Pune APMC Pudhari
पुणे

Pune Market Yard Encroachment: गुलटेकडी मार्केट यार्डात अतिक्रमणामुळे रस्ते आक्रसले, वाहतूक कोंडीचा गंभीर प्रश्न

मोकळे क्रेट्स, टेम्पो आणि किरकोळ विक्रेत्यांच्या अतिक्रमणामुळे बाजारातील रस्ते एकेरी झाले असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे

पुढारी वृत्तसेवा

पुणे: गुलटेकडी मार्केट यार्डातील उपमुख्य रस्त्यांसह मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणामुळे रस्ते आक्रसले जात आहेत. मोकळे क्रेट्स‌, टेम्पो आणि किरकोळ विक्रेत्यांच्या अतिक्रमणामुळे बाजारातील अनेक रस्ते अक्षरशः एकेरी झाले आहेत. विशेष म्हणजे, बाजार समितीने अतिक्रमण रोखण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सुरक्षा रक्षकांची नियुक्ती केली आहे. मात्र, बाजारातील परिस्थिती पाहता अतिक्रमणाला चोख सुरक्षा व्यवस्था आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो.

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डात दररोज हजारो किलो शेतमालाची आवक आणि शेकडो वाहनांची वर्दळ येथे असते. मात्र, बाजारातील अंतर्गत रस्त्यांवर नियमबाह्य पार्किंग आणि अतिक्रमणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. पार्किंगसाठी निश्चित केलेल्या जागांवर मोकळे क्रेट्स्‌ लावण्यात येत आहे. त्यामुळे, वाहनांच्या पार्किंगला जागा मिळत नाही. बहुतांश टेम्पो हे त्या क्रेट्ससमोर उभे करण्यात येत असल्याने वाहने रस्त्यावर येत आहे.

याखेरीज, बहुतांश ठिकाणी वाहने ही पार्किंगच्या जागेत पार्क करण्यात येत. त्यात रस्त्यावरच किरकोळ विक्रेत्यांनी अक्षरशः ठाण मांडल्याने दुहेरी वाहतुकीचा रस्ता एका बाजूने बंद होत आहे. परिणामी, वाहनांना एकाच लेनमधून ये-जा करावी लागत असल्याने बाजारात येणाऱ्या शेतकऱ्यापासून ते ग्राहकापर्यंत सर्वांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

अतिक्रमणे हटवण्याऐवजी सुरक्षारक्षक करताहेत दुर्लक्ष

प्रशासनाने अतिक्रमण रोखण्यासाठी सुरक्षारक्षकांची नियुक्ती केली. मात्र, प्रत्यक्षात सुरक्षारक्षक प्रवेशद्वारांवर किंवा ठराविक ठिकाणी घोळक्याने बसून असल्याचे चित्र दिसते. अतिक्रमण हटविण्याऐवजी त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने बाजाराला बकाल स्वरूप येऊ लागल्याचे चित्र आहे.

बाजारातील वाहतूक आणि व्यापार सुरळीत राहण्यासाठी सर्व घटकांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. बाजार घटकांनी ठरवून दिलेल्या जागेतच व्यापार करावा. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, जेणेकरून बाजार आवार सुटसुटीत राहील.
डॉ. राजाराम धोंडकर, सचिव, पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT