Garbage Depot Pudhari File Photo
पुणे

Pune Garbage Dumping Protest: फुरसुंगी-उरुळी देवाचीमध्ये ओपन डम्पिंगविरोधात ग्रामस्थ आक्रमक

पुणे महापालिकेच्या कचरा टाकण्याच्या विरोधात कचरागाड्या अडवून ग्रामस्थांचा तीव्र संताप; प्रदूषण आणि आरोग्य धोक्याचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

फुरसुंगी: फुरसुंगी-उरुळी देवाची परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर ओपन डम्पिंगविरोधात ग्रामस्थ पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. शहरातून आलेल्या कचऱ्याच्या गाड्या अडवून ग्रामस्थांनी महापालिका प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला. ओपन डम्पिंग कायद्याने बंद असतानाही भूमी ग्रीन कंपनीच्या जुन्या कार्यालयाशेजारी महापालिकेने सुमारे ८० हजार मेट्रिक टन कचरा टाकल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

महापालिका जुना कचरा टाकण्याच्या नावाखाली शहरातील विविध रॅम्पवरून थेट ताजा कचरा येथे आणत आहे. या कचऱ्यामध्ये टाकाऊ अन्न, ओला कचरा तसेच दुर्गंधीयुक्त कचऱ्याचा समावेश असल्याचे पाहणीत निदर्शनास आणले. वाहतूक करणाऱ्या ठेकेदारानेही हा कचरा शहरातून नुकताच आणण्यात आल्याची कबुली दिल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे.

ओल्या कचऱ्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी रविवारी सकाळी शहरातून आलेल्या कचरागाड्या रोखून परत पाठवल्या. या वेळी महापालिका प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान, ग्रामस्थांनी पुणे महापालिकेच्या घनकचरा विभागाचे उपायुक्त संतोष वारुळे यांच्याशी संपर्क साधून घटनास्थळी येऊन परिस्थितीची पाहणी करण्याची मागणी केली होती. वारुळे यांनी ग्रामस्थांची भेट घेण्याचे आश्वासन दिले होते.

मात्र, सायंकाळपर्यंत त्यांनी भेट दिली नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन महापालिकेविरोधात तक्रार दाखल करणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. या वेळी रणजित रासकर, विशाल हरपळे, ज्ञानेश्वर कामठे, कपिल भाडळे, विराज करचे, भूपेंद्र बेंगळे, नगरसेवक ॲड. अमोल कापरे, अजिंक्य ढमाळ, सनी कांबळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

महापालिकेविरोधात पोलिसांत तक्रार

घनकचरा अधिनियम २००० नुसार ओपन डम्पिंगसाठी बंदी आहे. मात्र, पुणे महापालिकेने बेकायदेशीररीत्या याठिकाणी ओपन डम्पिंग केल्याच्या विरोधात फुरसुंगी, उरुळी देवाची ग्रामस्थांनी फुरसुंगी पोलिसांत तक्रार दाखल केली असून, महापालिका प्रशासनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT