

खडकवासला: जुलै -ऑगस्टमध्ये जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्यानंतर सप्टेंबर महिना सुरू होताच घाट माथ्यासह पानशेत खोऱ्यात पावसाने उघडीप दिली आहे. गेल्या आठ दिवसांपासून कडकडीत उन्हाळा सुरू आहे. त्यामुळे धरण साठ्यातील पाण्याची आवक ठप्प झाली असून, खडकवासला धरणात घट सुरू आहे. असे असले तरी वरील तिन्ही धरणे शंभर टक्के भरली असल्याने खडकवासला धरण साखळी २८.९० टीएमसी म्हणजे ९९.१२ टक्के साठा शिल्लक आहे.
धरण साखळीत जवळपास गतवर्षी इतका पाणीसाठा आहे. शनिवारी (दि. १२) सायंकाळी ५ वाजता खडकवासला धरणात १.७२ टीएमसी म्हणजे ८६.९९ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक होता. धरणातून बंदिस्त जलवाहिन्यातून ६५२ तर मुठा कालव्यातून १ हजार ५४ क्सुसेक्स पाणी सोडले जात आहे. पावसाअभावी पाण्याची आवक बंद झाल्याने पानशेत, वरसगाव व टेमघर धरणांतील विसर्ग बंद करण्यात आला आहे. त्यामुळे खडकवासला धरणात येणारे पाणीही बंद झाले आहे.
खडकवासला धरणाचे शाखा अभियंता विरेश राऊत म्हणाले, शहर व जिल्ह्यातील नागरिकांना पिण्यासाठी पुरेशा प्रमाणात पाणी सोडले जात आहे. गेल्या आठ दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे धरण साठ्यात पाण्याची आवक बंद झाली आहे. असे असले तरी धरण साखळीत जवळपास शंभर टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
पुणे शहर व जिल्ह्यातील एक कोटी नागरिकांसह ६६ हजार हेक्टर शेती खडकवासला धरण साखळीवर अवलंबून आहे. यंदा कमी पावसाचा अंदाज असतानाही कोकण व पुणे जिल्ह्याच्या हद्दीवरील घाट माथ्यासह पानशेत वरसगाव धरण खोऱ्यात सलग दोन वेळा जोरदार पाऊस पडला. त्यामुळे धरण साखळी शंभर टक्के भरून वाहत होती. गेल्या आठ दिवसांपासून धरण क्षेत्रात कडकडीत उन्हाळा सुरू आहे. आज दिवसभर ढगाळ वातावरण होते . पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र दुपारी जोरदार वारे वाहू लागले. त्यानंतर पावसाचे ढग विरळ होऊन पुन्हा कडकडीत ऊन पडले.
आजचा पाणीसाठा
खडकवासला: १ .७२- ८६.९९,
पानशेत: १०.६५ - १००
वरसगाव: १२.८२ - १००
टेमघर : ३.६७ - ९९.०९