Ganeshotsav Live Tableaux Pudhari
पुणे

Pune Ganeshotsav Live Tableaux: एलईडी, एआय अन् भव्य सेट; यंदा गणेशोत्सवातील देखाव्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड!

ऑपरेशन सिंदूरपासून महिला सुरक्षिततेपर्यंत विविध विषयांवर जिवंत देखावे; मनोरंजनासोबत सामाजिक प्रबोधनावर भर

पुढारी वृत्तसेवा

पुणे: मोठ्या एलईडी स्क्रीन, त्याला साजेसा भव्य सेट, प्रकाशयोजना, साउंड इफेक्ट्स आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) माध्यमातून साकारलेली दृश्ये...हे एखाद्या चित्रपटाचे चित्रीकरण नव्हे, तर यंदाच्या गणेशोत्सवातील कलाकारांकडून सादर होणारे देखाव्यांचे (जिवंत देखावे) बदलते रूप आहे. ऑपरेशन सिंदूरपासून विद्यार्थी आंदोलनापर्यंत, एआयच्या वाढत्या प्रभावापासून महिला सुरक्षिततेपर्यंत...अशा विविध विषयांवर देखावे सादर करण्यासाठी कलाकारांच्या तयारीला वेग आला असून, कथानकांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत यंदा देखाव्यांमधून मनोरंजनासोबत सामाजिक प्रबोधनही केले जाणार आहे. मंडळांकडून देखाव्यांची संकल्पना निश्चित होताच कलाकारांची लगबग सुरू झाली असून, आकर्षक आणि प्रभावी देखावे साकारण्यावर भर दिला जात आहे.

गेल्या काही वर्षांत गणेशोत्सवातील देखाव्यांना मोठी लोकप्रियता मिळाली असून, एकूण देखाव्यांमध्ये त्यांचे प्रमाण ४० ते ५० टक्क्यांपर्यंत असल्याचे चित्र आहे. उत्सवाचे दहाही दिवस हे देखावे भाविकांना पाहायला मिळतात. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्यगाथेवर आधारित ऐतिहासिक देखाव्यांसोबतच महिला सुरक्षितता, मराठी शाळा, कौटुंबिक नात्यांतील दुरावा, सोशल मीडियाचा परिणाम, गडकिल्ले संवर्धन, राजकारण, अंधश्रद्धा निर्मूलन अशा सामाजिक विषयांवरही देखावे साकारले जात आहेत. काही मंडळांडून पौराणिक देखावे सादर होणार आहेत.

सध्या कलाकारांकडून संहितालेखन, संवादलेखन, संगीत, रेकॉर्डिंग, गीतनियोजन, नेपथ्य, रंगभूषा आणि प्रकाशयोजनेचे काम सुरू आहे. देखाव्यांमध्ये कलाकारांच्या अभिनयासोबतच विषयानुरूप व्हिडीओंचाही वापर केला जाणार आहे. मंडळाच्या परिसरात प्रोजेक्टरच्या माध्यमातून हे व्हिडीओ दाखवले जातील. तसेच, काही देखावे मंडळांच्या अधिकृत फेसबुक, इन्स्टाग्राम आणि यू-ट्यूब चॅनेलवर लाइव्ह दाखवण्याची तयारीही सुरू आहे.

देखाव्यांचे दिग्दर्शक राहुल भालेराव म्हणाले, की गेल्या काही वर्षांत जिवंत देखाव्यांच्या सादरीकरणात नवे प्रयोग आणि वेगळी मांडणी करण्यावर भर दिला जात आहे. एलईडी स्क्रीन, भव्य सेट आणि विविध इफेक्ट्सला महत्त्व देण्यात येत आहे. यंदा पौराणिक आणि सामाजिक विषयांवरील देखावे सादर करणार असून, त्यापैकी एक अंधश्रद्धा निर्मूलनावर आधारित आहे. दोन देखाव्यांमध्ये मिळून २० ते २२ कलाकार सहभागी होणार आहेत. काही मंडळांकडून एआयवर आधारित देखावेही साकारले जात आहेत.''

दर वर्षी देखाव्यातून सामाजिक जनजागृती करण्याची परंपरा आम्ही यंदाही कायम ठेवली आहे. मंडळाचे कार्यकर्तेच देखाव्याचे नियोजन करण्यापासून अभिनयापर्यंतची जबाबदारी सांभाळतात. यंदा 'सर्वमान्य लोकमान्य' हा देखावा सादर करण्यात येणार असून, लोकमान्य टिळक यांचा संघर्ष, त्याग, राष्ट्रप्रेमाची गाथा, कार्य आणि विचार त्यातून मांडले जाणार आहे. मंडळातील १२ कलाकार देखाव्यात अभिनय करणार आहेत. सध्या देखाव्याची तयारी सुरू आहे.
पीयूष शाह, अध्यक्ष, साईनाथ मंडळ ट्रस्ट

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT