Ganeshotsav Sound System Ban Pudhari
पुणे

Pune Ganeshotsav DJ Rules: पुण्यात गणेशोत्सवात DJचा मुद्दा तापला; ‘नियम संपूर्ण महाराष्ट्रात समान लागू करा’

वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष ॲड. अरविंद तायडे यांची मागणी; न्यायालयीन निर्देशांचे कठोर पालन करण्याचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

पुणे: गणेशोत्सव हा डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे नव्हे, तर पुण्याच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वैभवामुळे प्रसिद्ध आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात ध्वनिप्रदूषणासंदर्भात सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाने घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या समान आणि कठोर अंमलबजावणीनुसार पुण्यातच नव्हे, तर संपूर्ण राज्‍यात गणेशोत्सव साजरा झाला पाहिजे, अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष अ‍ॅड. अरविंद तायडे यांनी मांडली.

गुरुवारच्या अंकात वंचित बहुजन आघाडी पक्षाचे शहराध्यक्ष म्हणून मुनवर कुरेशी यांच्या नावाने बातमी प्रसिद्ध झाली. परंतु, कुरेशी या पक्षाचे नसून याबाबत दिलगिरी व्यक्त करत, पक्षाचे शहराध्यक्ष ॲड. तायडे यांच्याकडून नव्याने भूमिका मांडण्यात आली आहे. तायडे म्हणाले, ध्वनिक्षेपक अथवा सार्वजनिक ध्वनिव्यवस्थे-संदर्भातील कायद्यानुसार ध्वनिपातळी निर्धारित मर्यादेत ठेवण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे.

सर्वोच्च न्यायालयाने ध्वनिप्रदूषणामुळे नागरिकांच्या शांततेने जगण्याच्या अधिकारावर परिणाम होत असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे ध्वनिव्यवस्था वापरण्यासाठी रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत लाऊडस्पीकरच्या वापरावर निर्बंध आहेत. इतर वेळी नियमांच्या अधीन राहून ध्वनिक्षेपक वापरण्यास हरकत नाही.

या पार्श्वभूमीवर केवळ पुण्यातच डीजेच्या प्रश्नावर वेगळी भूमिका घेण्याऐवजी संपूर्ण महाराष्ट्रात न्यायालयीन निर्देश आणि नियम समान पद्धतीने लागू करावेत, अशी मागणी तायडे यांनी केली. “नागपूर हे मुख्यमंत्र्यांचे गृहशहर आहे. तेथे डीजेवर बंदीचे आदेश दिले जात असतील, तर पुणे शहरासाठीही मुख्यमंत्र्यांनी त्याच धर्तीवर आदेश द्यावेत.

परंतु, मुख्यमंत्री डीजे आणि गणपती मंडळांमधील वाद जाणीवपूर्वक सोडवत नसल्याचा माझा आरोप आहे, असे तायडे यांनी सांगितले. दरम्यान, डीजेच्या संदर्भात विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीचे समर्थन करणाऱ्या भाजपचे धीरज घाटे यांच्या भूमिकेचाही तायडे यांनी निषेध केला. गणेशोत्सवाची ओळख डीजेमुळे नव्हे, तर पुण्याच्या सांस्कृतिक परंपरेमुळे आहे. त्यामुळे कायद्याचे पालन करूनच उत्सव साजरा झाला पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT