Devendra Fadnavis Pudhari
पुणे

Pune Graduate Teacher Constituency Election: पुणे पदवीधर-शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री फडणवीस आज पुण्यात

भाजप-महायुतीच्या प्रचाराचा आणि संघटनात्मक तयारीचा घेणार आढावा; स्मिताताई जाधव व कौस्तुभ गावडे यांच्या प्रचार नियोजनावर लक्ष

पुढारी वृत्तसेवा

पुणे: महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी (दि. १४) पुण्यात येणार आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्याबरोबरच भाजप-महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराला गती देण्याच्या दृष्टीने त्यांच्या दौऱ्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघातील पक्षांतर्गत नाराजी दूर करण्यासाठी चर्चा केल्यानंतर आता मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुणे विभागातील निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघासाठी डॉ. स्मिताताई योगेश जाधव, तर पुणे शिक्षक मतदारसंघासाठी कौस्तुभ गावडे हे भाजप-महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत. या दोन्ही उमेदवारांच्या विजयासाठी पक्षाने संघटनात्मक बांधणीवर भर दिला आहे. प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील आणि प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांनी पुणे शहर, पुणे ग्रामीण, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांतील पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठका घेऊन निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला आहे.

डॉ. स्मिताताई जाधव यांच्या उमेदवारीबाबत फडणवीस यांनी यापूर्वी विश्वास व्यक्त केला होता. 'मला निश्चित विश्वास आहे की, त्यांना लोकं निवडून देतील,' अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती. तसेच कौस्तुभ गावडे यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्याचाही त्यांनी उल्लेख केला होता. त्यामुळे या दौऱ्यात दोन्ही उमेदवारांच्या प्रचाराचे नियोजन आणि संघटनात्मक समन्वयावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील काही विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपने प्रभारी नियुक्त केले आहेत. मतदार नोंदणी, शिक्षक-पदवीधर मतदारांशी संपर्क, स्थानिक प्रश्नांची मांडणी आणि मतदारसंघनिहाय समन्वय या मुद्द्यांवर पक्षाचा भर आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दौऱ्यात या तयारीचा आढावा घेऊन कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना प्रचाराची दिशा दिली जाण्याची शक्यता आहे.

शिक्षणक्षेत्रातील कामकाज मतदारांपर्यंत पोहोचवा : रवींद्र चव्हाण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप-महायुती सरकार शिक्षण क्षेत्राला नव्या उंचीवर नेण्यासाठी विविध योजना आणि उपक्रम राबवत आहे. या कामकाजाची माहिती शिक्षक आणि पदवीधर मतदारांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याच्या सूचना कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना दिल्या जात असल्याचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT