Poona Merchants Chamber Graduate Constituency Election Traders Support Pudhari
पुणे

Pune Graduate Constituency Election: पुणे पदवीधर निवडणूक: डॉ. स्मिताताई जाधव यांना व्यापारी आणि पदवीधरांचा पाठिंबा

दि पूना मर्चंटस् चेंबरच्या बैठकीत विजयासाठी प्रयत्नांचा निर्धार; पदवीधरांचे प्रश्न आणि तरुण व्यापाऱ्यांच्या अडचणी विधानपरिषदेत मांडण्याची अपेक्षा

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष-महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिताताई योगेश जाधव यांना शहरातील व्यापारी आणि पदवीधरांनी पाठिंबा दर्शविला आहे. उच्चशिक्षित आणि शिक्षण संस्थेच्या प्र-कुलगुरू म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. जाधव पदवीधरांच्या प्रश्नांसह व्यापारी क्षेत्रातील अडचणी सोडविण्यासाठी प्रभावी भूमिका बजावतील, असा विश्वास व्यापारी प्रतिनिधींनी व्यक्त केला. त्यांच्या विजयासाठी प्रयत्न करण्याचा निर्धारही बैठकीत करण्यात आला.

गुलटेकडी मार्केट यार्डातील दि पूना मर्चंटस् चेंबरच्या व्यापार भवन येथे शहरातील व्यापाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी दि पुना मर्चंटस् चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया, सचिव ईश्‍वर नहार, माजी अध्यक्ष रायकुमार नहार, नगरसेवक प्रवीण चोरबेले, उत्तम बांठिया, नवीन गोयल, दिनेश मेहता, राजेंद्र सरदेशपांडे, संदीप शहा, हरिराम चौधरी, आशिष नहार, शाम लढ्ढा यांच्यासह व्यापारी प्रतिनिधी आणि पदवीधर मतदार उपस्थित होते.

पदवीधरांच्या रोजगाराच्या संधी, उच्चशिक्षणाशी संबंधित प्रश्न तसेच व्यापारी क्षेत्रासमोरील विविध अडचणी विधानपरिषदेच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडल्या जाण्याची अपेक्षा बैठकीत व्यक्त करण्यात आली. डॉ. जाधव यांचा शैक्षणिक आणि प्रशासकीय अनुभव या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी उपयुक्त ठरेल, असे मत उपस्थितांनी मांडले. पदवीधरांच्या प्रश्नांना विधानपरिषदेत सक्षम प्रतिनिधित्व मिळावे, यासाठी डॉ. जाधव यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्धार व्यापारी प्रतिनिधींनी व्यक्त केला.

व्यापारी वर्ग आणि पदवीधरांचे प्रश्न एकमेकांशी निगडित आहेत. व्यापार क्षेत्रात उच्चशिक्षित तरुणांचा सहभाग वाढत असून, त्यांच्यासाठी रोजगार, स्वयंरोजगार, व्यवसायवृद्धी आणि आधुनिक तंत्रज्ञानाशी संबंधित संधी निर्माण होणे गरजेचे आहे. त्याचबरोबर व्यापाऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध अडचणी शासनदरबारी प्रभावीपणे मांडल्या जाण्याची अपेक्षा आहे. डॉ. स्मिताताई जाधव यांच्या शैक्षणिक आणि प्रशासकीय अनुभवाचा या दोन्ही घटकांचे प्रश्न सोडविण्यासाठी उपयोग होईल, असा विश्वास व्यापारी वर्गाला आहे. डॉ. स्मिताताई जाधव यांना पदवीधर मतदार भरघोष मतांनी निवडून देत विधानपरिषदेवर पाठवेल यात शंका नाही. व्यापारी वर्ग त्यांना निवडून आणण्यात आघाडीवर असेल.
राजेंद्र बांठिया, अध्यक्ष, दि पूना मर्चंटस् चेंबर
व्यापार क्षेत्रात उच्चशिक्षित तरुणांचा सहभाग दिवसेंदिवस वाढत आहे. नव्याने व्यवसायात उतरणाऱ्या तरुणांना भांडवल, आधुनिक तंत्रज्ञान, डिजिटल व्यापार, कौशल्यविकास आणि व्यवसायवृद्धीच्या संधी उपलब्ध होणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर तरुण व्यापाऱ्यांसाठी पक्षाच्या माध्यमातून भविष्यात स्वतंत्र योजना राबविण्यासाठी प्रयत्न केले जातील. पुणे पदवीधर मतदारसंघात ३५० पदवीधरांची मतदार नोंदणी करण्यासाठी विशेष लक्ष घालून पुढाकार घेतला. पदवीधरांचे शिक्षण व रोजगाराशी संबंधित प्रश्न आणि व्यापाऱ्यांच्या व्यावसायिक अडचणी यांचा परस्पर संबंध आहे. त्यामुळे या दोन्ही घटकांचे प्रश्न एकत्रितपणे विधानपरिषदेत मांडण्यासाठी डॉ. स्मिताताई जाधव याच पर्याय आहेत. त्यांमार्फत तरुण उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यावरही भर देण्यात येईल.
प्रवीण चोरबेले, नगरसेवक आणि व्यापारी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT