HPV Vaccine Pudhari
पुणे

Pune HPV Vaccination: १४–१५ वर्षांच्या मुलींसाठी एचपीव्ही लसीकरण मोहिमेला सुरुवात

पुणे महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये गार्डासिल लसीद्वारे सर्व्हायकल कॅन्सरपासून संरक्षण

पुढारी वृत्तसेवा

पुणे: राज्य शासनाच्या मार्गदर्शनानुसार पुणे शहरात ‌‘एचपीव्ही‌’ लसीकरण मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. बोपोडी येथील द्रौपदाबाई खेडेकर दवाखाना, वडगाव खु. येथील स्व. मुरलीधर लायगुडे दवाखाना, शिवाजीनगरमधील दळवी दवाखाना तसेच कमला नेहरू रुग्णालय येथे या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. सध्या 14 ते 15 वर्षे वयोगटातील मुलींना ही लस दिली जात आहे. पहिल्या दिवशी 26 मुलींना लसीकरण करण्यात आले.

महापालिकेच्या 21 प्रसूतिगृहांमध्येही लसीकरणाची सुविधा उपलब्ध आहे. सर्व्हायकल कॅन्सरपासून संरक्षण देणारी ‌‘गार्डासिल‌’ लस सध्या महापालिकेच्या दवाखान्यांमधून दिली जात आहे. लाभार्थी मुलींच्या पालकांनी ‌‘यू-विन‌’ पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानंतर संबंधित केंद्रावर लस घेता येईल.

लसीकरणानंतर प्रमाणपत्रही दिले जाणार आहे. सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत ही सेवा उपलब्ध आहे. ऑनलाइन नोंदणी केली नसल्यास सेंटरवर नोंदणी केली जाऊ शकते, अशी माहिती सहायक आरोग्य अधिकारी डॉ. राजेश दिघे यांनी दिली.

महापालिका हद्दीत सुमारे 35 हजार मुलींना लसीकरणाचा लाभ देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात 19 हजार डोस प्राप्त झाले असून उर्वरित डोस पुढील टप्प्यांत उपलब्ध होतील, अशी माहिती आरोग्यप्रमुख डॉ. नीना बोराडे यांनी दिली.

महत्त्वाची माहिती

  • पात्र वयोगट : 14 पूर्ण आणि 15 वर्षे पूर्ण होण्यापूर्वी

  • लसीचा प्रकार : गार्डासिल

  • संरक्षण : एचपीव्ही विषाणूचे 6, 11, 16 आणि 18 प्रकार

  • डोस : 0.5 मिली. उजव्या हाताच्या दंडावर दिला जातो.

  • मासिक पाळीदरम्यान लस घेणे सुरक्षित

  • प्रजनन क्षमता किंवा भविष्यातील गर्भधारणेवर परिणाम नाही

  • व्यापक लसीकरणामुळे कर्करोगाचे प्रमाण घटू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT