

शिरूर: आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी सर्व कर भरणे गरजेचे असताना शिरूर शहरातील मालमत्ता कर व पाणीपट्टी न भरणाऱ्या नागरिक व व्यापारी संकुल धारकांविरुद्ध शिरूर नगर परिषदेने मोहीम तीव केली आहे. मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांनी रविवारी (दि. 21) सुट्टी असून, देखील स्वतः रस्त्यावर उतरून मालमत्ता सील करीत कर भरण्याचे मालमत्ताधारकांना आवाहन केले.
आर्थिक वर्ष संपण्यास अवघे काही दिवस शिल्लक असल्याने मार्चअखेरीस नगर परिषदेची अपेक्षित वसुली पूर्ण होणे अत्यावश्यक आहे. त्या अनुषंगाने करसंकलन विभागाने थकीत देयकदारांविरुद्ध जप्ती, अटकावणी व सील कारवाई अधिक तीव केली आहे. रविवारी शिरूर नगर परिषद हद्दीतील विविध ठिकाणी मालमत्ता थकबाकी करापोटी सील करण्यात आली.
या धडक कारवाईवेळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रीतम पाटील, प्रशासकीय अधिकारी राहुल पिसाळ, कर निरीक्षक माधव गाजरे, नगररचना सहायक पंकज काकड, पाणीपुरवठा अभियंता आदित्य बनकर, सहायक करनिरीक्षक दीपक कोल्हे, संगणक अभियंता रत्नदीप पालके, अग्निशमन अधिकारी सचिन वाळुंज, ज्ञानेश्वर चाकणे, चंद्रकांत पठारे, अमृत भवर, संतोष गायकवाड आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांनी या वेळी नागरिकांना आवाहन केले की, नगर परिषदेची मार्च महिन्यातील वसुली पूर्ण होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे शिरूर शहरातील सर्व नागरिकांनी मालमत्ता कर तसेच पाणीपट्टीची थकबाकी तत्काळ भरावी; अन्यथा थकबाकीदारांविरुद्ध सील, जप्ती व अटकावणीची कारवाई यापुढेही अधिक कठोरपणे सुरू राहणार आहे.
नागरिकांच्या सोयीसाठी मालमत्ता कर व पाणीपट्टी भरण्याची सुविधा ऑनलाइन पद्धतीने, तसेच नवीन प्रशासकीय इमारतीतील नागरी सुविधा केंद्रात आणि जुन्या नगर परिषद इमारतीतील कर भरणा केंद्रात उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेत तत्काळ करभरणा करून नगर परिषदेस सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.