पुणे: भारतीय हवामान विभागातून तापमापी अर्थात थर्मामीटर हद्दपार करण्याचा संकल्प करण्यात आला. त्याची सुरुवात पुण्यातून झाली. कृषी महाविद्यालयातील 151 वर्षे जुनी वेधशाळा आता डिजिटल झाली आहे. हा देशातील पहिला पथदर्शी प्रकल्प आहे. याच धर्तीवर देशभरातील 500 वेधशाळा तयार केल्या जाणार आहेत.
इंग््राजांनी भारतात 15 जानेवारी 1875 मध्ये भारतीय हवामान विभागाची स्थापना केली होती. पारा वापरून तयार केलेल्या या तापमापीशिवाय हवामान विभागाचे कामच होत नव्हते. पुणे शहरातील शिवाजीनगर भागातील इमारत इंग््राजांनी बांधली आहे. येथे त्या काळीतल भलेमोठे थर्मामीटर आजही भिंतीवर लावलेले दिसते.
23 मार्च 2026 या जागतिक हवामान दिनाचे औचित्य साधून वेधशाळांतून थर्मामीटर हद्दपार करण्याचा संकल्प भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी या डिजिटल वेधशाळेच्या उद्घाटनप्रसंगी केला. भारतीय हवामान विभागाच्या पुणे येथील पृष्ठभागीय उपकरण विभागाअंतर्गत डिझाइन आणि विकसित केलेली ही प्रणाली हवामानशास्त्रीय प्रयोगांसाठी जिओ-टॅग केलेल्या डेटासह हवेचे तापमान, वातावरणातील आर्द्रता, दाब, वाऱ्याची माहिती आणि पर्जन्यमान मोजण्यासाठी वाय-फाय सक्षम इलेक्ट्रॉनिक्स डिजिटल सेन्सर्सवर आधारित आहे.
पाऱ्याचे दुष्परिणाम ओळखून निर्णय
आयएमडी पुणेचे अतिरिक्त महासंचालक के. सी. साईकृष्णन यांनी सांगितले की, मानवी आरोग्य आणि पर्यावरणाचे पाऱ्याच्या दुष्परिणामांपासून संरक्षण करण्याच्या उद्देशाने संपूर्ण जगाने पाऱ्याचा वापर बंद केला आहे. भारत सरकार देखील या करारावर स्वाक्षरी करणारा देश आहे. त्यामुळे आता पारा आधारित उपकरणे बंद करून त्या जागी डिजिटल सेन्सरचा वापर केला जाणार आहे.
तापमापी, आर्द्रता सेन्सर, बॅरोमीटर झाले डिजिटल
सरकारच्या ‘मेक इन इंडिया’, ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘डिजिटल इंडिया’ या संकल्पनांनुसार, भारतीय हवामान विभागाच्या स्मार्ट सरफेस वेदर या विभागातील डॉ. सीजा झकेरीया यांनी पथदर्शी प्रकल्पातील ही डिजिटल यंत्रे तयार केली आहेत.