Hotel Waiters Struggle Pudhari
पुणे

Pune Hotel Waiters Struggle: ‘सर, आणखी काही हवं का?’ म्हणणाऱ्या हातांची कहाणी; हॉटेल वेटरच्या संघर्षाला मिळणार का सन्मान?

सात-आठ तास उभे राहून काम, हजारोंच्या पगारात संसाराचा गाडा; ग्राहकांना सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आयुष्याची व्यथा

पुढारी वृत्तसेवा

पुणे: ‘रोज सात-आठ तास उभं राहून काम करतो. महिन्याला सात-आठ हजार रुपये पगार मिळतो. त्यातून चार जणांच्या कुटुंबाचा खर्च भागवणं अवघड जातं. तरीही काटकसर करून संसार चालवतो. दुसरा पर्यायच नाही. स्वप्नं मोठी आहेत, म्हणून अजूनही कष्ट करतोय,’ अशा शब्दांत कोथरूडमधील एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करणाऱ्या सुरेश (नाव बदलले आहे) यांनी आपल्या आयुष्यातील संघर्ष बोलका केला.

सुरेश यांच्यासारखे अनेकजण आज शहरातील विविध हॉटेलांमध्ये वेटर म्हणून काम करत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर कायम हसू असते, पण मनात मात्र आर्थिक विवंचना, अपमान आणि कुटुंबापासून दूर राहण्याची सल दडलेली असते. हॉटेलमध्ये येणाऱ्या प्रत्येक खवय्याचे मन जिंकण्यासाठी ते जीवापाड प्रयत्न करतात. मात्र, त्यांच्या आयुष्यातील संघर्षाकडे फारसे कुणाचे लक्ष जात नाही. ‘सर, आणखी काही हवं का?’ असे नम्रपणे विचारणारा वेटर अनेकदा स्वतःची भूक, थकवा आणि वेदना दूर करुन काम करत असतो.

खवय्यांना जेवण वेळेवर पोहोचावे म्हणून त्याची सतत धावपळ सुरू असते. अनेकदा उभ्याउभ्याच दोन घास खाऊन तो पुन्हा कामाला लागतो. सकाळी हॉटेलचे शटर उघडल्यापासून ते रात्री शेवटचा खवय्या निघेपर्यंत त्याचे पाय थांबत नाहीत. महिन्याचा मर्यादित पगार, वाढती महागाई, घरभाडे, मुलांचे शिक्षण आणि घरच्यांच्या अपेक्षा... या सगळ्याचा भार त्यांच्या खांद्यावर असतो. त्यांच्या चेहऱ्यावरील हास्यामागे अपूर्ण स्वप्नांची, जबाबदाऱ्यांची आणि न सांगितलेल्या वेदनांची एक हळवी कहाणी दडलेली आहे. मूळचे सावंतवाडीचे असलेले गंगाराम विठ्ठल वरक हे गेली २० ते २२ वर्षे कामानिमित्त पुण्यात वास्तव्यास आहेत. वरक म्हणाले, महिन्याला पंधरा-सोळा हजार रुपये मिळतात.

त्याच पैशांत पत्नी, मुलगा, आई-वडील अशा पाच जणांचा संसार चालवावा लागतो. प्रत्येक महिन्याचा हिशेब जुळवताना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागते. कुटुंबाला चांगले आयुष्य मिळावे, एवढीच इच्छा आहे. म्हणूनच रोज सकाळपासून रात्रीपर्यंत काम करतो. कष्टाशिवाय दुसरा पर्याय नाही. हॉटेलमध्ये काम करताना कधी चांगले तर कधी वाईट अनुभव येतात. पण, सगळे सांभाळून काम करावे लागते. प्रत्येक दिवस नव्याने सुरू करावा लागतो.

आम्हालाही आदराची वागणूक द्या

हॉटेलमध्ये काम करणारे बहुतांश कर्मचारी ग्रामीण भागातून शहरात आलेले असतात. घरची हलाखीची परिस्थिती, अपुरे शिक्षण आणि कुटुंबाची जबाबदारी यामुळे त्यांनी हे काम स्वीकारलेले असते. महिन्याचा पगार हातात पडताच घरभाडे, मुलांचे शिक्षण, रोजचा खर्च करावा लागतो. त्यांचे स्वप्ने मात्र कायम अपुरे राहतात. दिवसभर लोकांना आदराने सेवा देणाऱ्या या कर्मचाऱ्यांची एकच अपेक्षा असते त्यांनाही माणूस म्हणून सन्मानाची वागणूक मिळावी. लोकांनी मनापासून उच्चारलेले धन्यवाद असे काही शब्द त्यांचा दिवसभराचा थकवा घालवतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT