स्थगित करावी लागली होती.

परिणामी, दर वर्षी मे महिन्यात उन्हाळी सुट्यांमुळे पर्यटनासाठी होणारी आंतरराष्ट्रीय प्रवाशांची मोठी गर्दी होते. यंदा मात्र ती ओसरली असून, फेब्रुवारीच्या तुलनेत मे महिन्यातील प्रवासीसंख्येत तब्बल ६४ टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. याबाबत पुणे विमानतळाने जाहीर केलेल्या आकडेवारीवरून समोर आले आहे.

काय सांगते चार महिन्यांतील आकडेवारी?

फेब्रुवारी २०२६ ते मे २०२६ या चार महिन्यांच्या प्रवासी आकडेवारीचे विश्लेषण केले असता आंतरराष्ट्रीय प्रवाशांचा आलेख झपाट्याने खाली आल्याचे स्पष्ट दिसते. चालू वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात पुणे विमानतळावरून ३३,३०९ आंतरराष्ट्रीय प्रवाशांनी प्रवास केला होता. मात्र, मार्च महिन्यात हा आकडा थेट १६,४३९ वर आला. एप्रिल महिन्यात यात आणखी घट होऊन ती १५,७२३ वर पोहचली, तर मे महिन्यात हा आकडा अवघा ११,८३६ इतकाच मर्यादित राहिला आहे. उन्हाळ्याच्या सुट्यांचा काळ असूनही आंतरराष्ट्रीय प्रवाशांची संख्या निम्म्याहून अधिक घटल्याने विमान वाहतूक क्षेत्रातील चिंतेत भर पडली आहे.

आखाती देशांतील उड्डाणे ठप्प

दर वर्षी मे महिन्यामध्ये दुबई, अबुधाबी आणि इतर मध्य-पूर्वेतील देशांमध्ये पर्यटनासाठी आणि कौटुंबिक सुट्यांसाठी जाणाऱ्या पुणेकरांची संख्या मोठी असते. या काळात विमान कंपन्यांनाही चांगला महसूल मिळतो. मात्र, यंदा युद्ध परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या हवाई क्षेत्राच्या निर्बंधांमुळे पुण्यातून थेट होणारी उड्डाणे रद्द करावी लागली किंवा त्यांचे मार्ग बदलावे लागले. यामुळे प्रवाशांनी आपले नियोजन रद्द केले किंवा पर्यायी मार्गांचा अवलंब केला, ज्याचा थेट परिणाम पुण्याच्या विमान वाहतुकीवर झाला.

मध्य-पूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीमुळे त्या विशिष्ट भौगोलिक क्षेत्रातील हवाईमार्ग सुरक्षिततेच्या कारणास्तव बंद करण्यात आले होते. यामुळे पुण्यातून आखाती देशांमध्ये, विशेषतः दुबई आणि अबुधाबीमध्ये होणारी नियमित विमानोड्डाणे मध्यांतरीच्या काळात पूर्णपणे बंद ठेवावी लागली. याच मुख्य कारणामुळे मे महिन्यात इतर वेळी होणारी गर्दी यंदा दिसली नाही आणि आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या संख्येत मोठी घट नोंदवली गेली आहे.
संतोष ढोके, संचालक, पुणे विमानतळ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT