पुणे: मुंबई येथील जीएसटी (वस्तू आणि सेवा कर) विभागात काम करणाऱ्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याला लग्नाच्या आमिषाने हनीट्रॅपमध्ये अडकवून 42 लाख 87 हजार रुपयांना लुटल्याचा प्रकार समोर आला आहे. एवढेच नाही तर आणखी सात लाख रुपयांची मागणी करून, पैसे दिले नाही तर खोटी बलात्काराची केस करून आयुष्यभर जेलमध्ये सडविण्याची धमकी देण्यात आली आहे.
याप्रकरणी, बेलापूर, नवी मुंबई येथे राहणाऱ्या 43 वर्षीय अधिकाऱ्याने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी निर्मल रेवानंद मेश्राम, रेवानंद तुकडोजी मेश्राम (रा. दोघे नागपूर) आणि शीतल वैभव मडके या तिघांच्या विरुद्ध फसवणूक, खंडणीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 2023 ते नोव्हेंबर 2025 दरम्यानच्या कालावधीत कात्रज आणि नागपूर येथील परिसरात घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे जीएसटी विभागात उच्चस्थ पदावर अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. 2023 मध्ये आरोपी निर्मल हिच्यासोबत त्यांचा एका विवाहविषयक संकेतस्थळाच्या माध्यमातून परिचय झाला होता. त्यानंतर ओळख वाढत गेल्यानंतर तिने फिर्यादींना लग्नाचे आमिष दाखवून प्रेमाच्या जाळ्यात खेचले. दरम्यानच्या काळात कधी वैद्यकीय उपचाराचा बहाणा, तर कधी बँक, पतसंस्था यांचे कर्ज, सोने गहान ठेवलेले सोडविणे अशी कारणे सांगून रोख व ऑनलाइन स्वरुपात वेळोवेळी 42 लाख 87 हजार रुपये उकळले. फिर्यादी वारंवार निर्मल हिला लग्नाबाबत विचारणा करत होते. परंतु, प्रत्येक वेळी ती वेगवेगळी कारणे सांगून लग्न करण्याचे टाळत होती. फिर्यादींना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
जेव्हा त्यांनी निर्लम हिला याबाबत जाब विचारला तेव्हा तिने आणि इतर दोघा आरोपींनी फिर्यादींच्या विरुद्ध पोलिसात खोटी बलात्काराची केस करून आयुष्यभर जेलमध्ये सडविण्याची धमकी दिली. तसेच त्यांना मानसिक त्रास देऊन पैसे खंडणी स्वरुपात उकळले. फिर्यादींनी जेव्हा तिघा आरोपींना पैसे व इतर चिजवस्तू देण्याचे बंद केले तेव्हा त्यांच्याकडे आणखी सात लाख रुपयांची मागणी करून त्यांची आर्थिक पिळवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादींनी याबाबत भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी चौकशीअंती गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादींची ओळख झाल्यानंतर त्यांना लग्नाच्या आमिषाने प्रेमाच्या जाळ्यात खेचून, खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत 42 लाख 87 हजार रुपये उकळण्यात आले आहेत. याप्रकरणी दोन महिलांसह तिघांच्या विरुद्ध फसवणूक, खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.राहुल खिलारे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक भारती विद्यापीठ पोलिस ठाणे