Pune Ganeshotsav Pudhari
पुणे

Pune Ganeshotsav: उत्सव इथंही... अन् तिथंही!

मध्य पुण्याच्या गर्दीपलीकडेही गणेशोत्सवाचा जागर; देखावे, विज्ञान, सामाजिक उपक्रम आणि नव्या पिढीच्या सर्जनशीलतेत दडलेला खरा उत्सव

पुढारी वृत्तसेवा

सुनील माळी

उत्सव मंदिरांच्या भव्य प्रतिकृतींनी विस्फारल्या जाणाऱ्या डोळ्यांत आहे, मांडवाबाहेरच्या भव्य भीतीदायक नरकासुराचा श्रीकृष्णाकडून वध होताना आनंदानं दिलेल्या घोषणांमध्ये उत्सव आहे...

मांडवातल्या बंद देखाव्यांसाठी लागलेल्या रांगांमध्ये उत्सव आहे, मांडवात सोडण्यासाठी आकारण्यात आलेल्या तिकिटामध्ये-क्यु आर कोडनं वाढत जाणाऱ्या बँक बँलन्समध्ये आहे, तसाच उत्सव मांडवासमोर होणाऱ्या लयबद्ध, नादमय, बेधुंद करणाऱ्या स्थिर ढोलवादनातही आहे...

उत्सव मांडवामध्ये दर तासाला नव्या पाहुण्यासोबत होणाऱ्या आरत्यांमध्ये आहे, कापुराच्या घमघमाटात आहे, वाटल्या जाणाऱ्या मावा पेढ्यांमध्ये आहे तसाच तो चाफा-शेवंतीच्या सुवासातही आहे...

उत्सव पहाट फुटेपर्यंत रस्त्यांवर सळसळणाऱ्या चैतन्यामध्ये आहे, मेट्रोच्या गर्दीत आहे. उत्सव न चुकता मानाच्या गणपतींना हजेरी लावणाऱ्या राजकारण्यांमध्ये आहे, लुकलुकते दिवे असलेल्या पांढऱ्या गाड्यांमागच्या आलिशान गाड्यांमधून उतरणाऱ्या माननीयांनी जोडलेल्या हातांमध्ये आहे...

उत्सव रस्तोरस्ती थाटलेल्या वडापाव, पावभाजीच्या गाड्यालगत उभं राहून न दमता प्लेट भरणाऱ्या श्रमिकांच्या हातामध्ये आहे, रात्रभर झालेल्या धंद्यामुळं त्यांच्या चेहऱ्यावर पसरलेल्या समाधानामध्ये आहे... उत्सव मंडळासमोर तासनतास पहारा देणाऱ्या पोलिसांच्या दमलेल्या पायांमध्ये आहे, त्यांना आलेल्या घामामध्ये आहे अन माननीयांच्या आगमनासाठी वाजवल्या जाणाऱ्या शिट्यांमध्ये आहे...

उत्सव उडत्या चालीतल्या गाण्यांवर नाचणाऱ्या रनिंग लायटिंगमध्ये आहे, त्यावर दुडकी पावलं टाकणाऱ्या जेन झींच्या पायांमध्ये उत्सव आहे. उत्सव कलाकारांनी रंगवलेल्या जिवंत देखाव्यांमध्ये आहे, त्यांना दाद देणाऱ्या प्रेक्षकांमध्ये आहे...

... उत्सव इथं आहे, पण तो जसा इथं आहे तसाच तो तिथंही आहे...

इथला हा उत्सव मध्य पुण्याच्या दीड दोन किलोमीटरच्या परिघामधल्या गर्दीत आहे, पण गर्दीचं वलय भेदून तु्म्ही चारही दिशांना पुढं गेलात, तर गर्दी विरेल आणि तिथला उत्सव दिसेल. तिथला म्हणजे या गर्दीबाहेरच्या भागातला... पूर्व पुण्यातला म्हणजे शिवाजी रस्त्याच्या पलिकडच्या भागातला तसाच काही उपनगरांतलाही...

... मेट्रोनं भरभरून कसब्यात अन मंडईत ओतलेल्या माणसांच्या राशी शिवाजी रस्त्यानं ओघळत-ओघळत मंडईपर्यंत जातात, काही प्रवाह नारायण-शनिवार पेठांकडं वळतात, पण शिवाजी रस्त्याच्या पूर्वेकडं असलेल्या पेठांकडं फार कमी पावलं वळतात...., उत्सव तरीही तिथंही आहे.

... हो, उत्सव तिथंही आहे. उत्सव प्रेक्षक कमी असले तरी उत्साहानं देखाव्याची मांडामांड करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मनात आहे, उत्सव आराशीविना फक्त श्रींची मूर्ती ठेवलेल्या मांडवात शांतपणानं पाजळणाऱ्या निरांजनात अन समईत आहे...

... उत्सव मामलेदार कचेरीलगतच्या कोणा शिवराज मंडळाच्या किरण सोनीवाल नामक कल्पक कार्यकर्त्यानं विश्वात्मक देवाचा प्रत्यय देण्यासाठी उभारलेल्या तारांगणातील अनंत अंतराळात आहे, त्याला मदत करणाऱ्या नासातल्या महिला अंतराळशास्त्रज्ञाच्या जिद्दीत आहे... अब्जावधी तारे अन त्यांचे त्याहूनही अधिक ग्रह सांभाळणाऱ्या मिल्की वे आकाशगंगेचा विस्तार..., भारताची यशस्वी चांद्रयान मोहीम..., माणसाचंच नव्हे तर आपल्या पृथ्वीचं अस्तित्त्वच किती नगण्य आहे आणि विश्व किती अनंत विस्तारलेलं आहे, याचा प्रत्यय देत नम्रतेची जाणीव करून देणारा अनोखा देखावा... तुलनेनं गर्दी कमी असली तरी उत्सव तिथंही आहे...
 
उत्सव येरवड्याच्या झोपडीवजा चाळीत राहूनही डीआरडीओ या संरक्षण संशोधनातील केंद्रीय संस्थेत अभियंता असलेल्या अमित जाधव नामक कार्यकर्त्याच्या अनोख्या देखाव्यात आहे. त्यानं प्रत्येक प्रेक्षकाच्या शंकेला शास्त्रीय उत्तर देण्यासाठी उभ्या केलेल्या विघ्नेश रोबोटमध्ये उत्सव आहे, झाडावरची फळं तोडून बादलीत जमा करणाऱ्या रोबोटिक आर्ममध्ये तो आहे, थ्री डी प्रिंटरमधून गणेश मूर्ती साकारण्याची प्रक्रिया पाहण्याची संधी प्रेक्षकांना देणाऱ्या त्याच्या योजनेत आहे... येरवड्यातील मोजक्या प्रेक्षकांशिवाय या देखाव्याकडं फारसं कुणी येत नाही, मध्य पुण्यातली मंदिरे-राक्षस वध आदी देखावे पाहून तृप्त झालेले गणेशभक्त या लांबच्या उपनगरांपर्यंत पोचण्याची शक्यताच नाही... तरीही हा इंजिनियर कार्यकर्ता उत्साहानं न्हाऊन का निघतो आहे ?, याचं कोडंच तिथपर्यंत पोचलेल्यांना लगेच उमगत नाही..., तसंच हडपसरच्या तरवडे वस्तीसारख्या अगदी आतल्या भागातही औद्योगिक क्रांतीपासून ते एआय अन रोबोटिक्सपर्यंतचा प्रवास दाखवणारे उषःकाल मंडळाचे अनुज भुजबळ तसंच त्यांचे सहकारी मोजका प्रेक्षकवर्ग मिळत असूनही का धडपडताहेत, त्याचंही उत्तर मिळत नाही, पण त्यांच्या धडपडीतही उत्सव आहे...उत्सव त्या कार्यकर्त्याच्या उत्साहात आहे, वेगळं-नव्या पिढीला प्रेरणा देणारं-काळाच्या बदलत्या पावलांची नोंद घेणारं असं काही तरी सादर करण्याच्या त्याच्या उर्मीत उत्सव आहे. उत्सव वर्षभर अचाट सामाजिक कामांचा आदर्श उभा करणाऱ्या आदर्श मंडळाच्या उदय जगताप याच्या कार्यकर्तृत्वात आहे... त्यात थेट नक्षलग्रस्त भागांत जाऊन शांततेची शपथ घेण्याचा उपक्रम असेल, गुन्हेगारांना रोजगार देण्याचा असेल, गुन्हेगारांच्या मुलांना शिक्षण देण्याचा असेल...

त्या सर्व उपक्रमशीलतेत उत्सव आहे..., पेठा ओलांडून अरण्येश्वर भागात गेलो तर एकता मंडळानं व्यसनाधीन होत चाललेल्या पिढीला दिलेल्या सावधानतेच्या इशाऱ्यामध्ये अन मदत म्हणून वही-पेन घेत असलेल्या गरजू विद्यार्थ्यांच्या समाधानी चेहऱ्यावर उत्सव झळ‍कतो आहे... मोबाईलवरची भडक दृश्ये, संगत अन जंक फूडमुळं फारच कमी वयात पाळी येण्याची नाजूक समस्या प्रसंगनाट्याद्वारे मांडण्याचं आणि त्यावरचे उपाय मुलींपर्यंत तसंच त्यांच्या पालकांपर्यंत पोचवण्याचं धाडस एरंडवण्याच्या चाळीत राहणाऱ्या पूरग्रस्तांच्या शनि मारूती मंडळानं दाखवलं. प्रेक्षक कितीही कमी आले तरी रात्री बारापर्यंत उत्साहानं किमान बारा-चौदा प्रयोग करणाऱ्या लहानग्या मुलींच्या आणि मंडळाचे अध्यक्ष सचिन पवार यांच्या उत्साहात उत्सव आहे...    

... म्हणूनच म्हणतो..., पुण्यात गणपती अन त्यांच्या भोवतीचे देखावे पाहायला आलेल्या बाहेरच्या मंडळींनो, तसंच अस्सल पुणेकरांनोही..., उत्सव पाहायला बाहेर पडलात तर फक्त तुळशीबाग-मंडई-बेलबाग चौकाच्या आसपासच्या गर्दीतच धक्के खात देखावे पाहू नका..., इथला उत्सव तुम्ही पाहाच, पण पेठांच्या परिघापलिकडंही जा..., कारण उत्सव तिथंही आहे...

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT