

नसरापूर: अचानक लागलेल्या आगीने तांभाड (ता. भोर) येथील मादगुडेवाडी मध्ये तीन घरांना आग लागून जीवनावश्यक वस्तू जळून बेचिराख झाल्याने लाखोचे नुकसान झाले आहे. सुदैवाने यामध्ये जीवितहानी टळली असून सध्या आग नियंत्रण आणण्यासाठी अग्निशामक दलाचे पथक शर्तीचे प्रयत्न करत आहे.
भोर तालुक्यातील गुंजवणी खोऱ्यातील मादगुडेवाडी येथे घरांना आग लागल्याची घटना गुरुवाती (दि. २६) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली आहे. रमेश वाल्हेकर, प्रकाश वाल्हेकर, राहुल वाल्हेकर यांची घरे आगीत भस्मसात झाले असून शेजारच्या घरांना देखील आगिचे धग लागलेले मोठे नुकसान झाले आहे. आगीमध्ये घरातील सर्व अन्नधान्य, कपडे, रोकड, टीव्ही, फ्रिज, सोन्याच्या ऐवज तसेच जनावरांसाठी साठवलेला सारा जळून खाक झाला आहे. आग लागल्याचे कारण समजू शकले नाही.
आग लागल्याच समजताच घरातील कुटुंबांनी बाहेर पडल्याने जीवितहानी टळली आहे. शेजारी ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू केले आहेत. मोठ्या कष्टाने जमवलेले आर्थिक साहित्य डोळ्यासमोर जळून गेल्याने घरे जळालेला कुटुंबाच्या डोळ्यातून अक्षरश: अश्रूंचे बांध फूुटले असून कुटुंबाच्या आक्रोशाने ग्रामस्थांचे काळीज पिळवटले गेले आहे. दोन अग्निशामक पथक दाखल झाले असून आग नियंत्रण आणण्याचे काम सुरू आहेत.