पुणे: गणरायाच्या आगमनाची चाहूल लागताच पुण्याच्या बाजारपेठांनाही उत्सवाचा रंग चढला आहे. तुळशीबागेपासून लक्ष्मी रस्त्यापर्यंत आणि बोहरी आळीपासून मंडईपर्यंत सर्वत्र खरेदीसाठी पुणेकरांची गर्दी उसळली असून, सजावटीच्या साहित्यांनी सजलेली दुकाने आणि खरेदीसाठी नागरिकांची गर्दी, यामुळे मध्यवर्ती पुण्याचा परिसर अक्षरशः गजबजून गेला आहे.
शनिवारीही (दि. १३) बाजारपेठांमध्ये खरेदीचा उत्साह पाहायला मिळाला. शनिवार म्हणजेच सुटीच्या दिवसाचे निमित्त साधत पुणेकरांनी गणेशोत्सवाच्या खरेदीला महत्त्व दिले. 'बाप्पाच्या स्वागताची तयारी काही कमी पडायला नको', या उत्साहात नागरिकांकडून पूजेचे साहित्य, सजावटीच्या वस्तू, फुले,तोरणे आणि आरास साहित्याची खरेदी करण्यात आली. त्यामुळे बाजारपेठांतही उत्सवाचे वातावरण अनुभवायला मिळाले.
पूजेच्या साहित्यांच्या खरेदीसाठी गर्दी
गणेशोत्सवासाठी घराची सजावट, पूजेचे साहित्य, फुले, हार, तोरणे, आरास करण्यासाठी लागणारे साहित्य, समई, पणत्या, कापूर, उदबत्ती, हळद-कुंकू, अष्टगंध असे विविध पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारपेठांमध्ये लगबग दिसून आली. रविवार पेठेतील बोहरी आळी असो वा मंडई येथे खरेदीसाठी मोठी गर्दी झाली. जिथे पाहाल तिथे खरेदी करणारे नागरिक असे चित्र बाजारपेठांमध्ये रंगले होते.
मंडईत पूजेचे साहित्य, लक्ष्मी रस्ता आणि तुळशीबागेत गौरीपूजनासाठीचे साहित्य, शनिपार येथे मिठाई, मोदकांची खरेदी, रविवार पेठेतील बोहरी आळीत सजावटीचे साहित्य खरेदीत करण्यात व्यग्र असलेले नागरिक पाहायला मिळाले. मुख्य बाजारपेठांमध्ये गर्दी झाल्याने काही ठिकाणी तर पार्किंगसाठीही जागा उपलब्ध नव्हती, तर बाजारपेठांमध्ये काही ठिकाणी वाहतूक कोंडीही झाली. आपल्या सजावटीच्या संकल्पनेनुसार आणि पसंतीनुसार वस्तूंची साहित्यांची खरेदी करण्यावर पुणेकरांनी भर दिला. खरेदी करणाऱ्यांमध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती.
व्यापाऱ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण
यंदा हरितालिका आणि श्री गणेश चतुर्थी एकाच दिवशी असल्याने मंडईमध्ये हरितालिका पूजनासाठी लागणाऱ्या साहित्यांच्या खरेदीसाठीही महिला-युवतींची गर्दी पाहायला मिळाली. खरेदीचा उत्साह मध्यवर्ती पेठांसह कॅम्प, खडकी, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, जंगली महाराज रस्ता, डेक्कन परिसरसह उपनगरांतील बाजारपेठांमध्ये पाहायला मिळाला. शनिवार असल्याने सहकुटुंब अनेकांनी खरेदी करण्यास प्राधान्य दिले, तर बाजारपेठांमध्ये येण्यासाठी काही पुणेकर मेट्रोने येण्याला महत्त्व देत आहेत. बाजारपेठांमधील झालेल्या गर्दीमुळे व्यापाऱ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण होते. बाजारपेठांनी अनुभवलेली ही गर्दी गणेशोत्सवाचा आनंद आणखी द्विगुणित करणारी ठरली.