Garbage Pudhari
पुणे

Pune Garbage Collection: पुण्यात कचरा संकलनाचे यांत्रिकीकरण रखडले; फीडर पॉइंटवरील अस्वच्छता कायम

महापालिकेकडे केवळ ८०२ कचरा गाड्या; प्रस्तावित व्यवस्थेसाठी आणखी सुमारे एक हजार वाहनांची गरज, जुनीच पद्धत सुरू ठेवण्याचा निर्णय

पुढारी वृत्तसेवा

पुणे: शहरातील कचऱ्याचे ढीग आणि फीडर पॉइंटवरील अस्वच्छता दूर करण्यासाठी पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी जाहीर केलेले कचरा संकलनाचे यांत्रिकीकरण अखेर रखडले आहे. कचरा थेट प्रक्रिया केंद्रांपर्यंत पोहोचवून फीडर पॉइंट बंद करण्याची महत्त्वाकांक्षी योजना वाहनांच्या कमतरतेमुळे अडचणीत आली आहे. त्यामुळे शहरातील कचरा संकलनाची जुनी पद्धतच कायम ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

मोठ्या उत्साहात जाहीर केलेल्या योजनेच्या अंमलबजावणीतील अडथळ्यांमुळे महापालिके च्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महापालिका आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर नवल किशोर राम यांनी शहरातील विविध भागांत अचानक पाहणी दौरे केले होते. त्या वेळी फीडर पॉइंटवर दिवसभर कचरा साचत असल्याचे निदर्शनास आले.

या ठिकाणांचे कचराअड्ड्यांमध्ये रूपांतर झाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यावर उपाय म्हणून संपूर्ण कचरा संकलन व्यवस्थेचे यांत्रिकीकरण करून कचरा थेट प्रक्रिया केंद्रांवर पाठविण्याची योजना आखण्यात आली. सुरुवातीला परिमंडळ एकमध्ये प्रायोगिक तत्त्वावर हा प्रयोगही सुरू करण्यात आला होता.

एक हजारांहून अधिक गाड्यांची गरज

शहरात सुमारे १८ लाख घरे आणि सोसायट्या आहेत. एका घंटागाडीद्वारे दिवसाला सरासरी एक हजार घरांमधील कचरा गोळा केला जातो, असे गृहीत धरल्यास संपूर्ण शहरासाठी सुमारे १,८०० घंटागाड्यांची आवश्यकता आहे. मात्र, महापालिकेकडे सध्या केवळ ८०२ कचरा गाड्या उपलब्ध आहेत. त्यामुळे प्रस्तावित व्यवस्था प्रभावीपणे राबविण्यासाठी आणखी सुमारे एक हजार गाड्यांची गरज आहे. वाहनांची कमतरता आणि आर्थिक व प्रशासकीय मर्यादांमुळे यांत्रिकीकरणाचे नियोजन रखडले आहे.

जुनीच व्यवस्था कायम

यांत्रिकीकरणाचा प्रस्ताव रखडल्याने सध्याची कचरा संकलन व्यवस्था सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरातील ५५ ते ६० टक्के भागांत 'स्वच्छ' संस्थेमार्फत, सुमारे २० टक्के भागांत महापालिकेमार्फत, तर उर्वरित २० टक्के भागांत स्थानिक पातळीवरील खासगी व्यवस्थेद्वारे कचरा संकलित केला जात आहे. त्यामुळे फीडर पॉइंटवरील कचऱ्याची समस्या दूर करण्यासाठी महापालिकेला नव्याने नियोजन करावे लागणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT