

पुणे: कॅम्प परिसरातील गार्डन वडापाव सेंटरला अखेर अन्न औषध प्रशासनाने (एफडीए) ताळे ठोकले. त्याचबरोबर उरळी देवाची येथील हॉटेल सोनईवरही कारवाई केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून गार्डन वडापाव सेंटरबाबतच्या कारवाईबाबत एफडीएच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह व्यक्त केले होते.
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एफडीएने पुणे विभागातील सात हॉटेल आणि खाद्यपदार्थ विक्री केंद्रांची तपासणी केली. त्यात लोहगाव येथील पंजाबी ढाबा, कोंढवा येथील खान-ए-खास हॉटेल आणि उरुळी देवाची येथील हॉटेल सोनाई येथे स्वच्छतेच्या नियमांचे पालन होत नसल्याचे आढळले.
दुसरीकडे, कॅम्पमधील गार्डन वडापाव सेंटरसह पिंपरी-चिंचवडमधील बालाजी साऊथ इंडियन फूड, इंजिनिअर वडेवाले अँड थाळी आणि जी. के. हॉटेल प्युअर व्हेज या चार ठिकाणी आवश्यक परवाना किंवा नोंदणी नसल्याने व्यवसाय बंद करण्याचे आदेश देण्यात आले.
त्याचबरोबर पुणे, सोलापूर आणि सांगली जिल्ह्यांतील सहा व्यापाऱ्यांकडून एफडीएने २१ लाख ९४ हजार ७९७ रुपये किमतीचे ९ हजार ६७५ किलो अवैध खाद्यतेल साठा जप्त केला. पुण्यातील गुलटेकडी मार्केट यार्डातील बन्सल ट्रेडिंग कंपनी आणि रमेशलाल अँड सन्स या दोन व्यापाऱ्यांचा समावेश आहे. या दोघांकडून मिळून ३ हजार १७० किलो तेल जप्त करण्यात आले असून, त्याची किंमत १३ लाख ११ हजार ७१९ रुपये आहे.
यापूर्वी ९ ऑक्टोबर रोजी पुणे विभागातील पाच जिल्ह्यांत २५ ठिकाणी छापे टाकून ७४ हजार ६१२ किलो संशयित खाद्यतेल जप्त करण्यात आले होते. या साठ्याची किंमत एक कोटी २८ लाख ७३ हजार रुपये होती. जप्त केलेल्या तेलाची तपासणी करून पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे एफडीएने स्पष्ट केले आहे.