Liquor Pudhari
पुणे

Pune Illegal Liquor Crackdown: पुणे–पिंपरी चिंचवडमध्ये हातभट्टी दारूवर धडक कारवाई, शहरात पोलिस ॲलर्ट

विषारी दारूकांडानंतर विविध भागांत अवैध दारू अड्ड्यांवर धाडसत्र सुरू; नागरिकांच्या तक्रारींनंतर मोठी मोहीम

पुढारी वृत्तसेवा

बिबवेवाडी: फुगेवाडी व हडपसर भागात विषारी दारूमुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. या पार्श्वभूमीवर बिबवेवाडी आणि मार्केट यार्ड पोलिस ‌‘ॲलर्ट‌’ झाले आहे. परिसरातील अवैध धंद्यांसह हातभट्टीच्या अड्ड्‌‍यांवर पोलिसांनी धाडसत्र सुरू केले आहे. बिबवेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत चार ते पाच ठिकाणी हातभट्टी आणि गांजा विक्री खुलेआम सुरू आहे. परिणामी परिसरात तरुण व्यासनांच्या आहारी जात आहेत. एखादी घटना घडल्यानंतर पोलिस कारवाई करतात. मात्र, त्यानंतर काही दिवसांनी परिस्थिती पुन्हा ‌‘जैसे थे‌’ होत आहे. जागडे चाळीशेजारी ओढ्यात, अप्पर डेपो परिसर, सरगम चाळ, तुळजा भवानी मंदिराशेजारी, फाशी गेटजवळ हातभट्टीचा व्यवसाय जोरात चालत असल्याचे नागरिकांनी सांगितले. मार्केट यार्ड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजित जगताप म्हणाले की, मार्केट यार्ड परिसरातील आंबेडकरनगर, बैलबाजार आदी ठिकाणी अवैध धंदे सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर तातडीने कारवाई करण्यात आली आहे. परिसरात गस्त वाढविण्यात आली आहे.

बिबवेवाडी परिसरातील अवैध धंद्यांसह हातभट्टी विक्रीवर नियमित कारवाई केली जात आहे. गस्त वाढवून परिसरातील अवैध धंद्यांना आळा घातला आहे. तरही कुठे असे चालू धंदे सुरू असतील, तर नागरिकांनी पोलिसांना कळवावे.
अश्विनी सातपुते, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, बिबवेवाडी पोलिस ठाणे

बाणेर:

बाणेर, बालेवाडी आणि पाषाण परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून हातभट्टीचा बाजार ‌‘चोरीछुपे‌’ सुरू आहे. हातभट्टीच्या विषारी दारूने 19 जणांचे बळी गेले आहेत. यानंतर आता तरी परिसरातील हातभट्टीचे अड्डे बंद होणार का? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहेत. पाषाण परिसरातील लमान तांडा येथे हातभट्टीचा व्यवसाय केला जात आहे. तसेच, ग््राामीण भागातील लवळे, नांदे भागातून या ठिकाणी कॉनमधून दारू आणली जात असल्याचे नागरिकांनी सांगितले. पाषाण सर्कलजवळील ताडी विक्री केंद्र, पाषाण स्मशानभूमी व सुतारवाडी शिवशक्ती चौक परिसरात चोरून हातभट्टीची विक्री होत असल्याचे रहिवाशांनी सांगितले.

वाघोली:

वाघोली परिसरात हातभट्टी दारूनिर्मिती आणि विक्रीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. भावडी, तुळापूर, अष्टापूर, मांजरी, आव्हाळवाडी, तसेच नदीकाठच्या विविध भागांत गावठी दारू तयार करून तिची खुलेआम विक्री होत असल्याचे रहिवाशांनी सांगितले. वाघोलीतील गोरेवस्ती, भावडी खदान परिसरात बिनधास्तपणे गावठी दारूची विक्री होत आहे. मोठ्या इमारतीचे कामे सुरू आहेत, त्या ठिकाणी दारूची विक्री होत आहे. तसेच काही हॉटेलचालकसुद्धा खुलेआम दारू विक्री करत आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिस प्रशासनाने संयुक्त मोहीम राबवून हातभट्टी दारूनिर्मिती आणि विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील रहिवाशांकडून होत आहे.

वाघोली परिसरातही हातभट्टी दारू, नशायुक्त पावडर आणि पानटपऱ्यांमधून होणारी नशायुक्त पानांची विक्री तातडीने बंद झाली पाहिजे. उत्पादन शुल्क विभाग आणि वाघोली पोलिसांनी विशेष मोहीम राबवून बेकायदेशीर व्यवसायांचे कायमस्वरूपी उच्चाटन करणे गरजेचे आहे.
सुभाष जाधव, सामाजिक कार्यकर्ते

खडकवासला:

खडकवासला, धायरी, डोणजे परिसरात अवैध दारू, तसेच नशायुक्त पदार्थांची विक्री वाढत असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे. खडकवासला धरण भागात गावठी दारू उपलब्ध होत आहे. पानशेत, डोणजे, खानापूर भागातही दारू विक्री सुरू आहे. परिसरातील हॉटेलांमध्ये देखील अवैधरीत्या देशी, विदेशी दारू उपलब्ध होत असल्याचे नागरिकांनी सांगितले. नांदेड सिटी पोलिसांकडून दारू अड्ड्यांवर वेळोवेळी कारवाई केली जात आहे. मात्र, उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करून परिसरातील हातभट्ट्यांसह अवैध धंद्यांचा बीमोड करावा, अशी मागणी होत आहे.

वडगाव शेरी:

वडगाव शेरी, विमाननगर आणि खराडी भागातील विविध वस्त्या आणि बांधकामांच्या ठिकाणी खुलेआम हातभट्टीची विक्री होत आहे. मात्र हातभट्टी विक्रेत्यांच्या दहशतीमुळे रहिवासी तक्रार देत नाहीत. वडगाव शेरी येथील कल्याणीनगर पुलाशेजारील, साईनाथनगर, टेम्पो चौक परिसरातील बिडी कामगार वसाहत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत, तसेच विमाननगरमधील यमुनानगर, खुळेवाडी, लोहगाव, बर्माशेल, म्हाडा या ठिकाणी हातभट्टीची विक्री होत असल्याचे नागरिकांनी सांगितले. हातभट्टी विक्रेते बांधकामांच्या ठिकाणी जाऊनही दारूची विक्री करीत आहे. पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने हातभट्टी व्यावसायावर कारवाई करावी, अशी मागणी सुमित खेडकर यांनी केली आहे.

हातभट्टीच्या धंद्यावर वारंवार कारवाई केली जात आहे. हातभट्टी विक्रीसंदर्भात नागरिकांनी बिनधास्तपणे पोलिसांकडे तक्रार करावी. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवले जाईल. अवैध धंदा करणाऱ्यांवर यापुढेही कठोर करवाई सुरू राहणार आहे.
नीलेश बडाख, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, चंदननगर पोलिस ठाणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT