Ganeshotsav Puja Samagri Pudhari
पुणे

Pune Ganeshotsav Puja Samagri: गणेशोत्सवाच्या तयारीला वेग; पुण्यात पूजासाहित्याच्या खरेदीसाठी बाजारपेठा फुलल्या

गणेश व सत्यनारायण पूजेच्या साहित्याच्या बॉक्सला सर्वाधिक मागणी; पूजासाहित्याच्या किमती २० ते ३० टक्क्यांनी वाढल्या

पुढारी वृत्तसेवा

पुणे: गणेशोत्सवाला आता अवघे काही दिवस राहिल्यामुळे बाप्पाच्या स्वागताची तयारी घराघरांत सुरू झाली आहे. उत्सवातील महत्त्वाचा भाग असलेल्या पूजासाहित्याच्या खरेदीलाही पुणेकर प्राधान्य देत आहेत. कापूर, अगरबत्ती, हळदी-कुंकू, अष्टगंध, शेंदूर, बुक्का, फुलवाती अशा पूजा साहित्याने बाजारपेठा सजल्या असून, विशेषतः श्री गणेश पूजनासाठी आणि सत्यनारायण पूजेसाठी तयार केलेल्या साहित्याच्या बॉक्सला मोठी मागणी आहे. रविवार पेठ, मंडई, तुळशीबाग, लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता यांसह विविध बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी गर्दी होत असून, बाजारपेठांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे.

गणेशोत्सवानिमित्त नागरिकांनी पूजेसाठी आवश्यक साहित्यांची जमवाजमव सुरू केली आहे. उत्सवाच्या आठवडाभर आधीच पूजासाहित्यांच्या खरेदीला प्राधान्य दिले जात आहे. व्यावसायिकांकडे पूजेच्या साहित्यांचे वेगवेगळे प्रकार उपलब्ध आहेत. पूजेच्या साहित्यांच्या बॉक्सला मोठी मागणी असून, बॉक्समध्ये हळदी-कुंकू, फुलवाती, कापूस, कापूर, अष्टगंध यांसह पूजेसाठी आवश्यक असणाऱ्या विविध साहित्यांचा समावेश करण्यात आला आहे.

त्यामुळे प्रत्येक साहित्य स्वतंत्रपणे खरेदी करण्याची गरज नसल्याने लोकांकडून या बॉक्सला पसंती मिळत आहे. याशिवाय हळदी-कुंकू, बुक्का, कापूर, आसन, उपरणे, शेंदूर, अष्टगंध, पूजेचे वस्त्र, समईच्या वाती, आरती पुस्तिका, अगरबत्ती, फुलवाती, कापूस आणि रांगोळी अशा विविध साहित्यांचीही खरेदी होत आहे. चाफा, मोगरा, चंदन, गुलाब, अशा विविध प्रकारच्या सुंगधी अगरबत्ती बाजारात उपलब्ध आहेत. पूजेसाठी लागणारे कापड, आर्टिफिशिअल फुले, हार, तोरणे आदी साहित्यही बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

पूजासाहित्याच्या विक्रीसाठी व्यावसायिकांकडून ऑनलाइन माध्यमांचाही वापर केला जात आहे. व्यावसायिक धनंजय घोलप म्हणाले, पूजा साहित्याला चांगली मागणी आहे. श्रीगणेश व सत्यनारायण पूजेसाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांची लगबग सुरू झाली आहे. कापूर, अष्टगंध, अगरबत्ती, हळदी-कुंकू यासह विविध पूजा साहित्याची मागणी वाढली आहे. श्री गणेश पूजन आणि सत्यनारायण पूजेसाठीच्या बॉक्सची सर्वाधिक मागणी होत आहे. येत्या काही दिवसांत पूजा साहित्याची मागणी आणखी वाढू शकते.

पूजासाहित्यांची किंमत वाढली

यंदा पूजा साहित्याच्या किमतीत साधारण २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. कच्च्या मालाच्या किमती आणि इतर खर्च वाढल्याने काही साहित्यांच्या दरात वाढ झाली असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. श्रीगणेश पूजेसाठीचा बॉक्स ४०० रुपये, तर सत्यनारायण पूजेसाठीचा बॉक्स ३०० आणि ४५० रुपये अशा दरात उपलब्ध आहेत. पूजा साहित्याची किंमत साधारणपणे २० रुपयांपासून पुढे आहे. पूजेचे साहित्य महागले असले तरी खरेदीसाठी लोकांचा उत्साह कमी झालेला नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT