Police Pudhari
पुणे

Pune Ganeshotsav Police Bandobast: गणेशोत्सवासाठी पुणे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त; ७,५०० पोलिसांचा फौजफाटा सज्ज!

गर्दीच्या ठिकाणी साध्या वेशातील पोलिसांची करडी नजर; महिला सुरक्षेसाठी छेडछाडविरोधी पथके, QRT आणि SRPFही तैनात

पुढारी वृत्तसेवा

पुणे: गणेशोत्सवाला आजपासून सुरुवात होत असून, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पुणे पोलिसांनी कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. गणेशोत्सवाच्या बारा दिवसांच्या कालावधीत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह तब्बल सव्वासात हजार पोलिस अधिकारी आणि अंमलदार शहराच्या रस्त्यावर तैनात राहणार आहेत.

गणेशोत्सवात शहरातील प्रमुख गणेश मंडळे, गर्दीची ठिकाणे, बाजारपेठा आणि सार्वजनिक वाहतुकीच्या परिसरात विशेष बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. गुन्हे शाखेकडून साध्या वेशातील पथके तैनात करण्यात येणार असून, गर्दीचा फायदा घेत मोबाईल, पाकीट व मौल्यवान वस्तूंच्या चोऱ्या करणाऱ्या सराईतांवर त्यांची करडी नजर राहणार आहे.

महिला व तरुणींच्या सुरक्षिततेसाठी छेडछाडविरोधी पथकेही सक्रिय राहणार आहेत. गर्दीमध्ये महिलांची छेडछाड, गैरवर्तन किंवा अनुचित प्रकार करणाऱ्यांवर तत्काळ कारवाई केली जाणार आहे. त्याबरोबर संवेदनशील ठिकाणी क्यूआरटी आणि एसआरपीएफची पथकेही तैनात करण्यात आली आहेत.

गणेशोत्सवाच्या काळात शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासोबतच वाहतूक सुरळीत ठेवण्याचेही मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. दरम्यान, गणेशोत्सव हा शांततेत आणि उत्साहात पार पडावा, यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

गणेशोत्सवासाठी पोलिसांचा फौजफाटा

वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून अंमलदारांपर्यंत मोठी यंत्रणा

  • अप्पर पोलिस आयुक्त : ४

  • पोलिस उपायुक्त : १४

  • सहाय्यक पोलिस आयुक्त : ३०

  • पोलिस निरीक्षक : २१५

  • पोलिस उपनिरीक्षक : ७००

  • पोलिस अंमलदार : ७ हजार २००

  • होमगार्ड : १ हजार १००

  • क्यूआरटी व एसआरपीएफची पथकेही तैनात

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT