Crime News Pudhari
पुणे

Pune Crime: वडापावसाठी गेला अन् जीव गमावला; पायाला धक्का लागल्याच्या वादातून पुण्यात तरुणाचा खून

गणेश पेठेतील डुल्या मारुती चौकात धक्कादायक घटना; मारहाणीनंतर घरी झोपलेल्या तरुणाचा अंतर्गत रक्तस्रावाने मृत्यू, आरोपी ताब्यात

पुढारी वृत्तसेवा

पुणे: वडापाव खरेदी करण्यासाठी गेल्‍यानंतर पायाला धक्‍का लागल्‍याच्‍या कारणातून झालेल्‍या वादात तरुणाचा खून करण्यात आल्‍याची घटना समोर आली आहे. हा धक्‍कादायक प्रकार गणेश पेठेतील डुल्‍या मारुती चौक परिसरात रविवारी दुपारी तीन वाजण्याच्‍या सुमारास घडली. शिवम राजेश परदेशी (वय २८, रा. गणेश पेठ) असे खून झालेल्‍या तरुणाचे नाव आहे, तर याप्रकरणी पोलिसांनी वैभव किशोर साळुंखे (वय २४, रा. गणेश पेठ) याला ताब्यात घेतले असून, त्‍याच्‍या विरोधात खुनाचा गुन्‍हा दाखल केला आहे.

शिवम आणि वैभव हे दोघे गणेश पेठ परिसरात राहण्यास आहेत. दोघांची तोंडओळख आहे. वैभव हा एका बिल्‍डरकडे अकाऊंटंट म्‍हणून नोकरीस आहे. दोघांचेही वडील रिक्षाचालक आहेत. रविवारी दुपारी गणेश पेठेतील एका वडापावच्‍या गाडीवर दोघांचा एकमेकाला पाय लागला. यातून दोघांमध्ये वाद झाले. त्‍यातून वादाचे पर्यावसन मारहाणीत झाले. वैभव याने गणेशच्‍या छातीत जोरात बुक्क्‍‍या मारल्‍याचे पोलिसांचे म्‍हणणे आहे.

त्‍यानंतर शिवम या भांडणानंतर घरी जाऊन झोपला होता. रात्री उशिरापर्यंत तो उठत नाही हे लक्षात आल्‍यावर घरच्‍यांनी त्‍याला उठविण्याचा प्रयत्‍न केला. मात्र, त्‍याने प्रतिसाद दिला नाही. शेवटी त्‍याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

परंतु, त्‍याचा उपचारापूर्वीच मृत्‍यू झाल्‍याचे डॉक्‍टरांनी सांगितले. अंतर्गत रक्‍तस्‍त्राव झाल्‍याने त्‍याचा मृत्‍यू झाल्‍याचे प्रथमदर्शी समोर आले. हा प्रकार फरासखाना पोलिसांना समजताच त्‍यांनी घटनास्‍थळी धाव घेतली.

परिसरातील सीसीटीव्‍ही फुटेज पाहिले असता तसेच नागरिक व त्‍यांच्‍या वादाची माहिती त्‍यांना मिळाली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीत त्‍याने भांडणे झाल्‍याचे सांगितले. पुढील तपास फरासखाना पोलिस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT