

पुणे: अंगाला लागलेली मायभूमीची माती, नसानसांत भिनलेली कबड्डीची नशा आणि जिद्दीच्या जोरावर आभाळाला गवसणी घालण्याचे स्वप्न... हे सारे प्रत्यक्षात आणले आहे पुण्याच्या 21 वर्षीय आर्यन नम्रता अशोक ढवळे याने.
बाणेरच्या मातीच्या मैदानातून सुरू झालेला आर्यनचा हा सोनेरी प्रवास आता प्रो-कबड्डी लीगच्या झगमगत्या मॅटवर पोहचला आहे. प्रो-कबड्डीच्या आगामी तेराव्या आणि चौदाव्या हंगामासाठी तेलुगू टायटन्स संघाने आर्यनला न्यू यंग प्लेअर म्हणून आपल्या ताफ्यात सामील केले असून, यावर्षी हा बहुमान मिळविणारा तो महाराष्ट्रातील पहिलाच अष्टपैलू वाघ ठरला आहे.
आर्यनच्या यशाची पाळेमुळे त्याच्या घरातच रुजलेली आहेत. वडील अशोक ढवळे आणि आई नम्रता ढवळे हे दोघेही आपल्या काळातील नावाजलेले कबड्डीपटू. त्यामुळे आर्यनला खेळाचे बाळकडू घरातूनच मिळाले. आई-वडिलांनी घेतलेले अहोरात्र कष्ट आणि वडिलांच्या शिस्तीच्या मुशीत घासूनपुसून आर्यनचा हा हिरा तयार झाला. बालपणापासून मैदानावर घाम गाळताना अनेक जखमा आणि दुखापतींचे आघात त्याने सोसले; पण प्रत्येक जखमेला त्याने यशाचे अत्तर बनविले.
आर्यन म्हणजे मैदानावरील आक्रमकता आणि संयमाचा अद्भुत संगम आहे. विजेच्या वेगाने चढाई करीत प्रतिस्पर्धी छावणीत धुमाकूळ घालणे आणि एखाद्या भीमासारखी भक्कम पकड करीत समोरच्या रायडरला जागेवर खिळवून ठेवणे, ही त्याची खासियत! या अष्टपैलू कौशल्यामुळेच तो तेलुगू टायटन्सच्या नजरेत भरला. बाणेरच्या बाबूराव सोशल फाउंडेशनच्या सतेज संघाचा हा शिलेदार यापूर्वी विद्यापीठस्तरावर सुवर्णपदक पटकावून आपली चमक दाखवून चुकला आहे.
आई-वडिलांचे संस्कार, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि महाराष्ट्राच्या मातीतून मिळालेली ताकद, यामुळेच मी इथपर्यंत पोहचलो आहे. आता तेलुगू टायटन्सच्या जर्सीत मैदानात उतरताना पुणे आणि महाराष्ट्राचा डंका संपूर्ण देशात वाजवायचा आहे.
आर्यन ढवळे, कबड्डीपटू