पुणे: शांतता क्षेत्रात ध्वनिक्षेपकाचा आवाज पूर्णपणे बंद ठेवणे बंधनकारक असताना पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील गणेशोत्सवासाठी देण्यात आलेल्या ध्वनिक्षेपक परवानग्यांचा फेरविचार करावा, अशी मागणी लाऊडस्पीकरविरोधी पुणेकर मंचाने केली आहे. राष्ट्रीय हरित लवादाच्या (एनजीटी) पश्चिम विभागीय खंडपीठाने दि. १० सप्टेंबर २०२६ रोजी दिलेल्या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी मंचाने केली आहे.
शहरातील १२१, तर पिंपरी-चिंचवडमधील ६५ शांतता क्षेत्रांत निर्धारित ध्वनिमर्यादा लागू आहेत. रुग्णालये, शैक्षणिक संस्था आणि न्यायालय परिसरातील १०० मीटर अंतरात ध्वनिक्षेपक वापरण्यास मनाई असल्याचा दावा मंचाने केला आहे. पूना हॉस्पिटल, फर्ग्युसन कॉलेज, एस.पी. कॉलेज, नूमवि, अशोक विद्यालय, गरवारे कॉलेज, मॉडर्न कॉलेज, संचेती हॉस्पिटल आणि पुणे जिल्हा न्यायालय परिसराचा मंचाने उल्लेख केला आहे.
'चार बेस, चार टॉप'ची परवानगीचा फेरविचार करावा
एनजीटीच्या २०२४ मधील आदेशाच्या पार्श्वभूमीवर ध्वनिप्रदूषण नियंत्रणासाठी प्रोटोकॉल निश्चित करण्याचा मुद्दा न्यायालयासमोर होता. ४० मीटरच्या मंडपात १०० वॅटचा स्पीकरही सुमारे ८० डेसिबल आवाज निर्माण करू शकतो, असे निरीक्षण नोंदविल्याचे मंचाने म्हटले आहे. त्यामुळे पुण्यात पोलिसांनी दिलेली 'चार बेस, चार टॉप'ची परवानगी मोठ्या क्षमतेची असल्याने तिचा फेरविचार करावा, अशी मागणी आहे.
एनजीटीच्या आदेशानुसार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पोलिसांच्या सहकार्याने कारवाई करणे आणि ध्वनिपातळीचा रिअल-टाइम डेटा संकेतस्थळावर उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे. मात्र, पुण्यात अद्याप संबंधित माहिती आणि अधिकाऱ्यांची यादी सार्वजनिक केलेली नाही, असा आरोप मंचाने केला आहे. यापूर्वी पोलिस आयुक्तांना निवेदन देऊनही कारवाई न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर न्यायालयाच्या अवमानाची कारवाई होऊ शकते, असा इशारा मंचाचे मुकुंद किर्दत यांनी दिला.
गणेशोत्सवात ड्रोन उडविल्यास थेट जप्ती!
गणेशोत्सवाच्या काळात गर्दीच्या ठिकाणी विनापरवाना ड्रोन उडविणाऱ्यांवर आता थेट जप्तीची कारवाई केली जाणार आहे. गणेश मंडप, देखावे, विसर्जन मिरवणूक आणि गर्दीच्या परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी शहरात विशेष ड्रोन जप्ती पथक तैनात करण्यात आले आहे. नियम डावलून ड्रोन उडविल्याचे आढळल्यास संबंधित ड्रोन घटनास्थळीच जप्त केला जाणार आहे.
सुरक्षेच्या कारणास्तव गणेशोत्सव काळात शहरात विनापरवाना ड्रोन उडविण्यास बंदी घालण्यात आली असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. गणेशोत्सवात मध्यवर्ती पुण्यासह विविध भागांत मोठ्या प्रमाणात गर्दी होते. देखावे पाहण्यासाठी भाविकांची होणारी गर्दी, गणेश मंडळांचे कार्यक्रम तसेच विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर ड्रोनच्या अनधिकृत वापरामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाने ड्रोनच्या हालचालींवर विशेष लक्ष ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ड्रोन उडविण्यासाठी आवश्यक परवानगी न घेता कोणी ड्रोन उडवित असल्याचे आढळल्यास जप्ती पथक तत्काळ कारवाई करणार आहे. मिरवणूक मार्गावर ड्रोनचा वापर करणाऱ्यांवर पथकाची नजर राहणार आहे.
दि. १९, २०, २२, २३ आणि २५ सप्टेंबरपर्यंत रात्री १२ पर्यंत ‘वाजवा रे वाजवा’
दि. १९, २०, २२, २३ सप्टेंबर या चार दिवशी रात्री बारापर्यंत गणेश मंडळांचे देखावे खुले ठेवण्यास तसेच ध्वनिक्षेपक आणि डीजे वापरण्यास सवलत देण्यात आली आहे. तर दि. 25 सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन दिवशीही रात्री बारा वाजेपर्यंत डीजेसाठी परवागनी असणार आहे. यामध्ये चार टॉप, चार बेसचीच परवानगी असाणार आहे. त्यामुळे या दिवसांत रात्री उशिरापर्यंत शहरातील प्रमुख गणेश मंडप आणि विसर्जन मार्गांवर मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.
मनोज जरांगे यांचा परवानगीसाठी अर्ज
मुंबईला जाण्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे १७ सप्टेंबरच्या रात्री पुण्यात आगमन होणार असून, १८ सप्टेंबरला ते मुंबईकडे रवाना होणार आहेत. त्यांचा ताफा लोणी काळभोर-हडपसर-स्वारगेट-सिंहगड रस्ता-चांदणी चौक-वाकड-जुना पुणे-मुंबई महामार्ग या मार्गाने जाणार आहे. त्यासाठी परवानगी संबधी अर्ज पुणे पोलिसांकडे आला आहे. ताफ्याच्या स्वागतासाठी प्रत्येक चौकात मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्याच काळात केंद्रीय गृहमंत्री, उपराष्ट्रपती, मुख्यमंत्री आणि अन्य मंत्र्यांचे पुणे दौरे असल्याने पोलिसांवरील बंदोबस्ताचा ताण वाढणार आहे. व्हीआयपी हालचाली आणि जरांगे यांच्या ताफ्यामुळे वाहतूक कोंडीचे मोठे आव्हान राहणार आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी संपूर्ण मार्गावर कडेकोट पोलिस बंदोबस्तचे नियोजन करण्यात आले आहे.
मोठ्या क्षमतेचा प्लाझ्मा स्पीकर वापरून डीजे वाजविणाऱ्यांवर कारवाई
सर्वोच्च न्यायालय तसेच पुणे शहर पोलिस आयुक्तांनी दिलेल्या सूचनांचे उल्लंघन करून गणेश चतुर्थीनिमित्त गणेश स्थापना मिरवणुकीत मोठ्या क्षमतेचा प्लाझ्मा स्पीकर वापरून कर्णकर्कश आवाजात डीजे वाजविणाऱ्यांवर काळेपडळ पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत तब्बल १४ लाख रुपये किमतीची डीजे साऊंड सिस्टिम जप्त करण्यात आली.
दि. १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी सुमारे ५.३५ वाजता शेल पेट्रोल पंपाजवळ, शंभू कॉलनी, महंमदवाडी परिसरात मोठ्या आवाजात डीजे सुरू असल्याची माहिती पोलिस हवालदार संजय देसाई व अमोल फडतरे यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी पोहचले. त्यांनी तांत्रिक तपासणी केली. या वेळी प्लाझ्मा साऊंड सिस्टिमचा वापर करून मोठ्या आवाजात डीजे वाजविला जात असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी पंचनामा करून सार्वजनिक ठिकाणी मोठ्या क्षमतेच्या ध्वनिक्षेपण यंत्रणेचा वापर करून ध्वनिप्रदूषण केल्याप्रकरणी कारवाई केली. तसेच पोलिस सहआयुक्त, पुणे शहर यांनी बीएनएसएस कलम १६८ अन्वये जाहीर केलेल्या आदेशाची अवज्ञा केल्याप्रकरणी कळेपडळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत सुमारे सात लाख रुपये किमतीचा टाटा कंपनीचा ७०९ ट्रक तसेच सात लाख रुपये किमतीचे दोन बेस, दोन टॉप साऊंड आणि मिक्स मशीनसह प्लाझ्मा सिस्टिम असा एकूण १४ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलिस उपायुक्त परिमंडळ-६ जीवन बेनीवाल व वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीश निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक (गुन्हे) अण्णासो बाबर, सहायक पोलिस निरीक्षक अमित शेटे, पोलिस उपनिरीक्षक संदीप राऊत, पोलिस हवालदार संजय देसाई व अमोल फडतरे यांच्या पथकाने केली.