पुणे: कानात हेडफोन, हातात ब्रश अन् समोर बाप्पा... संगीताच्या तालावर गुणगुणत रंगकाम सुरू... हे चित्र आहे यंदाच्या मूर्तिकला केंद्रांमधले. या कलेत नवे आयाम आल्याने जेन झी पिढीची ही काम करण्याची पद्धत पाहिली, की आपण अवाक होतो. पण, हा आहे काळाचा महिमा. मूर्तिकारांच्या बदलत्या पिढीची बदलती कार्यशैली. हा बदल केवळ पुणे शहरापुरता मर्यादित नसून महाराष्ट्रातील अनेक मूर्तिकला केंद्रांमध्ये नव्या पिढीचा सहभाग वाढत आहे.
एकेकाळी गणेशमूर्ती रंगविण्याची कार्यशाळा म्हणजे शांतता, ब्रशची सळसळ आणि मूर्तिकाराची पूर्ण तन्मयता, असे चित्र असायचे. सकाळपासून रात्रीपर्यंत मूर्तीसमोर बसून रंगांचे बारकावे टिपणारे जुने कारागीर काम करताना रेडिओसुद्धा लावायचे नाहीत. त्यांच्या हातात ब्रश आणि नजरेसमोर फक्त बाप्पाचे रूप, अशी ही तपश्चर्या असायची.
कामातील तन्मयता, अचूकता मात्र तीच : मोबाईलवर सुरू असलेली गाणी ऐकत ही तरुणाई तितक्याच एकाग्रतेने रंगकाम करताना दिसत आहे. वरवर पाहता ही कार्यपद्धती बदललेली वाटत असली तरी आधुनिक रंगतंत्राशी परिचित असलेली तरुण पिढी बाप्पाच्या चेहऱ्यावरचा भाव, डोळ्यांतील जिवंतपणा आणि रंगांची अचूक संगती साधण्याची धडपड कायम आहे.
पेणमधून आले कारागीर : रायगड जिल्ह्यातील पेण, हमरापूर आणि जोहे परिसरात ही परंपरा मोठी आहे. पेणमध्ये गणेशमूर्तीच्या निर्मितीची जुनी परंपरा असून, येथे वर्षभर मूर्ती बनविण्याचे काम सुरू असते. पेणमध्ये सुमारे ५५० चित्रशाळा असून, तेथे लाखो मूर्तींचे उत्पादन होते. या कार्यशाळेतूनच काही जेन झी मूर्तिकार पुण्यात आले आहेत.
युद्धामुळे साहित्य महागले : मूर्तिकार राजेश शिंदे म्हणाले की, मागच्या वर्षी मे महिन्यात पाऊस झाला. त्यामुळे मूर्ती सुकण्यास उशीर झाल्याने जास्त मूर्ती करता आल्या नाहीत. त्यामुळे भाव वाढले होते. यंदा युद्धामुळे कच्चा माल महागल्याने मूर्तीचे भाव २५ ते ३० टक्क्यांनी वाढले आहेत.
आता झाली कामाची विभागणी
बेस रंग संपूर्ण मूर्तीला प्राथमिक रंग देणे. चेहऱ्याची कांती, सावली, ओठ, कान आदी डोळे रंगवणे हे अत्यंत कौशल्याचे काम मानले जाते. पेण परिसरात डोळे रंगवणाऱ्या कलाकाराला 'आखणीकार' म्हटले जाते. डोळ्यांची आखणी स्वतंत्र कलाकाराकडून करून घेतली जाते. त्याला खूप एकाग्रता अन् अचूकता लागते. वस्त्रांचे रंगकाम, धोतर, उपरणे, शेला यांचे रंग, नक्षी आणि छटा. मुकुट व दागिन्यांची सजावट, सोनेरी रंग, नक्षिकाम, रत्नांसारखे उठावदार रंग आणि बारीक डिझाइन.
मी गत ५० वर्षांपासून गणपतीच्या मूर्ती तयार करतो. पूर्वी पूर्ण कुटुंब या कामी येत असे. आता तो काळ गेला. मूर्तिकाम, रंगकाम, फेटा, उपरणे, धोतर किंवा पीतांबर यांची सजावट तयार करून देणारे कारागीर वेगळे असतात. तसेच, कामाच्या विभागणीप्रमाणे कामे करावी लागतात. यंदा पेण येथून तरुण पिढी रंगकामासाठी आली आहे. त्यांच्या कामाची पद्धत अशी अद्ययावत असली तरी कामात अचूकता आहे.राजेश शिंदे, श्री आर्ट्स, गणपती कारखाना, सुखसागरनगर