Roads Development Pudhari
पुणे

Pune Grand Tour 2027 Road Upgrade Project: ‘पुणे ग्रँड टूर २०२७’साठी रस्त्यांना मिळणार नवा लूक; महापालिकेचा १६७ कोटींचा महामार्ग विकास आराखडा

१३५ किलोमीटर रस्त्यांचे होणार नूतनीकरण; औंध ते कॅम्पपर्यंत प्रमुख मार्गांचे उन्नतीकरण, वाहतूक व्यवस्थेला मिळणार चालना

पुढारी वृत्तसेवा

पुणे: २०२७ मध्ये होणाऱ्या 'पुणे ग्रँड टूर २०२७' या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने शहरातील प्रमुख रस्त्यांच्या उन्नतीकरणासाठी १६७.२६ कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या इस्टिमेट समितीच्या बैठकीत या प्रस्तावाला हिरवा झेंडा मिळाली असून, लवकरच निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या पुढाकारातून सलग दुसऱ्या वर्षी ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून स्पर्धेचा मार्ग निश्चित करण्यात आला असून, संपूर्ण परिसरात सुमारे ७०० किलोमीटरहून अधिक रस्त्यांची कामे केली जाणार आहेत. त्यापैकी पुणे महापालिका हद्दीतील १३५.८० किलोमीटर मार्गांवर विशेष कामे हाती घेतली जाणार आहेत.

या प्रकल्पांतर्गत ८३.६६ किलोमीटर रस्त्यांचे संपूर्ण रिसर्फेसिंग व नूतनीकरण, तर ५२.०९ किलोमीटर रस्त्यांची दुरुस्ती आणि देखभाल केली जाणार आहे. संपूर्ण कामाची चार स्वतंत्र पॅकेजमध्ये विभागणी केली असून, कामांचा दर्जा राखण्यासाठी आणि वेळेत पूर्ण करण्यासाठी एका ठेकेदाराला केवळ एकच पॅकेज देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

प्रकल्पात खराब झालेल्या रस्त्यांचे मिलिंग, नव्याने डांबरीकरण, बिट्युमिनस उपचार, फूटपाथ दुरुस्ती, दुभाजकांचे सुशोभीकरण, थर्मोप्लास्टिक रोड मार्किंग, दिशादर्शक फलक, मॅनहोल लेव्हलिंग, ट्रेंच दुरुस्ती, स्पीड ब्रेकर हटविणे, रस्त्यांची रुंदी वाढविणे तसेच काँक्रीट जॉइंट फिलिंग अशी विविध कामे केली जाणार आहेत. याशिवाय १,६२० मॅनहोलचे लेव्हलिंग, २६३ स्पीड ब्रेकर हटविणे, ८,९७४ मीटर उंचावलेले पादचारी क्रॉसिंग, १३ किलोमीटर फूटपाथ सुधारणा आणि १२.८६ किलोमीटर दुभाजक दुरुस्ती करण्यात येणार आहे.

वाहतूक व्‍यवस्‍थेला लाभ होणार

स्पर्धेचा अंतिम टप्पा शहरातील औंध, बाणेर, पाषाण, विद्यापीठ चौक, एस.बी. रोड, लॉ कॉलेज रस्ता, कर्वे रोड, सिंहगड रस्ता, टिळक रोड, पद्मावती, कोंढवा, कॅम्प, घोरपडी, मुंढवा, बंडगार्डन, सोमवार पेठ, एफ.सी. रोड, डेक्कन आणि बालगंधर्व परिसरातून जाणार असल्याने या मार्गांवरील रस्त्यांना प्राधान्याने दर्जेदार बनविण्यात येणार आहे. महापालिकेच्या मते, हा प्रकल्प केवळ आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेपुरता मर्यादित नसून, पुणेकरांना अधिक सुरक्षित, दर्जेदार आणि दीर्घकाळ टिकणारे रस्ते उपलब्ध करून देण्यासाठीही महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे स्पर्धेनंतरही शहराच्या वाहतूक व्यवस्थेला या प्रकल्पाचा मोठा लाभ होणार असल्याचा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT