

नारायणगाव: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फुलांना चांगली मागणी आणि बाजारभाव मिळेल, या अपेक्षेने लागवड केलेल्या जुन्नर तालुक्यातील फूल उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली आहे.
सध्या फुलांच्या बाजारभावात मोठी घसरण झाली असून, झेंडूला अवघा १० ते १५ रुपये, तर शेवंतीला २० ते २५ रुपये किलो भाव मिळत आहे. या दरातून फुले तोडणी, प्रतवारी, पॅकिंग व वाहतुकीचा खर्चही वसूल होत नसल्याने त्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
गणेशोत्सवाच्या काळात विशेषतः शेवंतीच्या फुलांना मोठी मागणी असते. शेवंतीचा हंगाम पावसाळ्यात असल्याने या काळात चांगला बाजारभाव मिळेल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा असते. यंदाही गणेशोत्सवाच्या काळात दर वाढतील, या आशेने निमदरी, तुकारामवाडी, धोंडकरवाडी आदी परिसरात झेंडू, ॲस्टर, शेवंती यांसह विविध फुलांची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली.
मात्र, गणेशोत्सव जवळ आला असतानाही फुलांच्या बाजारभावात अपेक्षित वाढ झालेली नाही. उलट दर घसरल्याने उत्पादन खर्चाचे गणित बिघडले आहे. फुले तोडण्यासाठी मजुरी, प्रतवारी, पॅकिंग आणि वाहतुकीवर मोठा खर्च होत असून, विक्रीतून मिळणारा दर अत्यल्प आहे. त्यामुळे फुले बाजारात नेल्यानंतर शेतकऱ्यांच्या हातात फारशी रक्कम शिल्लक राहत नाही.
धोंडकरवाडी येथील फूल उत्पादक शेतकरी रामभाऊ खुळे म्हणाले, ‘शेवंतीच्या फुलांच्या लागवडीसाठी एकरी अडीच ते तीन लाख रुपयांपर्यंत खर्च येतो. सध्या बाजारभाव मोठ्या प्रमाणात घसरल्याने लागवडीचा खर्चही वसूल होण्याची शक्यता दिसत नाही. सततच्या पावसाने झेंडू व शेवंतीची मुळे खराब झाली आहेत. त्यातच पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव वाढल्याने औषध फवारणीचा खर्चही वाढला आहे.
प्लास्टिकच्या फुलांवर बंदीची मागणी
बाजारात प्लास्टिक व कृत्रिम फुलांचा वापर वाढत असल्याने त्याचा परिणाम नैसर्गिक फुलांच्या मागणीवर होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शासनाने प्लास्टिकच्या फुलांवर बंदी घालावा, अशी मागणी होत आहे.