

पुणे: गणेशोत्सवाचा आनंद आणि पारंपरिक उत्साह कायम राहायलाच हवा; मात्र त्यासाठी नागरिकांच्या आरोग्य आणि शांततेशी तडजोड कशासाठी? असा थेट सवाल दै. 'पुढारी'च्या जागरूक वाचकांनी उपस्थित केला आहे. डीजे-डॉल्बीच्या कर्णकर्कश आवाजाला लगाम घालण्याबरोबरच नागरी वस्तीजवळ दीर्घकाळ चालणाऱ्या ढोल-ताशांच्या सरावावरही मर्यादा हवी, अशी भूमिका वाचकांनी मांडली. उत्सवाचे पावित्र्य आणि पुण्याची सांस्कृतिक ओळख जपत समाजप्रबोधनपर उपक्रमांना प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
ढोल-ताशा आणि लेझीम पथकांचा दीर्घकाळ चालणारा सराव नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहे. पुणे शहरातील नदीपात्रात होणाऱ्या सरावासोबतच यंदापासून समाविष्ट गावांमध्येही नागरी वस्तीलगत काही ढोल-ताशा व लेझीम पथकांनी सराव सुरू केला आहे. पालखी प्रस्थानापासून गणेशोत्सवाच्या सांगतेपर्यंत जवळपास अडीच महिने हा सराव सुरू राहतो. विशेष म्हणजे, हा सराव मोकळ्या जागेत आणि नागरी वस्तीजवळ केला जात असून, एका पथकात साधारण दीडशे ते चारशे वादक सहभागी होत आहेत. त्यामुळे दीर्घकाळ होणाऱ्या मोठ्या आवाजाचा परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
अशोक मेहेंदळे आणि राज सिंग, पुणे.
गणेशोत्सवात मोठ्या आवाजात डीजे आणि डॉल्बी वाजवण्यास सक्त विरोध केला पाहिजे. कर्णकर्कश आवाजाचा लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींना मोठा त्रास होतो. ध्वनिप्रदूषणासोबतच वाहतूक कोंडी वाढून नागरिकांच्या दैनंदिन जीवनावरही परिणाम होतो. त्यामुळे प्रशासनाने अशा प्रकारांवर कठोर कारवाई करावी. गणेशोत्सवाचा आनंद साजरा करताना पर्यावरण, नागरिकांचे आरोग्य आणि शांततेचाही विचार होणे आवश्यक आहे.
शिवांश बोडके, वारजे माळवाडी
पुणे शहरातील गणेशोत्सवात डीजेच्या कर्णकर्कश आवाजावर पूर्णपणे बंदी घातली पाहिजे. कारण, मोठ्या आवाजामुळे कानांना त्रास होण्याबरोबरच हृदयावरही ताण येतो. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती आणि कानाशी संबंधित उपचार घेतलेल्या नागरिकांना हा त्रास अधिक जाणवतो. माझ्या कानाचे ऑपरेशन झाले असल्याने डीजेच्या मोठ्या आवाजाचा मला स्वतःला खूप त्रास होतो. त्यामुळे प्रशासनाने याबाबत कठोर भूमिका घेणे आवश्यक आहे.
प्रवीण जांभुळकर, फातिमानगर
पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे. मात्र, गणेशोत्सवातील डीजे-डॉल्बीचा कर्णकर्कश आवाज, अश्लील गाणी आणि हिडीस नृत्यामुळे उत्सवाचे धार्मिक आणि सामाजिक महत्त्व कमी होत आहे. मोठ्या आवाजाचा नागरिकांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे डीजे-डॉल्बीच्या आवाजाच्या मर्यादेचे कठोर पालन करावे किंवा त्यावर पूर्ण बंदी घालावी. गणेशोत्सवाचे पावित्र्य कायम ठेवत पुण्याची पारंपरिक आणि सांस्कृतिक ओळख जपणे आवश्यक आहे.
दिलीप गजघाटे, पुणे
पुण्यातील गणेशोत्सवाचा एक वेगळाच आनंद आहे. गणेशोत्सवाच्या काळात दहा दिवस पुण्यातील उत्सवाचे रंग अनुभवणे ही एक वेगळीच पर्वणी असते. सर्व गणेश मंडळांनी या दहा दिवसांत समाजप्रबोधनपर कार्यक्रम तसेच अनेक विषयांवर जनजागृती करणाऱ्या उपक्रमांवर भर दिला पाहिजे. विसर्जन मिरवणुकीत कर्कश स्पीकर लावण्याऐवजी चांगल्या गुणवत्तेचे आणि कानाला त्रास होणार नाही असे स्पीकर लावण्यास हरकत नाही. तसेच, विसर्जन मिरवणुकीत वर्षभर मंडळासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांचाही विचार केला पाहिजे.
भरत काळे, गुलटेकडी