

आशिष देशमुख
पुणे: वाढत्या शहरीकरणामुळे पुणे शहराचा पृष्ठभाग प्रचंड तापत आहे. नदीपात्र असलेले जुने भाग तुलनेने कमी गरम होतात. मात्र, जेथे वाहन, लोकसंख्येची घनता आणि सिमेंटचे रस्ते जास्त असे भाग उष्णतेची बेटे बनली आहेत. जुन्या शहरापेक्षा उपनगरे जास्त उष्ण बनत आहेत. त्यामुळेच शहराच्या हवेचे तापमान 38 अंशांवर असले, तरी जमिनीचे तापमान तब्बल 58 अंशांवर गेले आहे. त्यामुळे एकूण उष्म्यात वाढ झाली आहे, असे संशोधन शहरातील बी. के. पी. एस. कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या प्रा. प्रज्ञा पत्की आणि प्रा. पराग गोवर्धन नारखेडे यांनी केले आहे.
गत काही वर्षांपासून पुणेकरांना उन्हाळा असह्य होत आहे. त्याचे कारण वाढते शहरीकरण हेच आहे. हवामान विभाग हा जमिनीपासून काही मीटर उंच असणाऱ्या हवेचे तापमान दररोज जाहीर करते. ते तापमान यंदा 41 ते 44 अंशांपर्यंत गेले होते. मात्र, प्रथमच शहराच्या पृष्ठभागाच्या तापमानाचा अभ्यास शास्त्रीय पद्धतीने प्रथमच या दोन संशोधकांनी मांडला आहे. ‘शहरी उष्णता बेटाच्या परिणामाचा अभ्यास’ असे या संशोधनाचे शीर्षक आहे.
परिणाम आणि निरीक्षणे
तापमानातील ही वाढ पुणे शहराच्या उपनगरांमध्ये विशेषत्वाने दिसून आली. जसजसे शहरीकरण वाढत जाईल, तसतसे शहरी उष्णता बेटाच्या प्रभावाची व्याप्ती आणि तीवता अधिक गंभीर होईल.
वाढत्या शहरीकरणामुळे पृष्ठभागाच्या तापमानात सतत वाढ झाली आहे.
शहरी पर्यावरणीय प्रणालीची रचना आणि कार्यामध्ये बदल होईल. ज्यामुळे शहरवासीयांच्या आरोग्यास हानी पोहचेल. रस्त्यांवरील वनस्पती, मानवनिर्मित आणि नैसर्गिक घटकांची उपस्थिती दर्शविणारी दृश्य रचना हे घटक पुणे शहरातील उष्ण बेटांवर प्रभाव टाकतात.
इमारती, वाहने आणि उष्णता निर्माण करणारे, ती साठवून ठेवणारे मानवी उपक्रम वाढीव तापमानास कारणीभूत आहेत.
’शहरी उष्णता बेट’ ही संकल्पना उपनगरीय प्रदेशांच्या तुलनेत हवेच्या तापमानात होणारा बदल स्पष्ट करते. हवा आणि पृष्ठभागाच्या तापमानातील लक्षणीय बदलांमुळे तसेच पाणी, हवा आणि मातीमधील प्रदूषकांच्या वाढीमुळे शहरी पर्यावरणाच्या गुणवत्तेचा ऱ्हास होत आहे.
शहरातील रहिवासी, घरे, व्यावसायिक आस्थापना, वाहने, बसगाड्या, रेल्वेगाड्या, औद्योगिक क्षेत्रे औष्णिक ऊर्जा निर्माण करतात. सिमेंट काँक्रीट आणि डांबरी रस्ते आणि वाहनांची प्रचंड घनता असणारे भाग जास्त तापतात; कारण त्याचा पृष्ठभाग कठीण असल्याने ते जास्त उष्णता परावर्तित करतात. नदीकाठ, घनदाट झाडी असलेल्या भागांचे तापमान तुलनेने कमी नोंदले गेले.