

पुणे: पुण्याच्या रस्त्यांवरून चालणे म्हणजे पादचाऱ्यांसाठी रोजचाच जीवघेणा प्रवास ठरत आहे. कुठे पदपथच नाही, तर कुठे असलेले पदपथ अतिक्रमण, पार्किंग आणि खोदाईच्या विळख्यात सापडले आहेत. त्यामुळे महिला, मुले, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना वाहनांच्या गर्दीतून जीव मुठीत धरून रस्त्यावरून चालावे लागत आहे. शहराचा विस्तार आणि वाहनांची संख्या झपाट्याने वाढत असताना पादचाऱ्यांसाठी सुरक्षित जागा मात्र अपुरीच आहे. महापालिकेच्या नोंदीनुसार शहरातील २,४६०.७२ किलोमीटर रस्त्यांपैकी केवळ ७४७ किलोमीटर रस्त्यांवर पदपथ असून, तब्बल ६९.६४ टक्के रस्ते पदपथांविनाच आहेत.
शहराचा विस्तार आणि वाहनांची संख्या वाढत असताना पुणेकरांना मात्र सुरक्षितपणे चालण्यासाठी जागाच उरलेली नाही. महापालिकेच्या आकडेवारीनुसार शहरात २,४६०.७२ किलोमीटर रस्ते असून, त्यापैकी केवळ ७४७ किलोमीटर रस्त्यांवर पदपथ आहेत. म्हणजेच अवघ्या ३०.३६ टक्के रस्त्यांवर पदपथांची सुविधा आहे. तर, ६९.६४ टक्के रस्ते पदपथांविनाच आहेत. उपलब्ध पदपथांपैकीही ४२ किलोमीटर पदपथ दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत.
तुटलेले पेव्हिंग ब्लॉक, उखडलेले पृष्ठभाग, असमान उंची, धोकादायक मॅनहोल, राडारोडा, अतिक्रमणे आणि वाहनांचे पार्किंग यामुळे पदपथ असूनही पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालावे लागत आहे. दुकानदारांचे साहित्य, खाद्यपदार्थांच्या गाड्या, विद्युत पेट्या, जाहिरात फलक, कचराकुंड्या आणि बांधकाम साहित्याने पदपथ व्यापले आहेत. इमारतींच्या प्रवेशासाठी केलेल्या उतारांमुळेही पदपथांवर अडथळे निर्माण झाले आहेत. महापालिकेने जानेवारी २०१६ मध्ये ‘वॉक स्मार्ट’ पादचारी धोरण स्वीकारले. त्यानुसार प्रत्येक पदपथावर किमान दोन मीटरचा सलग व अडथळामुक्त मार्ग, समतल व न घसरणारा पृष्ठभाग, योग्य प्रकाशव्यवस्था आणि पावसाचे पाणी न साचण्याची व्यवस्था अपेक्षित आहे. प्रत्यक्षात मात्र या तरतुदी कागदावरच राहिल्या आहेत. गॅस, वीज, जलवाहिनी, सांडपाणी आणि केबलसाठी होणाऱ्या वारंवार खोदाईनंतर पदपथ पूर्ववत केले जात नसल्याने त्यांची अवस्था आणखी बिकट होते. काम सुरू असताना पादचाऱ्यांसाठी सुरक्षित पर्यायी मार्ग देण्याची तरतूदही अनेक ठिकाणी पाळली जात नाही.
पदपथांवरील वाहनांचे पार्किंग रोखण्यासाठी बोलार्डचीही गरज आहे. नवीन पदपथ व देखभालीसाठी २०२६-२७ मध्ये १०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, क्षेत्रनिहाय पदपथांची लांबी, दुरुस्ती, निधी व कामांची प्रगती यांचा सार्वजनिक डॅशबोर्ड उपलब्ध नाही. समाविष्ट गावांमध्ये पदपथांचा मोठा अभाव असून, जुन्या भागांत अरुंद व अतिक्रमित पदपथ आहेत. मेट्रो, बसथांबे, शाळा, रुग्णालये, बाजारपेठा जोडणारे सुरक्षित मार्ग, झेब्रा क्रॉसिंग, रॅम्प, प्रकाशव्यवस्था आणि दिव्यांगांसाठी स्पर्शमार्ग उभारण्याबरोबरच अतिक्रमण हटविण्यासाठी संबंधित विभागांमध्ये समन्वय आवश्यक आहे.
आदर्श पदपथ कसा असावा?
किमान दोन मीटर रुंदीचा अडथळामुक्त मार्ग. सलग, समतल आणि न घसरणारा पृष्ठभाग. पदपथाच्या पातळीत मॅनहोलची झाकणे. दिव्यांगांसाठी रॅम्प आणि स्पर्शमार्ग. पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा. पुरेशी प्रकाशव्यवस्था हवी. वाहनांचा प्रवेश रोखण्यासाठी नियोजनबद्ध बोलार्ड. दुकानांचे साहित्य, फलक आणि कचराकुंड्यांपासून मुक्त मार्ग. बसथांबा आणि रस्ता ओलांडण्याच्या ठिकाणांशी सलग जोडणी असावी.
शहरातील पदपथांचे चित्र
शहरातील रस्त्यांची लांबी : २,४६०.७२ कि.मी.
पदपथ असलेले रस्ते : ७४७ कि.मी.
पदपथ नसलेले रस्ते : १,७१३.७२ कि.मी.
पदपथ असलेल्या रस्त्यांचे प्रमाण : ३०.३६ टक्के
पदपथ नसलेल्या रस्त्यांचे प्रमाण : ६९.६४ टक्के
दुरुस्तीची आवश्यकता असलेले पदपथ : ४२ कि.मी.
२०२६-२७ मधील प्रस्तावित आर्थिक तरतूद : १०० कोटी रुपये
पुणे शहरात सध्या ७४७ किलोमीटर लांबीचे पदपथ उपलब्ध आहेत. रस्त्यांच्या रुंदीनुसार पदपथ उभारण्याचे महापालिकेचे नियोजन असून, १२ मीटर रुंदीच्या रस्त्यांवर शक्यतो एका बाजूला, तर १८ आणि २४ मीटर रुंदीच्या रस्त्यांवर दोन्ही बाजूंना पदपथ आवश्यक आहेत. शहरातील तीन ते ६५ मीटर रुंदीच्या रस्त्यांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. यंदा नवीन पदपथ उभारणे आणि अस्तित्वातील पदपथांची दुरुस्ती करण्यासाठी ८८ कोटी रुपयांची स्वतंत्र तरतूद आहे. रस्त्यांसोबत विकसित होणारे पदपथ आणि क्षेत्रीय कार्यालयांच्या स्तरावरील कामांचा समावेश केल्यास पदपथांसाठी एकूण खर्च १०० ते ११० कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
राजेश बनकर, प्रमुख, पथ विभाग, पुणे महापालिका