Ganeshotsav Pudhari
पुणे

Pune Ganesh Mandals Electricity: पुण्यात २११३ गणेश मंडळांपैकी केवळ २०६ मंडळांना अधिकृत वीजजोडणी

पुण्यात २११३ गणेश मंडळांपैकी केवळ २०६ मंडळांना अधिकृत वीजजोडणी

पुढारी वृत्तसेवा

पुणे: गणेशदर्शनासाठी गर्दीत उभ्या असलेल्या भाविकांच्या डोक्यावर विजेच्या तारा असतील, मंडपात लहान मुले-महिला बसलेल्या असतील आणि अचानक वायरिंगमधून वीजप्रवाह उतरला, तर त्याची जबाबदारी कोण घेणार? मुंबईत गणेश मंडपाजवळ वीजप्रवाह उतरून दोघांचा जीव गेल्याची घटना ताजी असताना पुण्यात मात्र तब्बल २ हजार ११३ अधिकृत सार्वजनिक गणेश मंडळांपैकी केवळ २०६ मंडळांनी महावितरणकडून अधिकृतपणे तात्पुरते वीजजोड घेतले आहेत. मंडळांनी परवाने घेतले की नाही? हे तपासण्याची जबाबदारी आमची नसून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वीज निरीक्षकांची आहे, असे धक्कादायक उत्तर महावितरणने दिले आहे. त्यामुळे पुण्यात मुंबईसारखी दुर्घटना घडली, तर त्याची जबाबदारी कोणाची? असा हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

गणेशोत्सवाच्या काळात मंडप, विद्युतरोषणाई, ध्वनिव्यवस्था आणि विविध सजावटींसाठी मोठ्या प्रमाणावर वीज वापरली जाते. अशा वेळी एखाद्या मंडळाची वायरिंग सदोष असेल किंवा अर्थिंग योग्य नसेल तर दुर्घटना घडू शकते. त्यामुळे केवळ अधिकृत जोडणी घेणाऱ्या २०६ मंडळांकडून कागदोपत्री टेस्ट रिपोर्ट घेण्यापेक्षा शहरातील सर्व सार्वजनिक गणेश मंडळांच्या वीजजोडण्यांची सुरक्षितता तपासण्याची जबाबदारी महावितरणने पार पाडणे आवश्यक आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला तात्पुरते वीजजोड देण्यापूर्वी अधिकृत व परवानाधारक विद्युत ठेकेदाराकडून मीटरनंतरची वायरिंग, अर्थिंग आदी कामे नियमानुसार केल्याचा टेस्ट रिपोर्ट घेतला जातो. त्यानंतरच तात्पुरता वीजजोड दिला जातो. मंडळांच्या परिसरातील स्टॉलधारकांना स्वतंत्रपणे वीजजोड दिला जात नाही.

मात्र, प्रत्यक्ष आकडेवारी महावितरणच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. पुणे शहर व परिसरातील २११३ अधिकृत गणेश मंडळांपैकी केवळ २०६ मंडळांनी महावितरणकडून तात्पुरते वीजजोड घेतले आहेत. म्हणजेच, मोठ्या संख्येने मंडळे महावितरणच्या अधिकृत तात्पुरत्या जोडणीच्या यंत्रणेबाहेर आहेत. या मंडळांनी वीज कुठून घेतली, ती जोडणी कोणत्या पद्धतीने केली आहे, वायरिंग व अर्थिंग सुरक्षित आहे का, याची तपासणी महावितरणने केली आहे का, हे स्पष्ट झालेले नाही. महावितरणकडे तात्पुरत्या वीज जोडणीसाठी स्वतंत्र प्रक्रिया आहे. ऑनलाइन अर्ज, वीजभाराची माहिती, आवश्यक कागदपत्रे, प्रत्यक्ष पाहणी किंवा लोड सर्वेक्षण, मागणीपत्रानुसार शुल्क भरणे, परवानाधारक ठेकेदारामार्फत वायरिंग आणि टेस्ट रिपोर्ट सादर करणे, अशी ही प्रक्रिया आहे. त्यानंतरच तात्पुरती वीजजोडणी देण्यात येते.

मागील वर्षी पुणे परिमंडलात १६९ मंडळांनी तात्पुरते वीजजोड घेतले होते. यंदा ही संख्या २०६ झाली आहे. मात्र, अधिकृत गणेश मंडळांच्या तुलनेत ही संख्या अत्यल्प आहे. त्यामुळे अधिकृत जोडणी न घेतलेल्या मंडळांच्या वीजवापरावर महावितरणचे कितपत नियंत्रण आहे, हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांना विचारले असता आम्ही केवळ परवनग्या देतो, मंडळांनी सुरक्षित वीजजोड घेतला की नाही, हे तपासण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत निरीक्षकांचे आहे, असे उत्तर मिळाले. त्यामुळे दुर्घटना घडल्यास जबाबदारी कोण घेणार? हा प्रश्न आहे.

केवळ २०६ मंडळांनी घेतले अधिकृत तात्पुरते जोड

चालू वर्षी पुणे परिमंडलात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी घेतलेले तात्पुरते वीजजोड

  • भोसरी १६

  • कोथरूड २२

  • पिंपरी १२

  • शिवाजीनगर २५

  • मंचर ९

  • पुणे २

  • राजगुरुनगर ११

  • बंडगार्डन १२

  • नगर १३

  • पद्मावती ४५

  • रास्ता पेठ २७

  • एकूण २०६

  • मागील वर्षी - १६९ मंडळे

महावितरणची प्रक्रिया नेमकी काय?

  • ऑनलाइन पोर्टलवरून तात्पुरत्या एलटी वीजजोडणीसाठी अर्ज.

  • सिंगल किंवा थ्री फेज वीजजोडणीची निवड.

  • मंडळाचे नाव, पत्ता, संपर्क क्रमांक व वीजभाराची माहिती.

  • आवश्यक कागदपत्रे ऑनलाइन अपलोड.

  • अर्जाची पडताळणी व आवश्यक असल्यास प्रत्यक्ष पाहणी.

  • मागणीपत्रानुसार सेवा जोडणी शुल्क व अनामत रक्कम भरणे.

  • परवानाधारक विद्युत ठेकेदारामार्फत वायरिंग व अर्थिंग.

  • आवश्यक टेस्ट रिपोर्ट सादर केल्यानंतर तात्पुरती वीजजोडणी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT