पुणे: 'गणपती बाप्पा मोरया... मंगलमूर्ती मोरया...'चा जयघोष, हातात लाडक्या बाप्पाची मूर्ती आणि चेहऱ्यावर आगमनाचा आनंद... रविवारी रात्रीपासूनच पुण्याच्या रस्त्यांवर हे चित्र पाहायला मिळाले. सोमवारी घरोघरी गणरायाचे आगमन होणार असल्याने आदल्या रात्रीपासूनच बाप्पाला घरी घेऊन जाण्यासाठी गणेशभक्तांची लगबग सुरू झाली. त्यामुळे अवघे शहर गणेशमय झाले होते.
मूर्ती विक्री केंद्रांवर गणेशभक्तांची मोठी गर्दी
शहरातील कुंभारवाडा, स्वारगेट, शनिवारवाडा, जुना तोफखाना, कसबा पेठ आदींसह उपनगरांतील विविध मूर्ती विक्री केंद्रांवर गणेशभक्तांची मोठी गर्दी झाली होती. कुणी दुचाकीवरून, कुणी चारचाकीतून, तर कुणी सजविलेल्या वाहनातून बाप्पाला वाजतगाजत घरी घेऊन जात होते. अनेक कुटुंबांनी गर्दी टाळण्यासाठी रविवारी रात्रीच मूर्ती घरी नेण्यास पसंती दिली.
एकीकडे बाप्पाला घरी नेण्याची लगबग सुरू असताना दुसरीकडे पूजेसाठी लागणाऱ्या साहित्याच्या खरेदीने बाजारपेठाही गजबजून गेल्या. गणेशप्रिय पत्री, दुर्वा, फुले, हार, तसेच पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी मंडई आणि मार्केट यार्ड परिसरात गणेशभक्तांची गर्दी उसळली होती. विविध प्रकारच्या पत्रींचे गठ्ठे, हिरव्यागार दुर्वा आणि रंगीबेरंगी फुलांनी बाजारपेठ अक्षरशः बहरून गेली होती.
गणेशोत्सवाचा उत्साह
बाप्पाच्या मखराला अखेरचा साज चढविण्यासाठी सजावटीच्या साहित्याच्या खरेदीलाही वेग आला होता. त्यामुळे बोहरी आळीत दिवसभर मोठी गर्दी होती. विद्युत रोषणाईच्या माळा, रंगीबेरंगी पडदे, मखराचे साहित्य, कृत्रिम फुले, तोरणे आणि विविध आकर्षक सजावटीच्या वस्तूंच्या खरेदीकडे पुणेकरांचा कल दिसून आला. गणेशमूर्तीपासून पत्री-फुले आणि सजावटीच्या साहित्यापर्यंत प्रत्येक खरेदीसाठी पुणेकरांची सुरू असलेली धावपळ आणि रस्त्यांवर घुमणारा 'गणपती बाप्पा मोरया'चा जयघोष यामुळे रविवारी रात्रीपासूनच शहरात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला होता.
पुण्यात यंदा सात लाख घरांत बाप्पा!
शहरात सुमारे सात लाख घरगुती गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना होण्याचा अंदाज आहे. त्याचबरोबर विविध पेठा, उपनगरे आणि परिसरांतील सार्वजनिक मंडळांमध्ये सुमारे १० हजार गणेशमूर्ती विराजमान होणार आहेत. घरगुती गणेशमूर्तींमध्ये यंदाही पीओपीच्या मूर्तींचे प्रमाण सर्वाधिक असून, सहा लाखांहून अधिक पीओपी मूर्ती विराजमान होण्याचा अंदाज आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाकडे पुणेकरांचा कल वाढत असला, तरी शाडू माती व अन्य पर्यावरणपूरक मूर्तींची संख्या तुलनेने कमी आहे. शहरात शाडू व अन्य प्रकारच्या सुमारे ७० ते ८० हजारांहून अधिक मूर्तींची प्रतिष्ठापना होईल, असा अंदाज लोहगाव येथील मूर्तिकार गणेश कुंभार यांनी वर्तविला.