Gardens Water Supply Pudhari
पुणे

Pune Water Conservation: पुण्यातील १४४ उद्यानांना मिळणार प्रक्रिया केलेले पाणी; पिण्याच्या पाण्याचा वापर थांबवणार

७७२ गृहप्रकल्पांमधील बंद एसटीपी पुन्हा सुरू करण्यासाठी धोरण; पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा महापालिकेचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

पुणे: शहरातील पाणीटंचाईची तीव्रता वाढत असताना पिण्याच्या पाण्याचा वापर अन्य कामांसाठी होऊ नये, यासाठी महापालिकेने पाणीबचतीच्या उपाययोजनांना गती दिली आहे. शहरातील महापालिकेच्या सर्व १४४ उद्यानांमध्ये सिंचनासाठी प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा वापर केला जाणार आहे. विशेष म्हणजे, सध्या ४० हून अधिक उद्यानांमध्ये वापरल्या जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याला पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून दिली जाणार आहे.

त्याचबरोबर मोठ्या गृहप्रकल्पांमधील बंद अवस्थेत असलेले सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प पुन्हा सुरू करण्यासाठी स्वतंत्र धोरण आखले जाणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांनी दिली. तसेच, पुण्याच्या पाणी प्रश्नासानदर्भात पुढच्या आठवड्यात बैठक घेतली जाणार आहे, अशी माहिती देखील त्यांनी दिली. पावसाचे प्रमाण कमी झाल्याने शहरावर पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. जलसंपदा विभागाकडून मिळणाऱ्या पाणी कोट्यात कपात करण्यात आली असून, सध्या आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवला जात आहे.

उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, पाणी कोट्याच्या नियोजनासाठी पक्षनेत्यांची बैठक गेल्या महिनाभरापासून प्रस्तावित असून, अद्याप ती झालेली नाही. पाणीबचतीच्या उपाययोजनांचा भाग म्हणून उद्यानांमधील पाण्याच्या वापराचे नियोजन केले जात आहे. महापालिकेच्या १४४ उद्यानांपैकी ४० हून अधिक उद्यानांमध्ये सध्या पिण्याच्या पाण्याचा वापर होतो. काही ठिकाणी बोअरवेलच्या पाण्याचा वापर केला जातो. हा वापर पूर्णपणे थांबवून प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

७७२ गृहप्रकल्पांतील एसटीपी रडारवर

शहरातील शंभरपेक्षा अधिक सदनिका असलेल्या गृहप्रकल्पांमध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणे बंधनकारक आहे. शहरात अशा ७७२ प्रकल्पांची नोंद असून, त्यातील बहुतांश प्रकल्प तांत्रिक कारणांमुळे बंद असल्याचे निदर्शनास आले आहे. हे प्रकल्प पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जाणार असून, यासंदर्भात ठोस धोरणही निश्चित केले जाणार आहे.

पाणी वाया घालविल्यास दंड

नागरिकांमध्ये पाणीबचतीबाबत जनजागृती करण्यासोबतच प्रक्रिया केलेल्या पाण्याच्या पुनर्वापरावर भर दिला जाणार आहे. त्यासाठी नियमावली तयार करून पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. पिण्याच्या पाण्याचा अनावश्यक वापर रोखणे आणि उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे, हा या उपाययोजनांचा मुख्य उद्देश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT