Pune Ganeshotsav Live Tableaux: पुण्यात गणेशोत्सवासाठी जिवंत देखाव्यांची जय्यत तयारी! पौराणिक, ऐतिहासिक ते सामाजिक विषयांची मेजवानी

बाप्पाच्या आगमनापूर्वी मंडपांमध्ये कलाकारांची धावपळ; राज्यभरातून आलेले कलाकार सज्ज, AI ते ऑपरेशन सिंदूरपर्यंत विविध विषयांवर देखावे
Ganeshotsav Live Tableaux
Ganeshotsav Live TableauxPudhari
Published on
Updated on

पुणे: कुठे ऐतिहासिक व्यक्तिरेखेची रंगभूषा सुरू आहे, कुठे नेपथ्याला अंतिम रूप दिले जात आहे तर कुठे प्रकाशयोजनेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. सोमवारी (दि.१४) बाप्पाचे आगमन होणार असल्याने पुण्यातील गणेश मंडळांच्या मंडपांमध्ये कलाकारांची अक्षरशः धावपळ सुरू झाली आहे. पौराणिक, ऐतिहासिक आणि सामाजिक विषयांवरील जिवंत देखावे (सजीव देखावे) सादर करण्यासाठी फक्त पुण्यातीलच नव्हे, तर राज्याच्या विविध भागांतून आलेले कलाकार सज्ज असून, मंडळांच्या ठिकाणी देखाव्यांसाठीची तयारीही अंतिम टप्प्यात आली आहे. उत्सवात रोज सायंकाळी सहानंतर देखावे सादर होणार असून, श्री गणेश चतुर्थीच्या दिवसापर्यंत संपूर्ण देखाव्याचे नियोजन पूर्ण करण्यासाठी कलाकार आणि मंडळांचे कार्यकर्ते एकत्रितपणे काम करीत आहेत.

Ganeshotsav Live Tableaux
Pune Festival Mangalacharan: पुणे फेस्टिव्हलचा मंगलाचरण सोहळा उत्साहात! ढोल-ताशांच्या गजरात सांस्कृतिक पर्वाची नांदी

मंडळांचा यंदाही जिवंत देखाव्यांवर भर

गणेश मंडळांकडून सादर केले जाणारे देखावे ही पुण्यातील गणेशोत्सवाची स्वतंत्र ओळख बनली आहे. एखादा ऐतिहासिक प्रसंग हुबेहूब उभा करणे, पौराणिक कथेला अभिनयाची जोड देणे किंवा सामाजिक प्रश्नावर प्रेक्षकांचे लक्ष वेधणे, अशा विविध संकल्पना देखाव्यांच्या माध्यमातून मांडल्या जात आहेत. त्यामुळेच बहुतांश मंडळांनी यंदाही जिवंत देखाव्यांवर भर दिला आहे. सध्या कलाकारांसोबत नेपथ्यकार, रंगभूषाकार, प्रकाशतज्ज्ञ, ध्वनितज्ज्ञ आणि तंत्रज्ञांची तयारी अंतिम टप्पात आली असून, मंडपातील उपलब्ध जागा, प्रेक्षकांची ये -जा आणि निवडलेला विषय यांचा विचार करून संपूर्ण देखाव्याची आखणी करण्यात आली आहे.

Ganeshotsav Live Tableaux
Pune Ganeshotsav Immersion: गणरायाच्या स्वागतासाठी पुणे सज्ज! विसर्जनासाठी महापालिकेची जय्यत तयारी

पुण्यातील स्थानिक कलाकारांचा देखाव्यांमध्ये सहभाग असणार आहेच. त्याशिवाय बीड, नाशिक, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, मुंबई, छत्रपती संभाजीनगर यांसह राज्यातील विविध भागातून आलेले कलाकार देखाव्यांमध्ये सहभागी होणार आहेत. मंडळांच्या उत्सव मंडपात रात्री उशिरापर्यंत नेपथ्याची जोडणी, प्रकाशयंत्रणा बसविणे आणि साऊंड सिस्टिमची चाचणी, अशी तयारीही पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे काही देखाव्यांमध्ये मंडळातील कार्यकर्तेही काम करणार आहेत.जिवंत देखाव्यांचे दिग्दर्शक राजेंद्र पालवे म्हणाले, यंदाही आम्ही काही मंडळांचे देखावे सादर करणार आहोत. अनुभवींसह नवोदित कलाकार देखाव्यांमध्ये सहभागी झाले आहेत. सध्या ३० ते ४० कलाकार देखाव्यांसाठीची तयारी करत आहेत. अभिनय क्षेत्रात नव्याने येऊ पाहणाऱ्या कलाकारांसाठी गणेशोत्सव हा अनुभव आणि आर्थिक उत्पन्न मिळवून देणारा महत्त्वाचा काळ ठरत आहे.

Ganeshotsav Live Tableaux
Pune Ganeshotsav Market: गणरायाच्या स्वागताने पुण्याच्या बाजारपेठांना बहर! यंदा दीड हजार कोटींची उलाढाल अपेक्षित

अन्न सुरक्षेबाबतच्या कारवाईवरही पडणार देखाव्‍यातून प्रकाश

राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अन्न सुरक्षेबाबत केलेल्या कारवाईवर आधारित देखावेही यंदा उत्सवात पाहायला मिळणार आहेत. काही मंडळे याविषयावर आधारित देखावे साकारणार आहेत. तसेच, कृत्रिम बुद्धिमत्तेची दुनिया ते ऑपरेशन सिंदूरपर्यंत...अशा विविध विषयांवरील देखावेही लक्षवेधी ठरणार आहेत.

Ganeshotsav Live Tableaux
Pune Satara Highway Traffic Jam: गणेशोत्सवासाठी कोकणवासी निघाले; पुणे-सातारा महामार्गावर ६ किमीपर्यंत वाहतूक कोंडी

आम्ही ऐतिहासिक विषयांवर आधारित देखावे सादर करणार आहोत. सध्या तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. शहरातील मध्यवर्ती भागासह पौड रस्ता, एरंडवणे, धनकवडी आदी ठिकाणी आम्ही देखावे सादर करणार आहोत. उत्सवात सायंकाळी सहानंतर देखावे सादर करण्यात येणार आहेत. कलाकारही देखावे सादर करण्यासाठी सज्ज आहेत.

वृंदा साठे, कलाकार

गणेशोत्सवात कलाकारांकडून सादर करण्यात येणाऱ्या जिवंत देखाव्यांची संख्या वाढली आहे. विशेषत: सामाजिक विषयांवरील देखाव्यांमधून जनजागृती करण्यावर मंडळे भर देत आहेत. देखाव्यांमध्ये फक्त स्थानिक कलाकारांचाच सहभाग नसतो तर राज्यभरातून आलेले कलाकारांनाही देखाव्यात अभिनयाची संधी मिळते. उत्सवातील दहा दिवस प्रत्येकासाठी महत्त्वाचे असतात.

राहुल भालेराव, जिवंत देखाव्यांचे दिग्दर्शक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news