

पुणे: विमाननगरमधील एअरो स्पेस मॉलमधील 'द हाऊस कम्यून बार अँड ईटरी' या पबवर गुन्हे शाखेने शनिवारी पहाटे छापा टाकला. रात्री दीड वाजेपर्यंतच परवानगी असताना हा पब पहाटे साडेतीनपर्यंत सुरू ठेवला. या कारवाईत पोलिसांनी मद्यसाठा आणि ध्वनिक्षेपक यंत्रणा असा २ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी जागामालक मंगेश धिमधिमे, प्रायोजक सुमीत गोटे, व्यवस्थापक नूर हुसेन शेख, डीजे सोनाली पंडित, अनिकेत किर, सुनीता वर्मा, अनंत गायकवाड आणि शानूर काजी यांच्याविरुद्ध विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हे शाखेला पबमध्ये निर्धारित वेळ संपल्यानंतरही व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने पहाटे छापा टाकला. कारवाईच्या वेळी पबमध्ये ८९ ग्राहक आढळून आले. त्यामध्ये ६३ पुरुष आणि २६ महिलांचा समावेश होता. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर सोडून दिले.
‘प्रोजेक्ट एक्स’नंतरही पबचालकांना धाक नाही?
तुळापूरमधील आलिशान रिसॉर्टमध्ये पहाटेपर्यंत सुरू असलेल्या 'प्रोजेक्ट एक्स' रेव्ह पार्टीवर काही दिवसांपूर्वी गुन्हे शाखेने धडक कारवाई करून पार्टी उधळून लावली होती. त्यानंतर पब, बार आणि पार्टी आयोजकांवर पोलिसांची करडी नजर असल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र, विमाननगरमध्ये पुन्हा पहाटेपर्यंत पब सुरू असल्याने कारवाईचा धाक नेमका किती? असा सवाल उपस्थित झाला आहे. निर्धारित वेळेची सर्रास पायमल्ली करून व्यवसाय सुरू ठेवणाऱ्या पबचालकांवर कठोर कारवाई न झाल्यास अशा प्रकारांना प्रोत्साहन मिळण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.
मद्यसाठा अन् ध्वनियंत्रणा जप्त
पोलिसांनी पबची झडती घेतली असता १ लाख ६७ हजार रुपयांचा मद्यसाठा आढळून आला तसेच ७५ हजार रुपयांची ध्वनियंत्रणा जप्त करण्यात आली. दोन्ही मिळून २ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात आहे.